ढिंग टांग : पेपरफुटी!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : नीजानीज.
प्रसंग : गुडनाइट म्हणण्याचा. पात्रे : नेहमीचीच.

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : नीजानीज.
प्रसंग : गुडनाइट म्हणण्याचा. पात्रे : नेहमीचीच.
....................

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) नोप!
विक्रमादित्य : (ओठांचा चंबू करत) व्हाय?
उधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावर घेत) गुडनाइट!
विक्रमादित्य : एक भयंकर बातमी आहे!!
उधोजीसाहेब : (ताडकन उठत) युती जाहीर झाली?
विक्रमादित्य : (गंभीर आवाजात) अजून नाही! एका दिवसात आम्ही युती जाहीर करू, असे फडणवीसअंकल म्हणाले आहेत काल ! पण त्याहीपेक्षा भयंकर बातमी आहे !
उधोजीसाहेब : त्यापेक्षा काय भयंकर असू शकतं? ‘आमचं ठरलंय, आमचं ठरलंय’ असं सांगून तोंड दुखायला लागलंय आता !! एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा बुवा आता !!
विक्रमादित्य : (सनसनाटी घोषणा केल्यागत) ऐका हो ऐका! पेपर फुटला आहे !!
उधोजीसाहेब : हात्तीच्या ! पेपर फुटत नाही लेका, फाटतो !! 
विक्रमादित्य : (वाइट्ट चेहरा करत) अतिशय बंडल जोक मारलात !! कोणी फोडला पेपर, आधी सांगा !! 
उधोजीसाहेब : (संशयानं) तुझी जनआशीर्वाद यात्रा बरी चालली आहे ना?
विक्रमादित्य : (ठामपणे) यात्रेदरम्यानच ही खबर मला लागली आहे !! पत्रकारांनी मला उघडपणे विचारलं की ‘येत्या निवडणुकीनंतर तुम्ही उपमुख्यमंत्री होणार का?’! याचा अर्थ पेपर फुटला असा होतो !!
उधोजीसाहेब : (भाबडेपणाने) तू ‘हो’ म्हणालास ना?
विक्रमादित्य : (आत्मविश्‍वासाने) अजिबात नाही !! उलट मी म्हणालो ‘मी पेपर असा फोडणार नाही !’ पेपरसेटिंगवाले वेगळे आहेत आणि पेपर तपासणारी जनताच काय ते ठरवेल !!
उधोजीसाहेब : (गोंधळून) म्हंजे? उपमुख्यमंत्रिपदाचा आणि पेपरफुटीचा काय संबंध?
विक्रमादित्य : (विजयी मुद्रेने) अर्थात, आहेच मुळी संबंध !! मी ‘हो’ म्हटलं असतं तर मुख्यमंत्री कोण? या प्रश्‍नाचं उत्तरही त्यांना कळलं असतं ना? म्हंजे एकाच वेळी प्रश्‍नपत्रिकेतले दोन प्रश्‍न फोडल्यासारखं झालं असतं !
उधोजीसाहेब : (इंप्रेस होत) हुशार आहेस हं !
विक्रमादित्य : (तावातावाने) मी म्हंटो की परीक्षेला चिक्‍कार वेळ असताना असले प्रश्‍न विचारलेच कसे जातात?
उधोजीसाहेब : (समजूत घालत) चाचणी परीक्षेत विचारतात की ! शिवाय एकवीस अपेक्षित वगैरे प्रश्‍नसंच सिलॅबसबरोबरच प्रसिद्ध होतात ना? एवढं तर चालायचंच !
विक्रमादित्य : (युक्‍तिवाद करत) पण सध्या हा प्रश्‍नच सिलॅबसमध्ये नाहीए ना !!
उधोजीसाहेब : (डोक्‍याला मुंग्या येऊन) जाऊ दे ! आपल्याला त्याचं काय? आपलं ठरलंय ना? मग ठरल्याप्रमाणे होईल !! तू कशाला एवढा अस्वस्थ होतोस?
विक्रमादित्य : ते काही नाही ! तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा ! मी उपमुख्यमंत्री होणार, असं आधीच ठरलंय का? तसं असेल तर पेपर ऑलरेडी फुटला आहे !
उधोजीसाहेब : (अवघडून) नको विचारूस असा प्रश्‍न ! उरलेला पेपरही फुटेल !!
विक्रमादित्य : (अभ्यासू विद्यार्थ्यासारखा चेहरा करत) पेपरफुटीमुळे हुश्‍शार विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलं तरी काही ढ विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच होतो !! मित्रपक्षातले काही ढ विद्यार्थी पास होतील आणि माझ्यासारख्या मेरिटमधल्या विद्यार्थ्याची पंचाईत होईल !! म्हणून विचारतोय !
उधोजीसाहेब : (दिलासा देत) डोण्ट वरी ! परीक्षा आणि मार्क कशासाठी असतात? ॲडमिशनसाठीच ना? तुझी ॲडमिशन पक्‍की आहे, असं समज !! हेच तर आपलं ठरलंय ! जा आता ! गुडनाइट !!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article aditya thackeray