esakal | संगीत रंगभूमीवरील दैवी सूर!

बोलून बातमी शोधा

संगीत रंगभूमीवरील दैवी सूर!

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त त्यांचे स्मरणः

संगीत रंगभूमीवरील दैवी सूर!
sakal_logo
By
Team eSakal

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील अगदी लहान गावातून काही मुलं संगीताच्या ओढीनं उत्तरेकडे गेली. त्यात पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. रामकृष्णबुवा वझे, पं. देवजीबुवा परांजपे, पं. वासुदेवबुवा जोशी आणि पं. भास्करबुवा बखले हेही होते. भास्करबुवांच्या बाबतीत एक अनपेक्षित घटना घडली. किर्लोस्कर कंपनीत काम करीत असतानाच आवाज फुटला आणि हा मुलगा काही कामाचा नाही म्हणून अपमानित झालेले बुवा, "भास्करचा भास्करबुवा' होऊनच कंपनीत पाऊल टाकीन अशी प्रतिज्ञा करून थेट बडोद्यालाच आले. तिथून परत आले ते नावलौकिक मिळवूनच. 1916 मध्ये जालंधरला संगीत महोत्सवात त्यांचं गायन विशेषत्वाने रंगले आणि तेथील रसिकांनी बुवांच्या गाण्याची तारीफ तर केलीच, परंतु उत्स्फूर्तपणे त्यांना "देवगंधर्व' ही पदवी बहाल केली. माझ्या माहितीप्रमाणे भूगंधर्व रहिमतखॉंसाहेबांपासून अगदी आनंद भाटेंपर्यंत संगीतसृष्टीत आणि रंगभूमीवर अकरा (11) गंधर्व आहेत; पण देवलोकीचे गंधर्व एकमेव भास्करबुवा. ही खरीखुरी रसिक जाणकारांच्या पसंतीची दाद. बुवांनी भारत गायन समाजात गुरूपद स्वीकारून समाजाचा नावलौकिक वाढवलाच आणि मोठा शिष्यवर्ग निर्माण करून समाजाला स्वरश्रीमंत केलं.

परंतु, याहीपेक्षा बुवांचं मोठं योगदान म्हणजे संगीत स्वयंवर नाटकातील अभिजात संगीताचे संस्करण. संगीत नाटकाचा विषय येतो तेव्हा आद्य क्रांतिकारी नाटककार कै. अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाव दुर्लक्षित करू शकत नाही. कारण ही परंपरा संगीताच्या दृष्टीने संगीत स्वयंवर नाटकांत परिणत झाली. संगीत नाटकांत सुरुवातीला लोकसंगीत, कानडी चाली, काही प्रमाणांत शास्त्रीय संगीत, ललित संगीत म्हणजे उत्तरेकडील ठुमरी, दादरा, गझल, अगदी गुजराती गरबासुद्धा आविष्कृत झाला. आता प्रेक्षकांची संगीताची जाण अधिक प्रगल्भ झाली आहे. ही जाण बुवांना झाली हे त्यांच्या द्रष्टेपणाचेच लक्षण आहे. आता हे संगीत नाटक वळलं ते अभिजात संगीताकडे. प्रेक्षकांचं प्रबोधन करणं हे बुवांच्या मनात होतंच म्हणून यमन, भूप, बिहाग, भीमपलास, देसी, तिलककामोद, पहाडी यांसारख्या आम रागांतील बंदिशी नाटकांतील पदांकरिता निवडल्या. या नाटकाचं भाग्य असं, की थोर नाटककार कै. काकासाहेब खाडिलकर, रुक्‍मिणीच्या भूमिकेत बालगंधर्व आणि संगीत दिग्दर्शन देवगंधर्व भास्करबुवा यांचा त्रिवेणी संगम. या साध्या रागांपेक्षा अनवट रागांतील चालीही बुवा सहजी घालू शकले असते; पण त्या रुक्‍मिणीच्या गळ्यात शोभल्या असत्या का? गायनात रंगत असावीच पण, शास्त्राची संगत न सोडता, हे बुवांचं स्वतःच्या गायकीचं मर्म.

