ढिंग टांग : युद्धस्य कथा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 politics

ढिंग टांग : युद्धस्य कथा...!

निर्विमान आभाळाकडे नजर ठेवत

खांद्यावरची बंदूक हातात घेत

वासिली गेन्नायेविचने आभाळात

टाकली एक नजर...

निर्मनुष्य नभात कुठे कुठे

तरंगत होते तुरळक ढग,

दक्षिणेकडे गिधाडांची फौज

उंच उंच घिरट्या घालत

हळू हळू जमिनीकडे सरकत होती...

आसमंत चिडीचूप होता,

जणू अकिरा कुरोसावाच्या

चित्रपटातील मौन दृश्यासारखा

स्थलातीत. कालातीत.

- दूरवर पडलेला एक मोडका रणगाडा,

- निकामी तोफा आणि रखरखीत परिसर...

नजर वळवून तो शेजारच्या ओनिलला

म्हणाला, ‘‘हे युद्धबंधो, आज आहे

आपल्या युद्धाचा पहिला बर्थ डे!

तीनशेपासष्ट दिवस जिवंत राहिल्याबद्दल

आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई

का करु नये? याचा पुढील अठ्ठेचाळीस

तासात (जिवंत राहिल्यास) खुलासा करावा!’’

ओनिलच्या डोळ्यासमोर तरळून गेले

तीनशेपासष्ट दिवस.

खिंडारलेल्या इमारती. वेळीअवेळी

भेसूरपणे केकाटणारे युद्धमानतेचे भोंगे.

धुराचे लोट सोडणाऱ्या फौजी गाड्या.

इतस्तत: पसरलेली सैनिकांची कलेवरे.

प्रचंड ताकदीच्या स्फोटकांचे

क्षितीज उजळणारे चमचमते विस्फोट,

परदेशी क्षेपणास्त्रांची घरघर, आणि

क्षणार्धात आडव्या होत, घसरत

घरंगळत, उलट्यापालट्या होत

आगीच्या लोळात लपेटलेल्या अँब्युलन्स.

विव्हळणाऱ्या घायाळांची इस्पितळातली गर्दी

बेघरांचे तांडे. ताटातूट झालेली मुले...

ओनिलच्या सुकलेल्या डोळ्यात

ना आकळले होते मृत्यूचे भय,

ना साकळली होती जिजीविषा.

खंदकातल्या विश्वात निव्वळ

जिवंत राहण्याची धडपड करणाऱ्या

संपूर्ण युक्रेनला मनातल्या मनात

कुर्निसात करत त्याने खिशातून

राशनमधला शिळा डोनट काढून

वासिलीसमोर धरला, म्हणाला :

‘‘मित्रा, युद्धाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त

हा केक मी तुला भरवत आहे...’’

तेवढ्यात-

युद्धाचा सायरन वाजला, आभाळात

दूरवर विमानांचा सुरु झाला घरघराट

क्षेपणास्त्रांची एक मालिका

उजळून गेली क्षितिजे.

हातातला डोनट टाकून दोघांनीही

बंदूक परजली, आणि एकमेकांना

ते म्हणाले, ‘‘परकीय मदत आलेली दिसते,

चला, युद्ध सुरु ठेवायलाच हवं!

मदतीशिवाय युद्ध नाही, आणि

युद्धाशिवाय मदतही नाही!

टॅग्स :Editorial Article