ढिंग टांग : हौसफुल्ल!

maharashtra-politics
maharashtra-politics

बेटा : (नेहमीप्रमाणे एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (लांबलचक यादी बारकाईने वाचत) हं!

बेटा : (कुतूहलानं) कसली लिस्ट वाचतेयस? किराणा भुसारवाल्यानं महिनाभराचं सामान पाठवलंय का?

मम्मामॅडम : (तंद्रीत) अंऽऽ...तसंच काहीसं..!

बेटा : (खिडकीतून बाहेर डोकावत) बाहेर चिक्‍कार गर्दी जमली आहे! कशासाठी?

मम्मामॅडम : (भानावर येत) झारखंडमध्ये आपली पार्टी जिंकली म्हणून जल्लोष चालला असेल!

बेटा : (नकारार्थी मान हलवत) अंहं! इथली गर्दी वेगळी दिसतेय! मला घरात येताना किती कष्ट पडले! शेवटी अहमद अंकलनी सिक्‍युरिटीला सांगून मला आत घेतलं! ते दाराशीच उभे होते ना!!

मम्मामॅडम : (पुन्हा यादीतल्या काही नावांवर पेन्सिलीने खुणा करत) आपल्याकडे पुन्हा गर्दी होऊ लागली, हे चांगलंच लक्षण आहे बेटा!

बेटा : बाहेर अक्षरश: ढकलाढकली चालू होती! 

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) कसं आवरायचं या लोकांना? 

बेटा : (संशयानं) महाराष्ट्रातले आपले लोक आहेत! मी रांगेत चव्हाण अंकलना बघितलं! थोरात अंकलचा सदरा ओढून त्यांना ओरडून ओरडून काही तरी सांगत होते ते! पृथ्वीराज अंकलसुद्धा होते त्या ढकलाढकलीत! पण बऱ्याच लोकांना मी ओळखलंच नाही! हा काय प्रकार आहे?

मम्मामॅडम : (हताश होत) तरी मी अहमद अंकलना सांगून ठेवलं होतं- महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांना सांगा की हॅव पेशन्स!! किती लॉबिइंग करतात?

बेटा : (तावातावाने) मीसुद्धा ओरडलो त्यांना! म्हटलं, ऐसा ढकलाढकली क्‍यूं करता हय? सब लोग रांग लगाओ! रांग का फायदा सर्वांना होता हय!! 

मम्मामॅडम : (नाक मुरडत) या असल्या मोर्चेबांधणीमुळेच महाराष्ट्रातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे! हाऊ रिडिक्‍युलस ना?

बेटा : (हाताची घडी घालत) अफकोर्स! अफकोर्स!! पण बाहेर त्यांची ढकलाढकली चालू असताना, तू इथे कसली यादी तपासतेयस?

मम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) मंत्रिमंडळ विस्ताराचीच यादी आहे ती! मि. ठाकरे आणि कंपनीनं ॲडव्हान्स बुकिंगची तिकिटं आणि खुर्च्यांचा प्लॅन पाठवला आहे! त्यात आपली माणसं बसवायची म्हणजे किती तारेवरची कसरत आहे!! 

बेटा : (आश्‍चर्यचकित होत) ॲडव्हान्स बुकिंगची तिकिटं? खुर्च्यांच्या प्लॅन? आय डिडण्ट गेट यू मम्मा! बघू बरं मला...काय प्रकार आहे?

मम्मामॅडम : (समजावून सांगत) हे बघ, हा मंत्रिमंडळाच्या खुर्च्यांचा प्लॅन! या भगव्या खुर्च्या शिवसेनेच्या! या मधल्या भगव्या प्लस निळ्या खुर्च्या एनसीपीवाल्यांच्या! आणि उरलेल्या व्हेकंट आहेत, त्या आपल्या! आपल्याकडे तिकिटं आहेत लिमिटेड आणि माणसं दुप्पट! कसं करणार ॲकोमोडेट?

बेटा : (सात्त्विक संतापाने) हा सरळसरळ अन्याय आहे, अन्याय! त्यांनी सगळया पुढल्या सीटा ढापल्या आहेत, आपल्याला मागल्या दिल्या आहेत! धिस इज नॉट डन!!

मम्मामॅडम : (घाबरून जात) मी करतेय सगळं नीट! 

बेटा : (निर्धाराने) नो मीन्स नो!! आम्हाला मागल्या सीटा चालणार नाहीत! आमच्यामुळे यांचा शो होतोय, हे त्यांनी विसरू नये!

मम्मामॅडम : (गालात हसत) आपल्याला मागल्या सीट्‌स बऱ्या आहेत! त्या दोन्ही पार्ट्यांना वाटतंय की हे त्यांचं नाटक आहे! पण हा आपला सिनेमा आहे, हे त्यांना अजून कुठं ठाऊक आहे? सिनेमाला मागली तिकिटंच चांगली! कुछ समझे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com