संगीत स्वयंवर नाटकाचे माझ्या आयुष्यातील मंतरलेले दिवस साहित्य संघ (मुंबई) या संस्थेमधून संगीत स्वयंवरमध्ये रुक्‍मिणीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. हे शिवधनुष्य मला पेलेल का, असा विचार मनात आलाच. पण नवीन शिकण्याची विलक्षण आवड असल्यामुळे मी ती संधी स्वीकारली. गंधर्वकंपनीतले, गंधर्व गायकीवर प्रेम करणारे जयपूर घराण्याचे थोर गायक कै. कृष्णराव चोणकर (संगीत दिग्दर्शक) पद्मश्री दाजी भाटवडेकर (दिग्दर्शक), सहकलाकार कोण तर पं. राम मराठे (कृष्ण), थोर गायक श्रीपाद नेवरेकर (भीष्मक), रुक्‍मी (दाजी), ऑर्गनवादक (गोविंदराव पटवर्धन), तबला ( रामूअण्णा पार्सेकर), व्हायोलिन (मधु बर्वे, पं. गजाननबुवा जोशींचे सुपुत्र मधु जोशी) असा सगळा दमदार संच. रुक्‍मिणीची भूमिकाही समजायला कठीणच. रुक्‍मिणी ही कृष्णावर प्रेम करणारी प्रेमिका; पण विचाराने प्रगल्भ, सात्त्विक, तेजस्वी आपल्या आई-वडिलांचा, कुळाचा स्वाभिमान जपणारी तिचं अवोगत भीमपलास रागांतील या पदांत दिसतं... स्वकुल तारक सुता, सुवरा वरूनी वाढवी वंश वनिता।।

सुकन्याच गृहिणीपदाला चढतात हे वाक्‍य बरंच अर्थपूर्ण आहे. याच्या जोडीला 19 पदं म्हणायची. कृष्णराव चोणकर गायक असल्यामुळे ते पदं बसवून देत नसत. रोज वेगवेगळ्या तऱ्हेने गायचे आणि ते सर्व घरी येऊन आठवून तंबोऱ्यावर गायचं हा माझा दिनक्रम. तीन-साडेतीन महिने संध्याकाळी पाच-साडेपाच वाजल्यापासून रात्री दोन-अडीचपर्यंत गद्य आणि पदांचा रियाज करावाच लागला कारण अशा थोर कलाकारांबरोबर काम करणं ही माझ्यावर मोठी जबाबदारी होती. स्वयंवर नाटकांत काम करत असताना सर्वांनीच मला आपुलकीने प्रोत्साहन दिलं म्हणूनच मी हे काम करू शकले. 1965 मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात हा प्रयोग झाला. (जवळजवळ साडेपाच तास) प्रेक्षागृह मुंबईच्या प्रतिष्ठित रसिक मंडळींनी भरलेलं होतं. पहिल्या रांगेतील बसलेल्या स्त्रियांच्या केसांत माळलेल्या गजऱ्यांचा सुगंध रंगमंचापर्यंत पोचत होता, जॉर्जेटच्या जरीचे काठ लावलेल्या साड्या किंवा खासकरून चंदेरी साड्यांची सळसळ रंगमंचावर जाणवत असे, तर रंगमंचावर रामभाऊंचं, नेवरेकराचं गाणं सुरू झालं, की प्रेक्षागृह स्तिमित होऊन तिथे नीरव शांतता असायची. पद संपलं, की उत्स्फूर्त टाळ्यांची दाद (सर्वांनाच) राजे महाराजे सर्वजण असे होते (उंचेपुरे, दणकट) की सगळा रंगमंच भरून जात असे. संगीत नाटकांत अगदी गद्य नटांनाही आवाज लावावा लागतो तोही सूरांमधूनच. गाण्यात काय किंवा पदांमधून काय स्वरसंवाद असावा लागतो. तरच संगीत नाटक रंगतं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी यांनी आमच्या नाटकांतील काही त्रुटी सांगून प्रशंसेची दाद दिली.

एकंदरीत संगीत स्वयंवर म्हणजे देवगंधर्व भास्करबुवांचा प्रतिभाशाली आविष्कार.
लीन घराण्यांची गायकी शिकून बुवांनी आपली गायकी सात्त्विक, प्रसन्न, प्रासादिक, हमखास रंगणारी म्हणून श्रोत्यांपुढे मांडली. बुवा हे संगीत, विद्या म्हणून शिकले पण कला म्हणून सादर केले. सादरीकरणातील त्यांचा दैवी सूर आम्हा सर्व रसिकांना आज ऐकता येत नाही याची खंत आणि वैषम्य वाटल्यावाचून राहत नाही.

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम।