'वंचित'ने नव्हे; काँग्रेसनेच स्वत:ला संपविले : ऍड. प्रकाश आंबेडकर 

ऍड. प्रकाश आंबेडकर 
रविवार, 26 मे 2019

काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससोबतच राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे. 

काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल. मात्र या पुढे कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करताना समसमान पातळीवर येऊन बोलावे लागेल. कारण कॉंग्रेससोबतच राजकारणातली गुलामीची व्यवस्था संपली आहे. 

वंचित बहुजन आघाडीने जवळपास 14 टक्‍के मते घेतली, हे आमचे यशच आहे. कॉंग्रेस राज्यात समूळ नष्ट झाली, त्याला वंचित बहुजन आघाडीच जबाबदार असा शिक्‍का मारला जातोय, तो चुकीचा आहे. कॉंग्रेस त्यांच्या कर्तृत्वाने नष्ट झाली आहे. राजकीय पक्ष म्हणून आमची जागा तयार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मात्र कॉंग्रेसला आधार देण्याचा मक्‍ता आम्ही घेतलेला नाही. या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उच्चाटन होण्याचे कारण मागच्या पाच वर्षांत ती अजिबात कुठेच शिल्लक नव्हती. निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हते. त्यांच्याकडे जिथे उमेदवार नाहीत त्या जागा आम्हाला देण्याची मागणी त्यांनी फेटाळली. कॉंग्रेसचे किती उमेदवार निवडून आले? बाहेरून आलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून आला. कॉंग्रेसने स्वत:च स्वत:ला संपवले आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मतपत्रिकेवर निवडणूक लढवली जावी, यासाठी आग्रह धरण्याची आवश्‍यकता आहे. किंबहुना त्यासाठी देशपातळीवर आंदोलनाची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीपासूनच मतपत्रिका पुन्हा आणण्याची आवश्‍यकता आहे. ईव्हीएम ही टेक्‍नॉलॉजी आहे आणि कुठलं तंत्र निकामी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान येतच असतं.

घरातला ओव्हन जर आपण दूर कुठूनही चालू, बंद करू शकतो, तर ईव्हीएम का नाही? जपानसारख्या इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये क्रांती केलेल्या देशात जर मतपत्रिकेवर निवडणुका होत असतील तर भारतात का नको? मतपत्रिकेवर निवडणूक होणार नसतील तर सहभाग घ्यायचा नाही अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेऊन त्यावर ठाम राहण्याची आवश्‍यकता आहे. 

(शब्दांकन : दीपा कदम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Finished Self Not VBA Article by Prakash Ambedkar