ढिंग टांग : गे माये!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

चंडमुंडभंडासुरखंडिनी आई ये, गे ये!
आम्हा पामरांचा उद्धार कराया
पुन्हा एकवार घे अवतार, गे माये!

घेशील ना?

चंडमुंडभंडासुरखंडिनी आई ये, गे ये!
आम्हा पामरांचा उद्धार कराया
पुन्हा एकवार घे अवतार, गे माये!

घेशील ना?

असुर माजले आहेत, माये.
त्यांच्या निर्दालनासाठी ये.
अगतिकांना गती देण्यासाठी ये.
प्रागतिकांना प्रगती देण्यासाठी ये.
येशील ना?

डळमळोत मस्तवाल सिंहासने
उखडोत शत्रूच्या शिरजोर छावण्या.
जमीनदोस्त होवोत त्यांच्या
उद्‌दाम रथांवरचे धमकीबाज ध्वज.
चिरफळ्या उडोत परचक्राच्या.
...पण कर्दमात रुतलेल्या आमच्या
रथचक्राचा उद्धार कर गे माये!

तुझ्या वक्र भिवयीच्या कमानीवर
लोंबू देत त्या केसरिया चिंध्या.
पडझडलेल्या गढीवर चढू देत 
पुन्हा सोन्याची कौले.
सारे काही होऊ दे आलबेल
पुन्हा एकवार...पुन्हा एकवार...

तुझ्या कृपाळू प्रसादासाठी 
अवघ्या देहाची ओंजळ करून
आम्ही उभे आहोत, माये!
येशील ना?

तुझा वर्ण. तुझा देश.
तुझी भाषा. तुझा वेष.
तुझे हेलिकॉप्टर. तुझे स्मित.
साऱ्या साऱ्यावरून कधीच 
ओवाळून फेकला आहे,
आम्ही कोरभर भाकरीचा तुकडा.
इडा टळो. पीडा टळो.
भलाईचे राज्य पुन्हा येवो.

कारण-
हजारो कार्यकर्त्यांच्या उरस्फोडीने
कर्णे-नगाऱ्यांच्या दणदणाटाने
ध्वनिवर्धकांच्या पिसाट कल्लोळाने
होर्डिंगे, कटाऊट्‌सच्या नुमाइशीने
जे साधले नाही ते,
घडवून आणतेस तू
एका मौन हुंकाराने.

आता आम्हाला कळली आहे,
तुझ्या हुंकाराची रिश्‍टर स्केल
एकमताने मंजूर आहे तुझ्या
उभवलेल्या हाताची अनमोल शक्‍ती.
ज्या हाताच्या इशाऱ्यासरशी
वाहाते होतात मोसमी वारे, 
भिरकावली जातात चक्रीवादळे.
उन्मत्त लाटांचे होते बाष्प क्षणार्धात.
तुझ्या इशाऱ्यानिशी दौडते लावलष्कर
पुढे, पुढे, पुढे...किंवा मागे!

गे माये, तुझ्या तर्जनीच्या संकेताने
पुन्हा एकवार वाहो चलनांचा प्रवाहो.
थांबोत प्रवाहातले भोवरे, संपू दे
नष्टचर्य कुंडलीतल्या ग्रहांचे.

तूच गे ती क्रांती
गॅरीबाल्डीच्या भूमीतली.
तूच गे ती शांती
महात्म्याच्या मनातली.

आम्हाला हवा आहे,
तुझ्या संजीवक अस्तित्त्वाचा साक्षात्कार.
तुझा परमकारुणिक आतला आवाज 
...आणि फक्‍त तुझे आडनाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang Article