मराठवाड्यात दुष्काळ पण राजकीय नेत्यांच्या ‘यात्रां’चा सुकाळ!

दयानंद माने
Saturday, 31 August 2019

यंदा मराठवाडा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या योजना प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही.

महाराष्ट्र माझा : मराठवाडा 
यंदा मराठवाडा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या योजना प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा या आठवड्यात मराठवाड्यात आहे. बीड, औरंगाबाद, जालना, परभणीमार्गे ती शनिवारी हिंगोली, नांदेडहून लातूर, उस्मानाबादकडे रवाना होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या यात्रेने भाजपच्या भव्य प्रचारतंत्राची प्रचिती दिली आहे. या यात्रेच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा खासदार अमोल कोल्हे, पक्षाचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात आली. मराठवाड्यातील ‘राष्ट्रवादी’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नेत्यांच्या भागातून ही यात्रा गेली.

तेथे काही ठिकाणी चांगल्या सभा झाल्या. या सभांमध्ये कोल्हे यांच्या भाषणात लक्ष्य अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करताहेत, त्याचा परिणाम सावट या यात्रेवर झाल्याचे दिसले. जालना, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील काही ठराविक मतदारसंघांत ही यात्रा गेली. उस्मानाबादेतील पक्षाचे नेते पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. तेच गैरहजर राहिल्याने या यात्रेच्या मराठवाड्यातील यशाबद्दल शंका व्यक्त होत आहेत. 

स्थानिक प्रश्‍नांची मुख्यमंत्र्यांकडून दखल 

मराठवाड्यातील महाजनादेश यात्रा बीड जिल्ह्यातून सुरू झाली. बीड जिल्ह्यातील यात्रेत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व मान्य करत, मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांच्या सत्काराचाही मुख्यमंत्र्यांनी स्वीकार केला. मेटेंच्या सत्कारामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी ‘गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर माझे गुरू देवेंद्र फडणवीस हेच आहेत,’ हे सांगताना द्रोणाचार्य आणि एकलव्य या गुरू- शिष्याचा दाखला दिला. त्या म्हणाल्या, ‘त्यांनी गुरुदक्षिणा मागितल्यास मी अंगठा देण्यास तयार आहे, मात्र तो अर्जुनासाठी असावा,’ असे सूचक विधान त्यांनी केले. या विधानाला मेटे यांच्या सत्काराचा संदर्भ होता.

बीड जिल्ह्यात मुंडे व मेटे यांच्या गटात सख्य नाही, हे सर्वश्रुत आहेच. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील रॅलीत काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार अब्दुल सत्तार हे स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोध पत्करून थेट मुख्यमंत्र्यांच्या रथावर भर रस्त्यात चढले. त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः हात देऊन रथावर घेतले. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री सत्तारांना भाजपमध्ये कसे सामावून घेणार? असा प्रश्‍न आहे.   यात्रेचे नियोजन भाजपने चांगल्या पद्धतीने केले आहे.

मुख्यमंत्री संवादाच्या सर्व माध्यमांचा योग्य वापर करत आपला संदेश लोकांपर्यंत पोचवीत आहेत. ‘मराठवाड्याचे वाळवंट होऊ देणार नाही, समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वॉटर ग्रीडद्वारे मराठवाड्यातील आठ धरणांत फिरवू, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या पीकविमा कंपन्यांना सोडणार नाही, औरंगाबाद-जालना ही शहरे उद्योगांची मॅग्नेट बनवू,’ यांसारख्या शेतकरी, उद्योग, व्यावसायिक, युवक, बेरोजगार या वर्गांना आपलेसे करणाऱ्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी भावनिक हात घातला. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. 

सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट

हे सर्व आश्वासक असले, तरी दुसरीकडे मराठवाड्याचे प्रश्न काही मिटता मिटत नाहीत. यंदा मराठवाडा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाने पाठ फिरविल्याने एकाही जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. नाशिक, नगर जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यावर ‘जायकवाडी’ भरले आहे. ‘जायकवाडी’च्या पुढे गोदावरी अक्षरशः कोरडीठाक होती. ‘जायकवाडी’तून सोडलेले पाणी आता कुठे विष्णुपुरीपर्यंत पोहोचले आहे. ‘उजनी’ भरल्याने उस्मानाबादला फायदा होईल. मात्र प्रत्यक्ष ‘जायकवाडी’ वगळता मराठवाड्यातील एकही मोठे धरण भरलेले नाही.

पैनगंगेवरील ईसापूर, पूर्णेवरील सिद्धेश्वर, येलदरी, तसेच मांजरा, निम्न तेरणा, मानार, सीना कोळेगाव ही धरणे कोरडी आहेत. लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी देण्याची वेळ येणार आहे. बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने व तिला पावसाचे पाणी लागत असल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आहे. त्यामुळे यंदा तीव्र दुष्काळाला मराठवाड्याला सामोर जावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या योजनांवर खऱ्या अर्थाने काम झाले, तर मराठवाड्यात सुकाळ निर्माण होईल. त्या दिशेने सरकारने पावलेही उचलली आहेत. मात्र हे प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dayanand Mane Writes about Marathwada Drought Issue