प्रदूषणाच्या राजधान्या!

भारतीय संस्कृती आणि साहित्यात शरदाच्या महिम्याचे हे चांदणे अगदी टिपूर पडले आहे, असे म्हणता येईल.
pollution
pollution sakal

स्वच्छ हवा हा सर्वच लोकांचा मूलभूत हक्क आहे.

टॉम कार्पर,

अमेरिकी राजकीय नेते

रामचरितमानसात संत तुलसीदासांनी शरद ऋतूचे मोठ्या गोड शब्दांत कौतुक केले आहे. ‘बरखा बिगत सरद ऋतु आई। लछिमन देखहु परम सुहाई,’ अर्थात, ‘लक्ष्मणा, पाहा! वर्षाराणी वृद्ध झाली, तिच्या वृद्धत्वाचे पुरावे जणू कास फुलांचे शुभ्र केसच देत आहेत, आणि सुहावना असा शरद ऋतू अवतरला आहे’, असे वर्णन रामचरितमानसात येते.

भारतीय संस्कृती आणि साहित्यात शरदाच्या महिम्याचे हे चांदणे अगदी टिपूर पडले आहे, असे म्हणता येईल. गूढरम्य चांदण्या रात्री, आणि मंद समीरण लहरींनिशी मौसम सुहाना करणारा हा ऋतुराज यंदा मात्र पुरता काळवंडून गेलेला दिसतो. हे शरदाचे दिवस आहेत, यावर विश्वास बसणार नाही, अशी हवा सध्या सर्वदूर पडली आहे. देशातली बहुतेक सर्व प्रमुख शहरे प्रदूषण आणि खराब हवामानामुळे गुदमरून आहेत. आभाळ ढगाळ आणि उदासवाणे झाले आहे, आणि चांदण्याचा तर कुठे पत्ताच नाही.

सर्वत्र प्रदूषित हवेचे थर तरंगत आहेत. हवेत दिसतो तो धुरांचा काळवंडलेपणा आणि एकप्रकारचा शिळेपणा. या वाईट हवामानात राजधानी दिल्ली पार गुदमरली. वाहनांनी ओकलेला धूर, अनिर्बंध कारखाने, वेगाने उभी राहणारी बांधकामे आणि त्यात शेतातला राब जाळण्याचे दिवस…अशा अनेक कारणांमुळे दिल्लीची हवा बिघडली. दिल्लीतल्या हवेचे काय करायचे, यावर कोर्टकज्जे सुरु असतानाच आता पाठोपाठ मुंबई-पुण्याच्या हवेनेही आपला ठाव सोडल्याचे दिसून येत आहे. बंगळूर, चेन्नईसारखी महानगरेही प्रदूषणग्रस्त आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र दमा आणि खोकल्याने बेजार झालेली माणसे दिसू लागली आहेत. साऱ्यांचा श्वास एकाच वेळी असा कोंडण्याचे कारण काय असावे? उत्तर शोधायला गेले तर प्रश्नच अधिक हाताला लागतात.

त्यात भर पडली आहे ती सध्या थंडावलेल्या वाऱ्यांची. संपूर्ण देशात फारसे वारेच वाहेनासे झाल्याने हवेतील प्रदूषक आणि धूलिकण खालच्या स्तरावरच तरंगत राहिल्याने ही परिस्थिती चिघळली. एरवी हे वारे फार संजीवक असतात. समुद्राचा शेजार लाभलेली मुंबई तर या वाऱ्याच्या हालचालीमुळेच तग धरुन असते. एरवी दीड कोटी लोकसंख्येचे हे महानगर सपशेल गुदमरुन गेले असते. घनदाट लोकसंख्या, वाहनांची बेसुमार गर्दी, धूर ओकणारे उद्योगधंदे, प्रदूषणप्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन अशा कितीतरी कारणांमुळे मुंबई रहिवासास अयोग्य ठरली असती. परंतु, नेमाने वाहणारे वारे न चुकता मुंबईची दूषित हवा वाहून नेतात. नव्या ताज्या हवेचा रतीब घालत राहतात. सध्या हे वारेच, असंतुष्ट सफाई कामगारांप्रमाणे संपावर गेले आहेत.

पुणेकरांना तर आपल्या शहरातील हवेचा अभिमान वाटत असे. गेल्या काही वर्षात हा लौकिक लयाला गेल्यात जमा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे आता प्रदूषित हवेची शहरे ठरताहेत. शहरांची नियोजनशून्य वाढ, दर्जेदार सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे बेसुमार खासगी वाहनसंख्या, मेट्रोपासून महत्त्वाच्या रस्त्यांच्या डागडुजीपर्यंत अनेक विकासकामे एकाच वेळी सुरू झाल्याने सर्वत्र गोंगाट आणि प्रदूषण यामुळे पुण्याची स्थिती अक्षरशः दयनीय झाली आहे. या शहरातील बांधकामांचा वेगही धडकी भरवणारा आहे. विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे सध्या प्रदूषणाचे पाळणाघर झाले आहे.

हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी प्राय: एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हे संख्यात्मक प्रमाण वापरले जाते. त्यानुसार पुण्याची हवा १६१ निर्देशांकापर्यंत गेली. मुंबईत हेच प्रमाण १४५ पर्यंत दिसून आले, तर दिल्लीच्या हवेतला बिघाड काही दिवसांपूर्वी ४०२ निर्देशांकापर्यंत मोजला गेला. सर्वसाधारणपणे १०० निर्देशांकापर्यंतची हवा ‘बरी’ मानली जाते. या वेगाने पुण्याची हवा घसरत गेली तर ती दिल्लीशीही स्पर्धा करु लागेल, अशी भीती आहे.

दिल्ली प्रशासनाने तातडीचा उपाय म्हणून सम-विषम क्रमांकाची वाहने एक दिवसाआड रस्त्यावर उतरवणे, शाळांना सुट्या देणे, बांधकाम ढिगाऱ्यांची ने-आण करणारी वाहने काही काळ बंद ठेवणे, असे प्रयत्न हाती घेतले आहेत. कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडून धूलिकण खाली बसवावेत, असेही दिल्ली सरकारने केंद्राला सुचवले आहे. असलेच काही उपाय मुंबईतही लागू करण्यात आले असून पुण्यात तर एन-९५ सारखे सुरक्षित मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अर्थात यातले कुठलेच प्रयत्न पुरेसे नाहीत, हे उघड आहे. ‘आधी जागे का झाला नाहीत? ही महानगरांची हत्याच आहे’ असे जळजळीत उद्गार मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढावे लागले.

ते अजिबात अतिशयोक्त मानता येणार नाहीत. नेमकी दिवाळी तोंडावर आलेली असताना आता असल्या हवेत फटाक्यांची भर पडणार आहे. ‘बेरियम’ या जहरी रसायनाचा उपयोग करुन तयार करण्यात आलेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने देशभरात बंदी आणली आहे, ते योग्यच आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही दिवाळीत फक्त सायंकाळी सात ते १० या वेळेत फटाके वाजण्याची अनुमती दिली आहे. नागरिकांनी यास निर्बध न मानता कर्तव्य मानायला हवे. आधीच प्रतिकूल बनलेल्या परिस्थितीत निदान आपण मानवनिर्मित भर नको घालायला, एवढा विवेक बाळगला, तरी पुष्कळ झाले. पुढील पिढ्यांनी शारदीय सौंदर्याचा आनंद लुटावा, असे वाटत असेल तर आज नियम पाळायलाच हवेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com