
दोनशेचं कवित्व!
‘शत-प्रतिशत भाजप!’ हा भारतीय जनता पक्षाचा स्थापनेपासूनचा मूलमंत्र आहे. देशात वा राज्याराज्यांत सत्ता पादाक्रांत करण्यासाठी सातत्याने आघाड्यांचे राजकारण करणाऱ्या पक्षाला कार्यकर्त्यांमधील ‘अंगार’ फुलवत ठेवण्यासाठी अशा एखाद्या मंत्राची गरज असते, यात शंकाच नाही. मात्र, अशा घोषणा आणि वास्तव यांच्यातील अंतर कमीत कमी असावे लागते.
सुमारे दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात या पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अशीच ‘शत-प्रतिशत’ची अतिशय आकर्षक घोषणा केली होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शरण यायला लावले होते, हा प्रसंग आजही अनेकांना आठवत असेल.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच मंत्राला नवे रूपडे बहाल केले अहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या नाशकात गोदातीरी पार पडलेल्या बैठकीचा समारोप करताना फडणवीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर ‘युती’ असतानाही, भाजपला १०५ आमदार निवडून आणता आले होते. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांची सोबत यामुळे फडणवीस यांचे बाहू भलतेच स्फुरण पावू लागले आहेत, याचीच हा निर्धार ही साक्ष आहे.
महाविकास आघाडी याच निवडणुका एकत्र राहून लढवणार, असे किमान सध्याचे तरी वातावरण आहे. तरीही फडणवीस हा निर्धार व्यक्त करत आहेत, हे केवळ त्यांच्याच नव्हे तर भाजपच्या आत्मविश्वासाचे दर्शन म्हणावे लागेल. एकीकडे राज्याच्या काँग्रेसमधील बेदिली विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सामोरी आली आहे,
तर दुसरीकडे राज्याचे राजकारण हे शिवसेनेतील फुटीमुळे पाच तुकड्यांत विभागले गेलेले असतानाही फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या या निर्धाराचे खरे तर कौतुकच करायला लागेल. मात्र, फडणवीस यांनी हा ‘दोनशे’चा नारा दिला, त्याच मुहूर्तावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यापुढे उद्धव ठाकरे यांच्या साथीने राजकारण करू इच्छिणारे प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सोबत आल्यास दोनशे जागा जिंकून दाखवू,
असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पण एकीकडे चिंचवड पोटनिवडणुकीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे मनधरणी करत असताना, आंबेडकर यांनी मात्र त्यांना पाठिंबा दिला आहे. यावरून आंबेडकर यांचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, ते लक्षात येते.
फडणवीस यांच्या निर्धाराचा या पार्श्वभूमीवर विचार करावा लागतो. फडणवीस, या दोनशे जागा त्या अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या साथीने जिंकणार आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. या दोनशेतील पाच-पंचवीस जागा शिंदे गटाने जिंकून दाखवल्या तरी राज्यात स्वबळावर भाजपचे राज्य येऊ शकते आणि शिंदे गटाच्या कुबड्या फेकून देऊन, भाजपला स्वत:च्या पायावर सत्ता मिळवता येऊ शकते. शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्याची सत्ता काबीज केल्यापासून भाजपचे एकमात्र उद्दिष्ट स्वबळावर सरकार स्थापन करण्याचेच राहिले आहे, हे लक्षात घ्यायला लागेल.
त्यामुळेच गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या पारड्यात गेलेली ‘हिंदू मते’ मिळवण्याची रणनीती भाजपने आखल्याचेही या बैठकीत जाहीरपणे सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांचा गट हीच मूळ शिवसेना आहे, असे भाजप सतत सांगत आहे, तर मग ही तथाकथित हिंदू मते त्या गटाच्या पारड्यात जायला हवीत. मात्र, त्या मतांवरही भाजपचा डोळा असल्याचे ही बैठक अप्रत्यक्षरीत्या सूचित करत आहे! यापासून जो काही बोध घ्यायचा तो घेणारे घेतीलच.
हा सारा अन्वयार्थ राज्याच्या राजकारणाची आगामी दिशा सूचित करत असला तरी त्यामुळे भाजप कशा रीतीने निवडणुका जिंकण्याची रणनीती आखून पुढची वाटचाल सुरू करतो, हेच स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांनी कार्यकारिणीचा समारोप करताना केलेल्या भाषणात ‘महाविकास आघाडी’ला लक्ष्य करणे, हे साहजिक होते आणि त्यांचे हे भाषण म्हणजे आगामी निवडणुकांच्या प्रचाराची नांदीच होती. ‘मला अटक करण्याचा कट महाविकास आघाडीने सत्तेवर असताना रचला गेला होता’, ही कथा त्यांनी पुन्हा एकदा ऐकवली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्याचा पुनरुच्चार केल्याने हा आगामी निवडणुकीच्या प्रचारातील भाजपचा प्रमुख मुद्दा असू शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले.
या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचे अधोरेखित करण्यात आलेले महत्त्व. सोशल मीडियावर २५ हजार समर्थक असलेल्यांनाच भाजप आगामी निवडणुकांत उमेदवारी देणार आहे. अर्थात, भाजप या माध्यमाच्या जोरावरच गेली आठ-दहा वर्षे राजकारण करत असला तरी आता विरोधी पक्षही तितक्याच जोमाने या क्षेत्रात उतरला असल्यानेच ही जाहीर अट घालावी लागणे, भाजपला भाग पडलेले दिसते.
मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाची खऱ्या अर्थाने दिशा ही निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयात या सरकारचे भविष्य ठरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तेथे आपल्याच बाजूने निकाल लागेल, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त करणे हेही साहजिकच होते. एकंदरीत प्रदेश कार्यकारिणीची ही बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी फडणवीस यांनीच व्यापून टाकली होती, यात शंकाच नाही.