शिवरायांनी ‘महाराष्ट्र’ हे नाव सार्थ केले

सहा जून १६७४ या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले.
Shivrajyabhishek
ShivrajyabhishekSakal

शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाच्या औचित्याने प्रसिद्ध झालेल्या ‘शिवराज्याभिषेक - भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या ग्रंथाचे संकलक अनिल पवार यांच्याशी चेतन कोळी यांनी साधलेला संवाद.

शिवरायांच्या राज्याभिषेकावर समग्र ग्रंथ साकारावा, यामागची नेमकी प्रेरणा काय?

सहा जून १६७४ या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले. याच दिवशी शिवराय सुवर्णसिंहासनावर विराजमान झाले आणि रयतेच्या लोककल्याणकारी ‘स्वराज्या’वर शिक्कामोर्तब झाले.

हा दिवस आपल्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा पहिला बुलंद उद्घोष होता; पण शासकीय स्तरावर हा दिवस आजवर अधिकृतपणे साजरा केला जात नव्हता, हे वेदनादायी होतं. सहा जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा, यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला.

अखेरीस शासनाने सहा जून हा दिवस ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून जाहीर केला; पण हा दिवस केवळ उत्सवी रूपात आणि वार्षिक कर्मकांडाप्रमाणे साजरा न होता त्याला भक्कम वैचारिक अधिष्ठान असावे, असे मला वाटत होते.त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला.

या ग्रंथाच्या निर्मितीप्रकियेविषयी ...

राज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेची समग्र मांडणी करणारे, त्याचे संतुलित विश्लेषण करणारे एकही पुस्तक माझ्या पाहण्यात आले नव्हते. उपलब्ध साहित्यात या विषयासंदर्भातील ज्ञानाचे मोती इतस्ततः विखुरलेले असल्याचे मला जाणवत होते.

मी आणखी काही ग्रंथ धुंडाळण्याचे ठरवले. तब्बल वर्षभर माझा अभ्यास सुरू होता. ज्यांनी आपली उभी हयात इतिहास संशोधनासाठी व ग्रंथलेखनार्थ समर्पित केली अशा - न्यायमूर्ती म. गो. रानडे, राजारामशास्त्री भागवत, कृ. अ. केळुसकर, वि. का. राजवाडे, वा. सी. बेंद्रे, द. वा. पोतदार, त्र्यं. शं. शेजवलकर, सेतुमाधवराव पगडी, नरहर कुरुंदकर - अशा अभ्यासकांच्या, संशोधकांच्या लेखणीचं तेज पाहून मी स्तिमित होत असे.

या सर्व इतिहासकारांनी ठिकठिकाणी केलेल्या लेखनातील विखुरलेले ज्ञानमोती एका सूत्रात गुंफून आणि त्याला सद्यकालीन इतिहासअभ्यासकांच्या लेखांचा साज चढवत ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावरील समग्र ग्रंथ करावा, हे मनात स्पष्ट झाले.

डॉ. सदानंद मोरे यांनी ग्रंथाच्या संपादकपदाची धुरा सांभाळण्याची आमची विनंती मान्य केली. डॉ. गणेश राऊत यांनी साहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. ग. भा. मेहेंदळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पवार, डॉ. राजा दीक्षित, पांडुरंग बलकवडे यांसारखे मान्यवर इतिहासकार समाविष्ट करून घेता आले, हे मी माझे भाग्य समजतो.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय आहे?

शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा हा मराठी साहित्यविश्वातील पहिला व एकमेव ग्रंथ आहे. या एकाच ग्रंथात ३८ इतिहासकारांचे लेख समाविष्ट आहेत. पंडित गागाभट्ट, छत्रपती संभाजी महाराज, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन, कवींद्र परमानंद यांसारख्या छत्रपती शिवरायांच्या समकालीन व्यक्तिमत्त्वांनी या घटनेवर केलेली भाष्ये या ग्रंथात संदर्भांसह नोंदवली आहेत.

डॉ. सदानंद मोरे यांची साठ पानी दीर्घ व सर्वस्पर्शी प्रस्तावना हेही ग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य आहे. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकाच्या सोहळ्यात युवराज म्हणून प्रत्यक्ष सहभागी झाले होते. ‘बुधभूषण’ या ग्रंथात बाराव्या क्रमांकाच्या श्लोकात छत्रपती संभाजी महाराज लिहितात :

‘विद्वज्जनांनी घालून दिलेल्या श्रौतधर्माचा अवलंब करून त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करविला, छत्र-चामरे आदि राजचिन्हांसह ते प्रतिदिन राजसिंहासनावर शोभून दिसू लागले.’ या ग्रंथाच्या निमित्ताने कवीन्द्र परमानंदकृत ‘शिवभारत’ यामधील अद्वितीय असा श्लोक गवसला.

कवी परमानंद लिहितात-

महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात् ।

अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वितः ॥

अर्थ: छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि ‘महाराष्ट्र’ हे नाव अन्वर्थ (सार्थ) झाले. कवीन्द्र परमानंदाने केलेले हे वर्णन आज शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना अत्यंत समर्पक वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com