जपावे आपणासी...

डॉ. दत्ता कोहिनकर
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

रामभाऊंनी काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण व लग्ने केली. पत्नीच्या निधनानंतर रामभाऊ मनाने खूप खचले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन किंचितसे अपंगत्व आले. मधुमेहाने त्यांना बेजार केले होते. या आजारपणात मुलगा व सूनबाईने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मुलाने गोड बोलून सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर अगोदरच करून घेतली होती. परावलंबित्व, अवहेलना, एकटेपणा सहन न झाल्याने रामभाऊंना नैराश्‍य आले होते.

रामभाऊंनी काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण व लग्ने केली. पत्नीच्या निधनानंतर रामभाऊ मनाने खूप खचले. अशातच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन किंचितसे अपंगत्व आले. मधुमेहाने त्यांना बेजार केले होते. या आजारपणात मुलगा व सूनबाईने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मुलाने गोड बोलून सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर अगोदरच करून घेतली होती. परावलंबित्व, अवहेलना, एकटेपणा सहन न झाल्याने रामभाऊंना नैराश्‍य आले होते.

रामभाऊंनी स्वतःकडे आयुष्यभर दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी जिवाचे रान केले होते. रामभाऊंसारखी वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणून मित्रांनो, घरातील मंडळीच्या प्रगतीसाठी, सुख-समाधानासाठी झटताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. रोज शरीरासाठी व्यायाम करा. प्राणायामाला विशेष महत्त्व द्या. दीर्घ श्‍वसनाने मन शांत व सबल होते. आपला उत्साह व आनंद व रोगप्रतिकारक्षमता यांचे श्‍वसनाशी असणारे नाते समजून घ्या.

पाणी हे तर जीवन आहे. रक्ताची द्रवता सांभाळणे व विषारी द्रव्यांचा निचरा घडवणे, हे काम पाणी करत असते रोज भरपूर पाणी प्या. फळे, भाज्या, धान्य यांतील सत्त्व विविध प्रक्रियांनी संपुष्टात न आणता त्याचा आस्वाद घ्या. प्रकृतीनुसार आहार घ्या. रक्ताभिसरण नीट व्हावे यासाठी रोज दहा सूर्यनमस्कार घाला. व्यायाम व आसने यात सातत्य ठेवा. हे आपल्याला सहज शक्‍य असते. त्याचा आळस करू नका.

भरपूर हसा, हसण्यामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. हसताना विशिष्ट स्नायूंची हालचाल व स्नायूंना बसणारे धक्के यामुळे मानसिक ताण ओसरतो. आपले मित्र व मैत्रीण यांच्याबरोबर सहलीला जा, त्यांच्याकडे भावभावना व्यक्त करा. नात्यात दृढता व पवित्रता आणा. माणसे ओळखायला शिका. समर्थ म्हणतात, ‘‘वाट पुसल्याविणा जाऊ नये। फळ ओळखल्याविना खाऊ नये।’’ आपले छंद जोपासा. एकाच व्यक्तीमध्ये किंवा वस्तूत सर्वस्व शोधू नका. प्रेमाचे रूपांतर पाशात होऊ देऊ नका.

मनाच्या सबलतेसाठी रोज ध्यानाला वेळ काढा. आपण आपले शरीर व मन सबल-सशक्त व शुद्ध ठेवल्यास जीवनात ऊर्जारूपी चैतन्य स्फुरते. शेवटच्या श्‍वासापर्यंत घरातील सर्वांनी जरी आपल्याकडे दुर्लक्ष केले तरी एकटे आनंदाने जगता आले पाहिजे, एवढी धनसंपदा स्वतःकडे ठेवा. पैसा हा दुःख निवारण व रोगनिवारणासाठी कामाला येतो. घर बांधण्यापूर्वी आपण प्लॅन काढतो, मालमत्तेचा तपशील तपासतो, कपडेलत्ते कसोशीने खरेदी करतो. मुलाबाळांच्या आयुष्याचे प्लॅन आखतो. पण स्वतःबद्दल कसलाच विचार करत नाही. घर कसे असावे, घरात किती लोक व कसे असावेत, यापेक्षा आपण स्वतः शेवटच्या श्‍वासापर्यंत असावे, हे महत्त्वाचे आहे. म्हणून स्वतःवर लक्ष केंद्रित करा. रामभाऊंनी स्वतःवर सुरवातीपासून लक्ष केंद्रित केले असते तर त्यांना नैराश्‍य आले नसते. यातून योग्य बोध घ्या व स्वतःला जपा.

Web Title: datta kohinkar editorial artical