ढिंग टांग :  प्रचिती!

ढिंग टांग :  प्रचिती!

शेकडो कॅमेऱ्यांच्या चकचकाटात
ध्वनियंत्रणेतून विस्फोटणाऱ्या
ढोल-ताशांच्या दणदणाटात
चकाचौंध उजळलेल्या मांडवात
उसळलेल्या उत्फुल्ल गर्दीत
दोन्ही हात उभारून त्याने
केला (कसाबसा) नमस्कार.
अंगावर कोसळणाऱ्या
अखंड भक्‍तीचा लोंढा
जेमतेम रोखत तो ओरडला :
गणपती बाप्पा मोऽऽरया...

त्याने मारलेली आर्त हांक
विरून गेली मांडवातील
ओसंडणाऱ्या गर्दीत,
कार्यकर्त्यांच्या आरोळ्यांत,
सुरुदार खांबात, 
नक्षीदार तख्तपोशीत,
चिनी दिव्यांच्या माळांत,
आणि बहुधा थर्मोकोलच्या
कोरीव वैभवात.

मंडळ कार्यकर्त्याने दिलेला
आणखी एक मोक्षदायी
धक्‍का पचवत तो लागला
‘बाहेर जाण्याच्या मार्गा’ला, तेव्हा
महापुराच्या विक्राळ जळात
वाहून जाणाऱ्या पलंगाप्रमाणे
आपणदेखील आहो प्रवाहपतित,
असे त्याला वाटून गेले...

इतक्‍यात झाले गारुड-
तिन्हीसांज उलटून गेल्यावर
अचानक जावी वस्तीतली वीज,
आणि टीव्ही मालिका, कुकरच्या शिट्ट्या,
गल्लीतले पोरखेळ, परतीची लगबग,
सारे सारे काही व्हावे स्विच ऑफ,
तद्‌वत पसरली शांतता 
अवघ्या गणेश मंडपात...
विझून गेले लाखो लुकलुक दिवे,
निष्प्राण झाला ध्वनिक्षेपकाचा ऊर्ध्वस्वर,
धबाबा आदळणारे तोय
गोठावे क्षणार्धात शीतलहरीने,
तद्‌वत गोठला मांडव.
हजार क्षतांनी भोसकणारी
शांतता निर्भंग राहिली
मौन छायाचित्राप्रमाणे.

निळसर प्रकाशाच्या गूढ
धुक्‍यांमधून मंदपणे अनुभूत झाले
दिव्यत्वाचे दृष्टांत, ज्याला नव्हता
आदि, अंत आणि मध्य. किंवा
नव्हता लौकिकाचा स्पर्श. किंवा
नव्हते काहीच खुलासे.

‘आहे’ आणि ‘नाही’च्या सरहद्दीवर
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पलीकडल्या
धूम्रवर्तुळातून उमटलेल्या आश्‍वासक
आवाजाने पराकोटीच्या ममत्वाने
त्याला म्हटले : मी ध्वनिवर्धकात नाही,
मांडवाच्या नक्षीखांबातदेखील नाही,
मखराच्या सजावटीत किंवा
धर्मश्रद्धांच्या शेंदूरउटीत नाही,
सुरक्षायंत्रणेच्या बडग्यात,
सीसीटीव्हीच्या पहाऱ्यात,
गुप्तदानाच्या सोयीस्कर पेटीत,
पावतीपुस्तकांच्या दमदाटीत,
टीव्हीच्या थेट प्रक्षेपणात,
व्हीआयपींच्या दडपणात,
कॅमेऱ्यांच्या लखलखाटात,
सेलिब्रिटींच्या झगमगाटात,
...मी कुठेही नाही.
मी आहे फक्‍त 
गर्दीत हरवलेल्या तुझ्या
एकांड्या अगतिक मनात,
तुझ्या मौन नतमस्तकात,
आणि जोडलेल्या हातांत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com