
ढिंग टांग : बॉम्बाबॉम्ब...!
महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ ऊर्फ सरनोबत संजयाजी यांची थोरवी, गावी तितकी कमीच. किंबहुना आम्ही मध्यंतरी ‘संजयाजीचा पोवाडा’ रचत आणलाही होता. परंतु, तेवढ्यात महाराष्ट्रात थंडी वाढल्याने अनेकांना कापरें भरले, त्यात आमचाही घसा बसला!!
रा. संजयाजी यांनी दोन हजार कोटींचा नवा बॉम्ब शिलगावून महाराष्ट्रात धुडुमधडाड राजकीय विस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटाच्या कानठळ्या बसून अनेकांच्या कानांचे पडदे फाटले. पार दिल्लीपर्यंत याचे हादरे जाणवले, असे बोलले जाते.
परंतु, काही जणांच्या मते असा काही बॉम्ब फुटलाच नाही, कारण तो अस्तित्त्वातच नाही!! एवंच कुणाच्याही कानठळ्या बसण्याचे कारण नसून काही जणांच्या कानांचे पडदे वेगळ्या कारणामुळे फाटले असतील, असा काही जणांचा दावा आहे. हे ‘काही जण’ कमळ पार्टीचेच असणार, यात काय ती शंका? असो.
दोन हजार कोटींच्या बॉम्बबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही थेट सरनोबत संजयाजी यांचीच म्यारेथॉन मुलाखत घेण्याचे ठरवले. मुलाखत नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. महाराष्ट्राच्या मनातील प्रश्नांना रा. संजयाजी यांनी मनमोकळी उत्तरे दिली. त्यांच्या मुखातून अंगार बरसत होता. मराठी संस्कृतीबद्दलची माया टपकत होती, आणि सकारात्मकतेचे शिंतोडे उडत होते. मुलाखतीचा अल्पसा अंश :
प्रश्न : क्या चल रहा है? (हा प्रश्न म्यारेथॉन मुलाखतीत अनिवार्य आहे. न विचारल्यास ‘फाऊल’ मानला जातो, म्हणून विचारला.)
उत्तर : यह कौन पूछ रहा है, वो पहले बताव!!
प्रश्न : तुम्ही दोन हजार कोटींचा बॉम्ब फोडलात, त्याबद्दल विचारायचं होतं...
उत्तर : तुम्ही दिल्लीच्या पोपटरावांचे हस्तक का?
प्रश्न : नाही! पण दोन हजार कोटींचा बॉम्ब कुठे मिळाला?
उत्तर : आमचं एक स्पेशल बॉम्बशोधक पथक आहे! हा महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा!
प्रश्न : (भुईचक्र जपून ओलांडत...) हा कुणाचा कट असावा?
उत्तर : (डोळे बारीक करुन) देश का बच्चा बच्चा जानता है के गब्बर सिंग कौन है...
प्रश्न : (उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत) तुमच्या बॉम्बशोधक पथकात कुणी स्फोटकतज्ञ आहेत का?
उत्तर : (दिलखुलासपणे) छे! ज्याप्रमाणे मी नेहमी कंपौंडरकडून औषधं घेतो, डॉक्टरकडून नव्हे! त्याचप्रमाणे बॉम्ब शोधण्यासाठी आम्ही एका नाण्याची नियुक्ती केली आहे!
प्रश्न : (गोंधळून) नाणं?
उत्तर : (डोळे मिटून हसत) करेक्ट नाणंच! छापाकाटा करण्यासाठी!! छापा आला तर नो बॉम्ब, काटा आला तर धुडुम धडाम!! हाहा!!
प्रश्न : कसा दिसतो हो दोन हजार कोटीचा बॉम्ब?
उत्तर : (चापटपोळी खेळताना नाचवतात, तसे हात नाचवत) हा एवढा एवढा तरी असेल! खोका टाइप!!
प्रश्न : तुमच्या या आरोपात काहीही दम नाही, असं विरोधक म्हणतात! तुमच्या बॉम्बचा आवाजसुद्धा झाला नाही, असं ते म्हणतात! तुमचं मत काय आहे?
उत्तर : ते बहिरे आहेत, बहिरे! कान फुटलेत त्यांचे! कानात बोळे कोंबलेत त्यांच्या!!
प्रश्न : (हा शेवटचा प्रश्न ठरला...) तुमचा बॉम्ब दोन हजार कोटींचा, तर किरीट सोमय्यांचे बॉम्ब किती कोटींचे? म्हंजे...असं ते ‘काही लोक’ विचारताहेत!
उत्तर : (संतापाने खराखुरा दोन हजाराचा स्फोट घडवत) ...त्या पाजी ** *** चं नावसुद्धा उच्चाराल तर याद राखा! गाठ माझ्याशी आहे! चला, निघा!! थोबाड काळं करा! फूट!!