
डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती संभाजीराजे शूर, पराक्रमी, बुद्धिमान तर होतेच; पण त्याचबरोबर ते प्रजावत्सल आणि नीतिमान होते. त्यांचे जीवन संघर्षमय आहे. बालपणापासून अनेक संकटे आली, पण अशा कठीण प्रसंगीदेखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला राजनैतिकतेचा पाया ढासळू दिला नाही. मातोश्री सईबाईचे निधन झाले, त्या वेळेस शंभूराजे फक्त दोन वर्षाचे होते. दूरदृष्टीच्या जिजाऊमाँसाहेबांनी आपला नातू शंभूराजांना राजनीती, युद्धकेलेचे शिक्षण दिले. वडील शिवाजीराजे यांच्या पराक्रमाचे बाळकडू शंभूराजांना मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी ते पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी मोगल छावणीत गेले. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांबरोबर आग्र्याला गेले. आग्र्यावरून सुटल्यानंतर त्यांना वाटेतच थांबावे लागले. अशा जीवघेण्या प्रसंगी शंभूराजे विचलित झाले नाहीत. ते कणखर आणि निर्भीड होते.