ॲडव्हांटेज शिंदे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

ॲडव्हांटेज शिंदे !

शिवसेनेत मोठी फूट पाडून महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर सुरू झालेल्या वादांपैकी नाव आणि  चिन्हाबाबतचा निवाडा अखेर निवडणूक आयोगाने केला असून ‘खरी’ शिवसेना या फुटीचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हटले आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर अकस्मात नवे नेपथ्य उभे राहिले असून, शिवसेनेची स्थापना करणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हातातून ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य-बाण’ हे चिन्हही गेले आहे. हा एका अर्थाने राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप म्हणावा लागेल.

अर्थात, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहेच. त्याचा निकाल यथावकाश लागेल आणि तोपावेतो या निकालाच्या गुणावगुणाची चर्चाही सुरूच राहील.

मात्र, तूर्तास तरी या निर्णयामुळे टेनिसच्या भाषेत बोलायचे झाले तर महाराष्ट्राच्या राजकीय मैदानावर ‘ॲडव्हांटेज एकनाथ शिंदे!’ अशी स्थिती निर्माण झाली आहे, यात शंका नाही. खरे तर यासंबंधात निकाल देण्याचे अधिकार ज्या यंत्रणेला आहेत,

त्या यंत्रणेने दिलेला हा निकाल मान्य करून, त्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा राजकीय वातावरणातून मार्ग कसा काढावयाचा, याचा विचार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी करायला हवा.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षितपणे स्थापन झालेल्या ‘महाविकास आघाडी’चे शिल्पकार आणि बुजुर्ग राजकारणी शरद पवार यांनी हाच पोक्तपणाचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उद्धव यांना आपले यापुढचे राजकारण हे केवळ ‘धनुष्य-बाण’ या चिन्हाविनाच नव्हे तर ‘शिवसेना’ हे नाव न घेता करावे लागणार, असा या निकालाचा अर्थ आहे; परंतु नवी निशाणी हे काही फार मोठे आव्हान असू शकत नाही.

सोशल मीडिया नावाचे माध्यम स्वप्नातही नसताना, काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बैलजोडीच्या जागी गाय-वासरू आणि त्यानंतर परत फूट पडल्यानंतर इंदिरा गांधी यांनी मान्य केलेली हाताचा पंजा ही निशाणी जनतेने स्वीकारल्याचे उदाहरण आहे.

एवढेच नव्हे तर त्याच चिन्हाच्या जोरावर काँग्रेसने पक्षातून बाहेर काढलेल्या इंदिराजींनी १९८०मध्ये दणदणीत विजय मिळवून पुनरागमन केले होते. आता जी कॉंग्रेस अस्तित्वात आहे, ती हीच इंदिराजींचीच. त्यामुळे चिन्ह वा नाव गेले म्हणजे सगळे संपले, असे होत नाही.

आता तर सोशल मीडियाच्या जोरावर नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवणे सोपे झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विचार करावयाला हवा तो या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचाच.

पहिले आव्हान हे मुंबई महापालिकेची निवडणूक हेच असणार, हे उघड आहे. गेली २५ वर्षे या देशातील सर्वात श्रीमंत असा या महापालिकेत त्यांचेच राज्य आहे. आता शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाने सुपूर्द केल्यामुळे कदाचित काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र, त्याचवेळी या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण झाल्याचेही समाजमाध्यमांववर नजर टाकली तर लक्षात येते.

एका अर्थाने त्यांची गत ही राहुल गांधी यांच्यासारखीच आहे. ‘भारत जोडो!’ यात्रेमुळे काँग्रेसचे कट्टर विरोधकही राहुल गांधी यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून आहेत.

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट विरोधकही सध्याच्या राजकारणाविषयी नाराज असल्याने आज उद्धव यांच्यासोबत आले आहेत. त्यांची साथ कायम राखण्याचे आव्हान आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे.

त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल काहीही दिला असला तरी ‘खरी’ शिवसेना कोणाची याचा खऱ्या अर्थाने निकाल हा या निवडणुकांतच लागणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक यांना मोठी लढाई करावी लागणार आहे.

त्याची सुरुवात त्यांनी शनिवारीच कार्यकर्त्यांपुढील भाषणाने जरूर केली आहे. मात्र, ही केवळ सुरुवात आहे. यापुढे ही अशी भाषणबाजी आणि ती लढाई केवळ ‘मातोश्री’च्या अंगणातून करून चालणार नाही. त्यासाठी बाहेर पडावे लागेल.

उभा महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. कॉंग्रेसचे दिवंगत नेते वायएसआर यांचे पुत्र व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे उदाहरण त्यांना याबाबतीत दिशादर्शक ठरेल.

पक्षाने बेदखल केले तरी जनतेच्या सहानुभूतीच्या जोरावर राज्य जिंकल्याच्या कहाण्या इंदिरा गांधी यांच्यापासून चंद्राबाबू नायडूंपर्यंत अनेक सांगता येतील. उद्धव वा आदित्य तसे करतील काय, हाच सध्या कळीचा प्रश्न बनला आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालाचा मोठा फायदा हा एकनाथ शिंदे गटाबरोबरच भारतीय जनता पक्षालाही झाला आहे.

२०१९ मध्ये राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर शिवसेनेला संपवण्याचा विडाच भाजपच्या नेत्यांनी उचलला होता. त्यामागे हिंदुत्ववादी विचारांचा कोणी प्रतिस्पर्धी आपल्यासमोर असता कामा नये, हा उद्देश होता.

शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्राचे तख्त काबीज केल्यानंतर विधानसभेतील चर्चेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही म्हणजे शिवसेना नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही!’ असे उद्‍गार उद्धव ठाकरे यांना उद्देशून काढले होते. त्यातील पहिला भाग साध्य झाला आहे.

आता दुसऱ्या टप्प्याची लढाई मुंबई महापालिकेच्या ‘मैदाना’त होईल आणि तेव्हाच गेले सहा-आठ महिने सुरू असलेल्या या लढाईचा अंतिम फैसला होईल, हे उद्धव ठाकरे यांनी ध्यानात घेतले असेलच!