सिनेमा सिनेमा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 22 जानेवारी 2019

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.)
वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड!
प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा.
पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि 
प्रिं. विक्रमादित्य.

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.)
वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड!
प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा.
पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि 
प्रिं. विक्रमादित्य.

विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नको! उद्या उद्या या! आजचा दिवस संपला!!
विक्रमादित्य : (दरवाजातून विचारत) आम्ही सगळे सिनेमाला चाललोय! तुम्ही येणार आहात का? 
उधोजीसाहेब : (थिजून जात) अरे, महाराष्ट्र इथं उपाशी मरतोय! माझा शेतकरी देशोधडीला लागलाय! गुरांना चारा उरला नाही! दुष्काळ आ वासून समोर उभा आहे! सिनेमे कसले बघता? जग काय म्हणेल?
विक्रमादित्य : (निर्वाणीच्या भाषेत सांगत) अशा परिस्थितीत सिनेमा काढून जागृती निर्माण करणं योग्य असतं! हल्ली असे पिक्‍चर काढण्याची फॅशन आहे!! ते जाऊ दे! येणार आहात की नाही, ते सांगा! युतीच्या निर्णयासारखं लास्ट मूमेंटला नको!! मग तिकिटं मिळणार नाहीत! 
उधोजीसाहेब : (सहजपणाने) हॅ:!! हल्ली तिकिटं आरामात मिळतात! ‘बुक माय शो’वर बुक केली की झालं!! 
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून) इतकं सोपं नाही ते! मी राऊतकाकांना तिकिटं विचारली तर ते म्हणाले, आत्ताच संपली!!
उधोजीसाहेब : (विचारात पडत) एकंदरित चित्रपट सुपरहिट ठरणार अशी चिन्हं आहेत!
विक्रमादित्य : (अभिमानाने) अफकोर्स!! ऑलरेडी सुपरहिट ठरलाय, असं म्हणा!!
उधोजीसाहेब : (काळजीपोटी) ...पण थिएटरं मिळताहेत ना? मराठी सिनेमांना हल्ली हे मल्टिप्लेक्‍सवाले थिएटरं मिळू देत नाहीत!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) ते ओळखूनच राऊतकाकांनी हिंदीत पण काढलाय हा सिनेमा!
उधोजीसाहेब : (सुस्कारा सोडत) ते एक बरंच झालं!! पण मला तर वाटतं असले सिनेमे थेटरात न दाखवता मैदानात का दाखवत नाहीत?
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) बाय द वे, देवेंद्र अंकलचा फोन आला होता! 
उधोजीसाहेब : (कटकटलेल्या सुरात) कशाला?
विक्रमादित्य : (विजयी मुद्रेने) तिकिटं मिळतील का, विचारत होते!
उधोजीसाहेब : (हात झटकत) संपली म्हणावं!!
विक्रमादित्य : (खुलासा करत)...ते निवडणुकीच्या तिकिटांबद्दल बोलत असावेत!!
उधोजीसाहेब : (दुप्पट हात झटकत) ती तर कध्धीच संपली म्हणावं!!
विक्रमादित्य : (चिंताग्रस्त होत) बॅब्स... ह्या नवाजुद्दीन सिद्दिकीबद्दल तुमचं काय मत आहे हो?
उधोजीसाहेब : (थंडपणाने) ज्याच्या नावात डब्बल ‘द’ येतो, त्याच्याबद्दल काय बोलायचं? हल्ली लोक ‘आवाज कुणाचा’ अशी घोषणा देण्याऐवजी ‘नवाज कुणाचा’ असं ओरडायला लागलेत! कठीण आहे!!
विक्रमादित्य : (दाद देत) बाकी रामन राघवचा रोल त्यानं मस्त केला होता! बॅब्स... तुम्ही कां नाही करत सिनेमात काम?
उधोजीसाहेब : (दात ओठ खात) तू झोपायला जा बघू आता! गुड नाइट!!
विक्रमादित्य : (सहज सांगितल्यागत) देवेंद्र अंकल कसे ‘रिव्हर अँथम’ किंवा जाहिरातीत मस्त रोल करतात! गाणीबिणी म्हणतात! मी म्हणतो की आपणही ट्राय करून बघायला काय हरकत आहे?
उधोजीसाहेब : (जरबेच्या सुरात) लोक आपल्यावर सिनेमे काढतील, असं वागावं! आपण तिथं जाऊन कडमडू नये! कळलं?
विक्रमादित्य : (गुप्त बातमी सांगत) देवेंद्र अंकल म्हणाले की आणखी काही वर्षांनी ह्या चित्रपटाचा सिक्‍वेल येईल, तेव्हा त्याचा हिरो तूच हो आणि मी माझाच रोल करीन! व्हाट ॲन आयडिया ना? मजा येईल, बॅब्स!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang Article