संविधान : भारतीयांच्या सन्मानाचा श्‍वासग्रंथ

डॉ. यशवंत मनोहर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

"मी केवळ भारतीय आहे,' असे म्हणणाऱ्या महान प्रज्ञेचे संविधान सर्वांनाच समान मानवी सन्मानाचे अभिवचन देते. आज 6 डिसेंबरच्या निमित्ताने संविधानाचे माहात्म्य विशद करणारा लेख...

संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍नाचे उत्तर संविधानाच्या पानापानावर उभे आहे. सर्वस्पर्शी न्यायावर आधारलेल्या सुसंस्कृत राष्ट्राचे चित्र संविधानात आहे. संविधान म्हणजे भारताचा ऐक्‍यसिद्धान्त आहे. हा ऐक्‍यासिद्धान्त शांततेच्या काळातही आणि युद्धजन्य परिस्थितीतही भारताला एकसंध ठेवण्यास पूर्णतः समर्थ आहे. जात्यतीत, वर्गातीत आणि धर्मातीत अशा निरामय आणि विश्‍वमनस्क माणसाचे निर्माण करण्यास हा ऐक्‍यसिद्धान्त सर्वतोपरी सक्षम आहे. सेक्‍युलॅरिझम आणि समाजवाद या दोन पंखांनी असीम मानवतेच्या अवकाशात बुलंदपणे उडण्याची ताकद या संविधानात आहे.

संविधानात "भारतीयत्वाशिवाय' काहीही नाही. या भारतीयत्वात वर्ण, जाती, धर्म, लिंगभाव वा कोणतेही असत्यसत्ताक नाही. परलोकसत्ताक वा दैवसत्ताक वा शोषणसत्ताक नाही. या भारतीयत्वात लोकशाहीचे आणि सेक्‍युलॅरिझमचे रचित आहे. सर्व आधुनिक मूल्यांचा प्रबंध तर या भारतीयत्वाची जगालाही आद्य देणगी आहे. कुठल्याही धर्माची मूल्यसंहिता या भारतीयत्वाने मान्य केली नाही. या भारतीयत्वाने सर्वांच्या समान सन्मानाची सेक्‍युलर दीपमाळ आजवर झगमगत ठेवली आहे. संविधानात या भारतीयत्वाच्या तेजोत्सवाशिवाय दुसरे काहीही नाही.

हे भारतीयत्वच भारताला एकसंध करणारे आणि ठेवणारे सूत्र आहे. वर्ण, जाती, धर्म, पंथ, पोटजाती, लिंगभाव यांचे स्वतंत्र व्यक्तिगत कायदे वा पंचायती संविधानपूर्व काळात होत्या. धर्म-पंथ तेवढे देश, जाती-पोटजाती तेवढे देश, वर्ण तेवढे देश, अशी असंख्य भांडणाऱ्या देशांची गर्दी इथे होती; पण भारत नावाचा एक आणि एकसंध देश मात्र इथे नव्हता. ही या अनंत जखमांची, बेटांची परस्परांना काळ्या पाण्यात पाहणारी गर्दी होती. अशी सर्व माणसे तोडणारी, त्यांना समाज वा देश होऊ न देणारीच सूत्रे होती. इथे सेंद्रिय, जीवैक्‍य वा साकल्य या भानाला कुठे जागाच नव्हती. या सर्व हत्यारांनी इथे मानवी सौहार्द आणि सद्‌भाव पार तोडूनच ठेवला होता. तोडलेली माणसे जोडणारे सूत्र इथे कुठेच नव्हते. जखमांच्या या मोकाट गर्दीला संविधानाने भारतीयत्व हे जैवऐक्‍याचे सूत्र दिले.

येथील गर्दीची दमनकारी उतरंड ही देशविनाशी अस्मितांचीच रचना होती. ही रचना मोडीत काढून संविधानाने भेदातीत, एकजिनसी आणि केवळ देशहितकेंद्री नवी "भारतीय अस्मिता' निर्माण केली. ही जाती, भाषा, धर्म, प्रांत यांच्या अतीत जाणारी बंधुतेची निखळ भारतीय अस्मिता आहे. प्रथमही आणि शेवटीही मी केवळ भारतीय आहे. इतर काहीही नाही. हे भारतीयत्वाच्या आणि संपूर्णच मानवी जीवनाच्या एक हृदय, एक चित्ततेचे मर्मविधान आहे.

