आत्महत्या रोखण्यासाठी सुसंवाद वाढायला हवा, वाचा सविस्तर...

आत्महत्या रोखण्यासाठी सुसंवाद वाढायला हवा, वाचा सविस्तर...

आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी समाजातूनच प्रयत्न व्हायला हवेत. सामाजिक सुसंवाद वाढायला हवा. हा टोकाचा मार्ग पत्करण्यामागची मूळ करणे शोधणे आवश्‍यक आहे.

दरवर्षी जगभरात सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करतात, यामध्ये एक लाख 35 हजार (17 टक्के) आत्महत्या भारतीयांच्या आहेत. देशांतर्गत आत्महत्या करणाऱ्या राज्यांची आकडेवारी पाहता 11.9 टक्के घटना नोंदीसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्महत्येसाठी क्षणिक किंवा सतत सतावणारी समस्या कारणीभूत असू शकते. व्यक्तीचे सामाजीकरण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक समस्या, व्यसन, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, नातेसंबंधाच्या समस्या, कौटुंबिक गतिशीलता, नैराश्‍य, शारीरिक व मानसिक आजार अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यामागे असू शकतात. त्यापैकी काही आपण येथे पाहू. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कामाचा ताण : कामाच्या ठिकाणचे असमाधान, विविध जबाबदाऱ्या पेलण्याची असमर्थता, कामाचे ताण-तणाव यासारख्या गोष्टी आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. 

युवक व आत्महत्या : आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कुमारावस्था आणि तरुण वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे. भौतिक सुखाची अपेक्षा, एकतर्फी प्रेम आणि फसवणूक, शैक्षणिक आणि इतर गोष्टींमध्ये आलेले अपयश आणि अपेक्षाभंगामुळे भविष्याबाबतचे नकारात्मक विचार ही तरुणांच्या आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. 

वैवाहिक कलह : जोडप्यांमधील वैवाहिक कलह, जबाबदाऱ्या व व्यवस्थापन, कुटुंब, एकमेकांपासूनच्या अवास्तव अपेक्षा आणि अपेक्षांभंगानंतर येणारे नैराश्‍य, दुय्यम वागणूक, नात्यांमधील दुरावे, कमी झालेला संवाद, जोडप्यांमध्ये नातेवाइकांचा होणारा हस्तक्षेप, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, व्यावसायिक अपयश व नुकसान, सापत्नपणाची वागणूक, सततची अपराधीपणाची भावना, कर्जाचा डोंगर, भौतिक सुखाची अपूर्ती आणि न पचणारे अपयश या सर्व अडचणीमध्ये गुरफटलेली व्यक्ती आत्महत्येसारखा मार्ग निवडते. त्यामुळे अशा समस्या पुढे येऊन चर्चिल्या पाहिजेत आणि या जोडप्यांना सुखी संसारासाठी विवाहपूर्व आणि वैवाहिक समुपदेशन केले पाहिजे. 

गंभीर आजार, वृद्धत्व आणि नैराश्‍य ः "आजारपणामुळे मला कुटुंबाचे ओझे बनून जगायचे नसल्याने यातून मुक्ततेसाठी आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे', यांसारखे विचार आजारी व्यक्तीस सतावत असतात आणि त्यामुळेच अशी गंभीर आणि दीर्घ आजारी व्यक्ती स्वतःला संपविण्याचा चुकीचा निर्णय घेत असल्याचे दिसून येते. कुटुंबातील व्यक्तीकडून, नातेवाईकांकडून किंवा समाजाकडून मिळत असलेली वाईट वागणूक, विविध शेरे, टोमणे आणि या सगळ्यांमुळे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे अशा व्यक्तींना आणि कुटुंबीयांना वेळीच समुपदेशनाची, भावनिक किंवा मानसिक आधाराची आवश्‍यकता आहे. एकटेपणाचे आयुष्य जगत असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि वेगवेगळ्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरतात आणि सर्व काही संपत चालले आहे, असे टोकाचे विचार मनात येऊन ते आत्महत्येसारखा निर्णय घेतात. ज्येष्ठांना योग्य आधार व आपुलकीची वागणूक मिळाली, कुटुंबाचा आधार मिळाला की बहुतांश ज्येष्ठ हा मार्ग निवडणार नाहीत, याची खात्री आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महिलांवरील अन्याय, अत्याचार : भारतात आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणित आत्महत्या करण्याचे प्रमाण हे दर दहा लाख लोकसंख्येमागे 16.4 टक्के असे असून जगाच्या आत्महत्येच्या क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. बालपणापासूनचे लैंगिक अत्याचार, वैवाहिक जीवनातील विविध समस्या व अत्याचार, इतर अन्याय-अत्याचार, बलात्कार, वैवाहिक जीवनामध्ये पतीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, पतीचे व्यसन, शारीरिक व मानसिक छळ अशी अनेक कारणे स्त्रीला मोकळा श्वास घेऊन जगू देत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक वैयक्तिक, वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या आणि त्याच्याशी संबंधित हिंसाचाराला बळी पडणाऱ्या स्त्रिया नाइलाजाने आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात. या स्त्रियांना मानसिक आधाराची, तसेच यास जबाबदार असणाऱ्या समाजाची मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता आहे. आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे हा कोणत्याही समस्येवरील विवेकी पर्याय नसून लोकांनी  नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाइकांशी आपल्या घुसमटीबाबत बोलून व्यक्त झाले पाहिजे. शिवाय त्या संबंधितांनीही वेळोवेळी बोलून अशांना समजून घेतले पाहिजे, व्यक्त होण्याची संधी निर्माण केली पाहिजे व नकारात्मकता घालवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. आपल्या संपर्कातल्या व्यक्तींच्या वर्तनामध्ये अचानक झालेले बदल, यांच्यातील नकारात्मकता, उदासीनता किंवा नैराश्‍य ओळखायला शिकले पाहिजे. याचे कारण यातूनच अनेकांच्या किंवा आपल्या प्रियजनांच्या आत्महत्या रोखण्यास किंवा  त्यांना यापासून परावृत्त करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे स्वतः व्यक्त होणे, इतरांना व्यक्त होण्याची संधी निर्माण करणे गरजेचे असते. मानसिकदृष्ट्या सदृढ समाज घडविण्यासाठी आणि व्यक्तींचे भावनिक व मानसिक मजबुतीकरण करण्यासाठी पुढे सरसावणे आवश्‍यक आहे. 
 
लहान वयातील समस्या 
लहानपणापासून लादले गेलेले निर्णय, जबाबदाऱ्या, चुकीचे पालकत्व, दबल्या गेलेल्या भावना, इच्छा-आकांक्षांचा चुराडा, लैंगिक शोषण व या सर्वांमुळे विकसित न झालेले व्यक्तिमत्त्व अशा अनेक गोष्टी किशोरवयीनांना आत्महत्येसाख्या चुकीच्या निर्णयाकडे वळण्यास कारणीभूत ठरतात. 

पालकांची जबाबदारी 
व्यावहारिक नीतिमूल्यांचा संस्कार, आत्मविश्वास विकसित करणे, स्वावलंबन आणि स्वनिर्णयक्षमतेसाठी पालकांकडून मिळालेले प्रोत्साहन यांचा मुलांच्या वाढीवर चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न त्या दिशेने असायला हवेत. 

(लेखक कर्वे समाज संस्थेत "मानसिक आरोग्य केंद्रा'चे अध्यक्ष आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com