esakal | कलाबहर : देई मातीला आकार...
sakal

बोलून बातमी शोधा

कलाबहर : देई मातीला आकार...

कलाबहर : देई मातीला आकार...

sakal_logo
By
गायत्री देशपांडे

सिग्नल तोडला, की शिट्टी मारून थांबवणारा हवालदार, चाळीतली बिऱ्हाडं, ट्रीपला निघालेले छोटे कुटुंब, सेल्फी काढणारे कुटुंब, गाईचं डोकं असलेली दूधवाली हे विषय जरी व्यंग्यचित्राचे वाटत असले तरी हे विषय घेऊन "व्यंग्यशिल्प'' करणारी भारती पित्रे ही एक शिल्पकार आहे. बहुतांश काम ती पापिअर माशे (कागदाचा लगदा) या माध्यमात करते. उपयोजित चित्रकला शिकलेल्या भारतीला आईकडूनच तिला कलेचा वारसा मिळाला, असं ती सांगते, त्यामुळे लहानपणापासून ‘सौंदर्या’चे संस्कार तिच्यावर होत गेले.

सुरुवातीला मोडक्‍या वस्तूंमधून कलात्मक वस्तू बनवणाऱ्या भारतीला नवीन माध्यम नि दिशा मिळाली जेव्हा तिने शरदकुमारांच्या कार्यशाळेत "पापिअर माशे''च्या माध्यमाचे शिक्षण घेतले. ते माध्यम तिला खूप आवडले खरे; पण त्याचा यशस्वी वापर करण्यासाठी प्रयोग करावे लागले. भारतीला या माध्यमाने संयम शिकवला. तिला बदलूनच टाकले म्हणाना! हे माध्यम निसर्गावर खूप अवलंबून असल्याने गरज असते तेव्हा वेळोवेळी काम थांबवून ते वाळू द्यावे लागते - न वैतागता! ‘कारखान्यासारखे त्यात काम करता येत नाही आणि माझ्या डोक्‍यात तर कल्पनांची शर्यत चालू असते. त्यामुळे या माध्यमामुळे मला असंच वाटत राहतं, की हातांनी काम खूप कमी होतंय की काय.’ असं ती हसत सांगते.

मुंबईहून पुण्यात आल्यावर तिच्या कामाचा आवाका वाढला. कौटुंबिक चॅरिटेबल ट्रस्टमधून देवरूखला तिच्या सासऱ्यांनी सुरू केलेल्या कला महाविद्यालयाचे काम ती पाहाते. तिथल्या कुंभार समाजासाठी "ओली माती'' हा खास प्रकल्प भारतीच्या मार्गदर्शनाने आज नावारूपाला येतोय. पूर्वी कधीही त्रिमितीत काम न केलेल्या भारती यांनी जेव्हा कागदाच्या लगद्याचे शिल्प करायला सुरुवात केली, तेव्हा तिला लक्षात आले, की त्यात आनंद मिळतोय. ‘खूप काही करता येते या माध्यमात. एकदा त्या माध्यमाचा स्वभाव समजला, की त्याचा उपयोग करूनच काम करायचे. या माध्यमात मोठमोठी शिल्पेही बनवता येतात. त्यात सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.'' हे ती उत्कटतेने सांगते. भारतीच्या शिल्पांचे विषय आपल्या आजूबाजूचे असतात. त्यामुळे आपण पटकन त्याच्याशी कनेक्‍ट होतो. तिच्या पात्रांची डोकी लहान आणि शरीर मोठे असते, त्यामुळे ते अजून मोठे असल्याचा भास होतो. तिच्या प्रत्येक शिल्पाची एक कहाणी आहे, प्रत्येक शिल्प म्हणजे एक पात्र. त्यांना रंगवण्याची मजाही काही औरच आहे, असे ती सांगते.

कागदाच्या लगद्याच्या शिल्पांच्या विशिष्ट पोताचा तिने सुरेख वापर केलाय. त्याचे एक सौंदर्य जाणवते. बारीक नाजूक काम करण्याचा तिचा पिंडच नाही त्यामुळे या माध्यमात तिला बेधडक काम करायला मजा येते. रोज काम करताना स्वतःला नवीन काय करता येईल, यासाठी धडपडणारी भारती तिच्या अनुभवांतूनच विषय निवडते. मग तो कावळा असो किंवा मोटरबाईकवरचा माणूस. तिला जे दिसतं ते ती करते. तिची स्वतःची निराळी शैली आहे. ती बाटलीच्या आकारातून प्रेरित झाली. त्या आकाराशी ती खेळत जाते आणि तिचे शिल्प घडते. त्यांत घडतो एक संवाद, देवाणघेवाण. शीघ्र रेखाटने न करता विषयाची जाण आणि माहिती असल्यावर भारती मोकळेपणाने काम करते. ‘माझ्या डोळ्यासमोर असते ते आणि तेच मी करते.’ भारतीची पात्रं सर्वसामान्य असतात आणि त्यामुळेच ती आपल्या मनाला भिडतात. एक भाववाद जाणवतो तिच्या कामात. ‘आपण जसे असतो तसेच काम करायचा मी प्रयत्न करते’ म्हणणाऱ्या भारतीची सहजसोपी वाटणारी शिल्प अगदी आपलीशी वाटतात.

loading image
go to top