देश म्हणजे परस्परांचा मानवी सन्मान जिवापाड जपणारी माणसे! संविधान देशापेक्षा देव, धर्म अशा कोणालाही मोठे मानत नाही. याचा अर्थ ते मानवी सन्मानापेक्षा, स्वातंत्र्यापेक्षा आणि स्वाभिमानापेक्षा इतर कोणालाही मोठे मानीत नाही. विचार, ज्ञान आणि सत्य यांचे परमसाध्य हा मानवी सन्मानच आहे. बाकी साऱ्या अविचारांना, अज्ञानांना आणि असत्यांना संविधान विनाशक उत्पादने मानते.

पूर्वी जाती-पोटजाती, धर्मपंथ, प्रदेश हे घटकच परस्परांना भेटत. परस्परांशी बोलत. व्यक्ती, माणूस हे घटकच त्या रचितात नव्हते. त्यामुळे व्यक्तींमधील बोलणे वा संबंध व्यक्त करण्याची तरतूदच भाषेत नव्हती. याचा अर्थ ते समाजरचित व्यक्तीविहीनच होते आणि भाषेला व्यक्‍तीसंबंधांपासून वंचित ठेवणारेही होते. जाती वा धर्म पुनरावृत्तीवादी म्हणजे मूलतत्त्ववादी होते. माणूस म्हणजे घडणशीलता! पण, नवे होण्याला या समाजाच्या गर्दीने शत्रूच मानले होते. सर्जनशीलतेला पूर्ण पारखी झालेली ती गर्दी होती. संविधानाने व्यक्तीला देश नावाच्या एकसंध महारचनेची पहिली कडी मानले आणि व्यक्तीला सर्जनशीलतेसाठी म्हणजे सतत नवे होण्यासाठी सर्व दिशा उघडून दिल्या.

पूर्वी व्यक्‍तीही नव्हती. म्हणून तिला एक मत वा एक मूल्यही. संविधानाने ही क्रांती साक्षात केली. आपल्याला हवे ते सरकार निवडण्यासंदर्भात एक मत आणि सामाजिक-आर्थिक लोकशाही प्रत्यक्षात आणणारे प्रत्येक व्यक्तीला एक मूल्य, हे संविधानाने प्रथमच जन्माला घातले. या उजेडाच्या पायऱ्या चढत देशातील कोणतीही व्यक्‍ती सत्ताधीश होऊ शकते. हे इतिहासातले स्थित्यंतर संविधानाच्या डोळ्यांनी माणसे बघताहेत. यामुळे मनुस्मृतीच्या अध्यायांना लागणारी आग अनेकांना बघवत नाही. मग समपातळीची सवय नसलेली धर्मांधता चिडते. एखाद्या धर्माच्या नावाने राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी मनुनय सुरू होतो. शेतकरी, मजूर, विद्यार्थी मरताहेत. मुसलमान, बौद्ध आणि आदिवासींच्या हत्या होत आहेत. माणसांना पाणी मिळत नाही. माणसे दुष्काळाच्या आगीत पेटत आहेत. त्या वेळी मंदिर, पुतळे, गावांची नावे बदलणे, संस्थांची नावे बदलणे; मल्या, नीरव अशा गुन्हेगारांना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी जाहीर केलेल्या दहशतवाद्यांना संरक्षण देणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. धर्मासाठी गौरी लंकेशचा खून केल्याचे जाहीर सांगणे, कर्नाटकाच्या एखाद्या मंत्र्याने घटना बदलण्यासाठी आमचा पक्ष सत्तेत आला, हे सांगणे. गोवंशाच्या नावाने शेकडो मुस्लिमांची हत्या करणे, देशाच्या राजधानीत घटना जाळणे, बौद्धांची हत्या करणे, बलात्कार करून मुलींना-स्त्रियांना निर्दयपणे मारणारांच्या समर्थनार्थ, आमदार, खासदार आणि वकिलांनी मोर्चे काढणे, हे राजकारणाचे किळसवाणीकरण आहे.

6 डिसेंबरच्या निमित्ताने सर्वांनी अंतर्मुख व्हावे. संविधान की धर्म, लोकशाही की हुकूमशाही, माणूस आणि देश श्रेष्ठ की धर्म आणि विषमता श्रेष्ठ? या प्रश्‍नांची निर्णायक उत्तरे घेऊन पुढे यावे लागेल. मी केवळ भारतीय आहे, असे म्हणणाऱ्या महान प्रज्ञेचे हे संविधान सर्वांनाच समान मानवी सन्मानाचे अभिवचन देत आहे. या अभिवचनाला आपण वचन देऊया, की "आम्ही सर्व भारतीय आहोत आणि संविधान आमचा श्‍वासग्रंथ आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Constitution is the supreme prolegomena for Indian