लढवय्या कॉम्रेड 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

आपली तत्त्वनिष्ठा कायम राखत त्यांनी टोकाच्या कम्युनिस्टविरोधी नेत्यांशीही सौहार्दाचे संबंध जोडले होते. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी त्यांचा उल्लेख कायम ‘गुरू’ दासगुप्ता असा करत.

गुरुदास दासगुप्ता हे कडवे कम्युनिस्ट होते आणि त्यामुळे त्यांचा नियतीवर विश्‍वास असणे शक्‍यच नव्हते. मात्र, ज्या ‘ऑल इंडिया ट्रेड इंडियन काँग्रेस’ (आयटक) या कामगारांच्या संघटनेला त्यांनी आयुष्य वाहिले होते, ती संघटना शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या दिवशीच त्यांना काळाच्या पडद्याआड जावे लागावे, हा मग नियतीचा खेळ तरी कसा म्हणता येईल? झुंजार कामगारनेता म्हणून अनेक लढ्यांचे नेतृत्व करणारे दासगुप्ता हे अष्टपैलू संसदपटूही होते. तीन वेळा राज्यसभेवर व दोन वेळा लोकसभेवर ते निवडून आले होते व संसदेत ते बोलायला उभे राहिले की सर्व सदस्य प्राण कानात आणून त्यांचे भाषण ऐकत असत. अर्थात त्या मागे त्यांची विद्वत्ता, व्यासंग आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून दिलेल्या लढ्यांचा अनुभव पहाडासारखा उभा असे.

संसद गाजवताना त्यांनी जवळपास एकहाती ‘आयटक’ या संघटनेचे रूपांतर झुंजार संघटनेत करून दाखविले. त्यांनी ‘आयटक’ला इतक्‍या मजबूत पायावर उभे केले, की त्यामुळे मार्क्‍सवादी कम्युनिस्टांची ‘सीटू’ (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन) ही संघटनाही मवाळ वाटू लागली. अर्थात, दासगुप्ता यांना आपली कामगार संघटना, तसेच आपला उजवा कम्युनिस्ट पक्ष यांच्या मर्यादाही ठाऊक होत्या. त्यामुळेच आपली तत्त्वनिष्ठा कायम राखत त्यांनी टोकाच्या कम्युनिस्टविरोधी नेत्यांशीही सौहार्दाचे संबंध जोडले होते. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी त्यांचा उल्लेख कायम ‘गुरू’ दासगुप्ता असा करत, तर त्याचवेळी कम्युनिस्टांशी उभा दावा असलेल्या ममता बॅनर्जींशीही त्यांचा सुखेनैव संवाद होई. दासगुप्तांनी संसदेत बजावलेल्या कामाचा कळसाध्याय हा ‘यूपीए’च्या दुसऱ्या सत्रात गाजलेल्या कोळसा गैरव्यवहाराच्या वेळी दिसला. या प्रकरणी नियुक्‍त केलेल्या संसदीय समितीचे ते सदस्य होते व तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना या व्यवहाराची कल्पना होती, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला होता. दासगुप्ता गेले ते आपल्यामागे एक इतिहास ठेवून. पश्‍चिम बंगालमधील कम्युनिस्टांच्या राजवटीचा सुवर्णकाळ त्यांनी बघितला, त्याचबरोबर त्याची पडझडही त्यांना बघावी लागली. आयुष्याचा निरोप घेताना हीच खंत त्यांच्या मनात असणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CPI leader Gurudas Dasgupta

Tags
टॉपिकस
Topic Tags: