ढिंग टांग : फिट्टं फाट!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती. 

‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती. 

‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे होते. पण कशाला सांगा?

‘‘रोज सकाळी मधपाणी घेत चला!,’’ ते म्हणाले. मधपाण्याने दंडातल्या बेटकुळ्या पोसल्या जातात, हे ऐकून नवल वाटले. आम्ही शिरस्त्याप्रमाणे ‘हो’ म्हटले.

‘‘बदाम खा, बदाम! पिस्ते, बेदाणे, अक्रोड असं काही तरी!...काय?,’’ हे म्हणताना त्यांनी चारचौघांत शड्डू ठोकून दाखवला. आमची मारामारी होतेय की काय, असे आसपासच्या माणसांना वाटायला नको, म्हणून आम्ही उगाचच मोठ्यांदा हसलो. तेथेच चुकले! 

‘‘दात कसले काढताय? तंबाखू खाता वाट्टं...वा-ई-ट!!’’ त्यांनी दर्डावून सांगितले. आम्ही गपकन तोंड मिटून बत्तिशी लपवली. हे व्यसन आम्ही वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षांपासून जडवून घेतले आहे, हा तपशील पुरवला असता तर त्यांनी आमचे दात घशात घातले असते.

‘‘योगा करता का योगा?,’’ त्यांनी संशयाने विचारले. आम्ही मान खाली घातली. आमच्या पुरोगामी पोटात एक बोट खसकन खुपसून त्यांनी ‘अरेरे...काय हे?’ असे उद्‌गार काढले. आम्ही मान आणखी खाली घातली. थोडे आणखी वांकता आले असते तर पायाचे आंगठे पकडून पादहस्तासन करू शकलो असतो. पण ते जमले नाही.

दुर्दैवी योग असा की, योगाशी सख्य जमण्याचा आमच्या जीवनात कधी योगच आला नाही. नाही म्हणायला एकदा एका बाबाजींच्या योगशिबिरात सकाळी चारला उठून गेल्यामुळे अनवस्था प्रसंग ओढवला होता. पू. बाबाजींच्या ‘दोनों पैर धीरे धीरे उप्पर उठाएं’ ह्या आदेशाचे पालन करण्याचे आमचे क्षीण प्रयत्न भयंकर स्फोटक ठरले आणि आसपासचे दोन-चार शिबिरार्थी चटई गुंडाळून निघूनच गेले. काही काळाने पू. बाबाजींनीच आम्हाला चटई गुंडाळावयास लावली. पण ते असो.

‘‘हल्लीच्या तरुणांना काय झाले आहे? हे सगळं तुमच्या त्या फास्ट फूड आणि बैठ्या जीवनशैलीमुळे होतंय!’’ ते सात्विक संतापाने म्हणाले. तरुण म्हटल्याबद्दल लाजावे की बैठ्या प्रकृतीबद्दल ओशाळावे, अशा दुग्ध्यात आम्ही पडलो. 

‘‘हल्ली तरुणांना हार्ट अट्याक येतात! मधुमेह, रक्‍तदाबाचे विकार जडतात. ह्याला काय अर्थय?’’ ते खवळले. आम्हीही ‘हो ना...काय ही युवापिढी’ टाइपचे काही निरर्थक उद्‌गार काढून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 

‘‘हार्ट अट्याक काय घेऊन बसलात, हल्ली तरुणांना मोतीबिंदू पडतात!,’’ त्यांनी माहिती दिली. हे सारे त्या तुमच्या मोबाइल फोन आणि टीव्हीमुळे होते आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला मान डोलावण्यावाचून गत्यंतरच नव्हते. 

‘‘म्हणून म्हणतो, तब्बेत सांभाळा! आरोग्यं धनसंपदा...काय?,’’ ते मूळपदावर आल्याची लक्षणे दिसू लागली होती. आमचा चेहरा जरा उजळला. रोज व्यायाम करण्याचे महत्त्व त्यांनी आम्हाला पटवून दिले. आम्हाला ते ताबडतोब पटले. उद्यापासून रोज सकाळी दोन तास व्यायामशाळेत जाण्याचे वचनही आम्ही त्यांना तेथल्या तेथे देऊन टाकले.

‘‘शाब्बास...तब्बेत चांगली असली की भविष्यातील संकटाशी मुकाबला करता येतो! तयार रहा!!’’ एवढा इशारा देऊन ते निघून गेले.

...या पुढे आपण अच्छे दिनांची वाट पाहायची की बुऱ्या दिनांची? हे नवे कोडे आता पडले आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article Healthy India campaign