
ढिंग टांग : आम्ही कोण म्हणुनी काय पुसतां...!
आजची तिथी : श्रीशके १९४४ माघ कृ. प्रतिपदा.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : आम्ही कोण म्हणुनी काय पुसता,
आम्ही असू लाडके ‘देवा’चे!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) माघ पौर्णिमेच्या मंगलदिनी काल वर्ध्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जाऊन दणक्यात भाषण ठोकून आलो. माझे भाषण ऐकून मांडवातले तमाम साहित्यिक एवढे प्रभावित झाले होते की त्यांच्या तोंडून क्षणभर शब्द फुटेना. एवढे शब्दांचे शिल्पकार हे...पण माझ्यापुढे गतप्रभ झाले. मांडवात बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या, कारण थक्क झालेले साहित्यिक आणि रसिक मांडवाबाहेर ताटकळत उभे होते.
साहित्य संमेलनाच्या मांडवात राजकारण्यांना येऊ देऊ नये, असे एकेकाळी म्हटले जायचे. लेखकांच्या मंचावर राजकारण्यांचे काय काम? हा सवाल रास्तच आहे. (तरीही आम्ही राजकारणी मंडळी घट्टपणे जात असूच. जाणारच.) भाषणामध्ये मी याचे चपखल उत्तर दिले. राजकारणी हेच साहित्याचे खरे प्रेरणास्थान आहे, असे मी ठाम प्रतिपादन केले.
आम्ही नसतो तर व्यंगचित्रकारांनी काय रांगोळ्या काढल्या असत्या? आम्ही नसतो तर हास्यकवी संमेलनांचे रुपांतर शोकसभेत नसते का झाले? आम्ही नसतो तर सामाजिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी साबणचुरे नसते का विकले? आम्ही नसतो तर चित्रपटाच्या स्क्रिप्टा कशा लिहिल्या असत्या? माझ्या भडिमाराने मांडवातले तमाम साहित्यिक शतप्रतिशत निरुत्तर झाले.
तसे आम्ही राजकारणीही उत्तम प्रतीचे साहित्यिक असतोच. रोज सकाळी नऊ वाजता टीव्ही लावला की साहित्य ओसंडून वाहू लागलेले पाह्यला मिळते. कधी तो साहित्याचा लोंढा भांडुपमधून उगम पावतो, किंवा नागू सयाजीवाडीच्या एका मुखपत्राच्या (मी हे नाव उच्चारत वा लिहीत वा वाचत नाही!) इमारतीमधून बाहेर येतो. कधी कधी दिल्लीतूनही हा ओहोळ बाहेर पडतो. आणखीही अनेक साहित्यिक आमच्यात आहेत. काही शीघ्रकवी आहेत. सहज आठवले म्हणून उदाहरण देतो :
आम्ही आहोत हुशार राजकारणीऽऽऽ
म्हणून खातो सगळे सत्तेचे लोणी
आम्ही गातो लोकशाहीची गाणी
म्हणून काँग्रेस मागते पाणी पाणी!
आमचे साहित्य सर्वात सरस कारण
आम्ही आहोत हुशार राजकारणीऽऽ...
...शेवटच्या ओळीत यमक जुळले नाही, हे खरे. पण त्यामुळे आशय अधिक उठावदार झाला, असे वाटते. (आम्ही समीक्षकही आहोत म्हटले!) असे कितीतरी शीघ्रकवी निरनिराळ्या रंगाचे कोटटाय घालून वावरत आहेत. त्यांना साहित्य संमेलनात जागा कां म्हणून द्यायची नाही? द्यायलाच हवी. गेल्या खेपेला नाशिकला झालेल्या संमेलनाच्या वेळी वीरपुरुषांचा अपमान केल्यामुळे ‘अशा ठिकाणी का जायचे?’ असा प्रश्न मीच केला होता.
(आणि गेलो नव्हतो.) पण यंदा वर्ध्याला जाणे भागच पडले. तिथे जाऊन दणकून भाषण करण्याचे आधीच ठरवले होते. त्यामुळे तयारीने गेलो. तयारी वेगळी काही केली नाही. फक्त विदर्भ साहित्य संघाला दहाएक कोटीचे अनुदान जाहीर करुन टाकले. त्याआधी संमेलनाचे सरकारी अनुदान पन्नास लाखावरुन दोन कोटींवर नेऊन ठेवले. एवढे झाल्यावर काहीही बोललो तरी माझे भाषण ऐकले जाणारच होते, नव्हे, गाजणारच होते!!
‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसता दांताड वेंगाडुनी...’ अशी एक मराठी कविता शाळेत असताना वाचली होती. तीच म्हणून दाखवणार होतो. पण ती कविता नसून आचार्य अत्र्यांची झेंडूची फुले आहेत, हे कळल्यावर भाषण ठोकून आलो. पुढल्या वेळेला तुम्हाला अध्यक्ष म्हणून बोलावले तर याल का? अशी विचारणा केली जात आहे. बघू!