सारांश : पर्रीकरांनंतरही भाजपने गोवा जिंकलं; पण गड गमावला!

किशोर शां. शेट मांद्रेकर
Wednesday, 29 May 2019

मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते. तेथील आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेसची आमदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यात भाजप प्रथमच लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरा गेला आणि संमिश्र यश मिळविले. मात्र पर्रीकर यांनी गेली 25 वर्षे एकहाती राखलेला पणजी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसने या वेळी हिसकावून घेतला. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सलग पाचव्यांदा उत्तर गोव्यातून विजय मिळवला, तर दक्षिण गोव्यातील खासदार नरेंद्र सावईकर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याशी जोरदार लढत दिली, तरीही नऊ हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. पोटनिवडणुकीत विधानसभेच्या चारपैकी तीन मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला. 

श्रीपाद नाईक यांनी निवडणूककाळात अनेक ठिकाणी जनतेचा रोष अनुभवला. पण बऱ्यापैकी मते त्यांना मिळाली. नाईक यांना बार्देश तालुक्‍याने हात दिला असला, तरी मतांची टक्केवारी कमी झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार गिरीश चोडणकर हे नाईक यांना आव्हान देऊ शकणार नव्हते, हे स्पष्टच होते. ते निवडणूक लढवीत नसते, तर पोटनिवडणुका असलेल्या मतदारसंघांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळाला असता. दक्षिण गोव्याचे रहिवासी असलेले चोडणकर यांचा उत्तर गोव्यात संपर्क नव्हता. कॉंग्रेसचे काही आमदार त्यांना नाईक यांच्या आघाडीजवळ पोचणारी मतेही मिळवून देऊ शकले नाहीत. दक्षिणेत कॉंग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने साथ दिली नसती आणि सालसेत तालुक्‍याने 50 हजारांची आघाडी दिली नसती, तर कॉंग्रेसला ही जागाही गमावावी लागली असती. मगोचे आमदार सुदिन ढवळीकरांनी भविष्यात कॉंग्रेस आणि मगो पक्ष एकत्र आले, तर भाजपसमोर खडतर आव्हान उभे राहू शकते, असे सांगून पुढील राजकारणाची दिशा काय असेल याचा अंदाज दिला आहे. 

भाजपच्या काही नेत्यांनी सरकारमधील गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांच्या मतदारसंघांत कमी आघाडी मिळाल्याचा प्रश्‍न पुढे केला आहे. भाजपने तीन जागा जिंकल्याने आघाडीतील घटक पक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला, तर सावंत सरकारला धोका पोहचू शकतो. मंत्रिपदासाठी भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली आहेच. विद्यमान मंत्र्यांनाही महत्त्वाच्या अधिक खात्यांची प्रतीक्षा आहे. म्हणूनच भाजपला सरकार चालवताना काळजी घ्यावी लागेल. 

म्हापसा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी त्यांचे पुत्र जोसुआ डिसोझा विजयी झाले. डिसोझांचा विजय झाला असला, तरी कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी त्यांना जोरदार आव्हान दिले. या ठिकाणीही भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते प्रचारात होते. तरीसुद्धा वडील माजी आमदार फ्रान्सिस डिसोझा मिळवत असलेली मते त्यांच्या पुत्राला मिळवता आली नाहीत. मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीची जागा रिक्त होती. ही जागा कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ (बाबुश) मोन्सेरात यांनी जिंकल्याने भाजपला हादरा बसला.

पणजीतून पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांना पसंती दिली. त्यामुळे पक्षकार्यकर्ते नाराज होते. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेची जागा गमावल्याने भाजपला भविष्यात विधानसभेसाठी सावध पावले उचलावी लागतील. भाजप विधानसभेत आता "नंबर वन' बनला आहे. त्यासाठी भाजपने पहिल्यांदा कॉंग्रेसच्या दोन आमदारांना फोडले, नंतर मगो पक्षाचे दोन आमदार आणले. 

मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते. तेथील आमदार दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेसची आमदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते दोघेही निवडून आले. पण शिरोडकर यांचा अवघ्या 76 मतांनी झालेला विजय हा बढाया मारण्याएवढा मुळीच नाही. उलट विरोधातील मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ही लढत जिंकली, असेच म्हणावे लागेल. सोपटे यांच्या मार्गात भाजपचे या मतदारसंघातील माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अडथळे आणले. मतदानाला दोन दिवस असताना पार्सेकर हे त्यांचे पाठीराखे अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांच्या प्रचारात उतरले. पण पार्सेकरांच्या मदतीशिवायही आपण जिंकू शकतो हे सोपटे यांनी सिद्ध केले. 

राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख आणि गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष व उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यांना पणजीत अवघी पाचशे मते मिळाली. अन्य तीन पोटनिवडणुकांतही त्यांच्या उमेदवारांची स्थिती दयनीय झाली. "आप'लाही दोन्ही लोकसभा मतदारसंघांत वीस हजार मतांचाही टप्पा पार करता आला नाही, ही एकच बाब त्या पक्षाची स्थिती स्पष्ट करते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Won Loksabha Election in Goa After Parrikar Death