ढिंग टांग : जुळली मने तरीही-! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

ढिंग टांग : जुळली मने तरीही-!

अतिप्रिय मित्रवर्य मा. रा. साहेब यांसी, प्रेमभराचा जय महाराष्ट्र. सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हा सर्वांना (पुन्हा) अनेक शुभेच्छा. पत्र लिहिण्यास कारण की, हल्ली मी मुंबईत असतो. पूर्वी ठाण्यात असे! (मध्ये टोल नाका येई…) ठाण्याहून मुंबईला जाताना रोज दादर लागत असे. तेथे शिवाजी पार्कवर आपणही जावे आणि (आपल्या घरी) जेवून यावे, असे फार वाटत असे. बाकीचे नेते तुमच्या घरी येऊन जेवून जात असत. (नंतर भारी भारी वर्णने करत असत.) माझे मन खट्टू होत असे. तुमच्या घरी येण्यासाठी निदान (माजी) मुख्यमंत्री होणे तरी भाग आहे, हे माझ्या लक्षात आल्याने मी उचल खाल्ली. तडक उठून सुरतेला निघून गेलो. पुढले सारे काही आपल्याला ठाऊक असेलच. महाराष्ट्राचा कारभारी झाल्यानंतर तीनदा तरी आपल्या घरी येण्याचा योग आला. गेल्या आठवड्यात तुमच्या घरी (दिवसा) येऊन गेलो. वेगळेच वाटले! बऱ्याचदा माझे अनेकांकडे जाणे होते. पण सवयीने रात्री अकरानंतरच जाणे होते. अशी खूप घरे आहेत. रात्री डोळे बांधून मला सोडा, मी पोहोचेन. पण दिवसा अड्रेस सापडणे मुश्किल होईल! असो.

तुमच्याकडचा दीपोत्सव बघून घरी आलो. आता कोणाकडे जावे असा विचार करत एकटाच बसलो असताना अचानक काहीतरी घडले आणि एक गझल जन्माला आली. मुख्यमंत्री झाल्यापासून अधून मधून असे काहीतरी होते…असो. अर्ज किया है -

जुळली मने तरीही, तारा कशा जुळाव्या

माझ्या मनातील भावना, तुजला कशा कळाव्या

चिवड्यात शेंगदाणे वा काप खोबऱ्याचे

झारा हवा तुझा रे, चकल्या कशा तळाव्या

दोघे मिळून अपुला व्हाट्सॅप ग्रुप व्हावा,

डीपीस आपुल्या रे, वाहवा कशा मिळाव्या

माझ्याच प्राक्तनाची होतील रिक्त खोकी,

त्यातील चीजवस्तू , तुजला कशा मिळाव्या

कमळेस घाबरोनी, तू जाऊ नकोस दूर

बाकी इडापीडा रे, सुंसाट त्या पळाव्या…

…अशी गझल अवतरली! कशी वाटली, कृपया कळवावे. तुम्ही व्यंगचित्रे काढता, कलावंत मनाचे आहात, असे ऐकले आहे. म्हणून पाठवतो आहे. गझलेचा अर्थ (आणि अक्षर) लावून घेणे. अधिक काय लिहू? पुन्हा भेटीच्या अपेक्षेत.

आपला कर्मवीर भाईसाहेब

प्रिय कर्मवीर, जय महाराष्ट्र. तुमचे पत्र मिळाले. रोज रोज दिवाळीच्या शुभेच्छा कसल्या पाठवता? भेटलो होतो, तेव्हा दिल्याच होत्याना शुभेच्छा!.. हॅ:!! आमच्या घरी बरीच माणसे जेवायला येत असतात. त्याची वर्णनेही करुन सांगतात. पण ते सगळे ठरवलेले असते. तुम्हीही ठरवा! (आणि वर्णन करा!) आल्यागेल्या एका माणसाच्या जेवणाची सोय आमच्याकडे नक्कीच होऊ शकते. मात्र, जेवायला येणार असाल, तेव्हा आधी कळवा. आणि हो, दिवसाढवळ्याच या! रात्री उशीरा जेवणे आम्ही सोडले आहे! आधी कळवलेत तर थांबू! अचानक धडकलात तर फोडणीचा भात (फारतर) मिळेल! आमच्याकडे रोज जेवणावळी नसतात. असो.

महाराष्ट्रात परिस्थिती काय, गझला कसल्या करताय? हॅ:!! कलावंत मनाचा असलो म्हणून इतका गैरफायदा घ्याल काय? इथे येऊन इतके भिकार काव्य करणार असाल तर तुमचे आमचे जमणे कठीण आहे.

माझे सोडा, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही काही वेगळे येईल. अधून मधून तुम्हाला असे काहीतरी होते, असे तुम्ही म्हटले आहे. कुणाला तरी दाखवून घ्या! असे वारंवार होणे बरे नाही.

आपला रा. साहेब. (शिवतीर्थ)