ढिंग टांग : कुठायत खड्डे?

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

खड्डे ही एक काल्पनिक गोष्ट असून पुढारलेल्या मुंबईकरांनी तरी त्यावर विश्‍वास ठेवू नये. मुंबईच्या रस्त्यांवर अनेक खड्डे असल्याच्या तक्रारी करणारे लोक हे समाजात तेढ पसरवणारे स्वार्थी राजकारणी आहेत, हे ध्यानी घ्यावे. खड्डे हा प्रकार निव्वळ अंधश्रद्धा आहे. तो अस्तित्त्वात नाही, हे आम्ही अनेक प्रकारे सिद्ध करून दाखवू शकतो. खड्डे फक्‍त चांद्रभूमीवरच आढळतात. पृथ्वीचा पृष्ठभाग हा बव्हंशी सपाट असल्या कारणानेच येथे जीवसृष्टी नांदत्ये, हे वैज्ञानिक सत्य अज्ञ लोकांस माहीत नाही. मुंबईतील खड्डे ही तर हास्यास्पद कल्पना आहे. गुळगुळीत रस्ते आणि त्यावरील सुळसुळीत वाहतूक यासाठी मुंबई विश्‍वात प्रसिद्ध आहे.

खड्डे ही एक काल्पनिक गोष्ट असून पुढारलेल्या मुंबईकरांनी तरी त्यावर विश्‍वास ठेवू नये. मुंबईच्या रस्त्यांवर अनेक खड्डे असल्याच्या तक्रारी करणारे लोक हे समाजात तेढ पसरवणारे स्वार्थी राजकारणी आहेत, हे ध्यानी घ्यावे. खड्डे हा प्रकार निव्वळ अंधश्रद्धा आहे. तो अस्तित्त्वात नाही, हे आम्ही अनेक प्रकारे सिद्ध करून दाखवू शकतो. खड्डे फक्‍त चांद्रभूमीवरच आढळतात. पृथ्वीचा पृष्ठभाग हा बव्हंशी सपाट असल्या कारणानेच येथे जीवसृष्टी नांदत्ये, हे वैज्ञानिक सत्य अज्ञ लोकांस माहीत नाही. मुंबईतील खड्डे ही तर हास्यास्पद कल्पना आहे. गुळगुळीत रस्ते आणि त्यावरील सुळसुळीत वाहतूक यासाठी मुंबई विश्‍वात प्रसिद्ध आहे. मुंबईतील रस्त्यांवर भरमसाठ खड्डे पडल्याचा तद्दन खोटा आरोप झाल्याने व्यथित होऊन आम्ही अखेर स्वत: पाहणीस बाहेर पडलो. संपूर्ण मुंबईतील रस्ते पालथे घातल्यानंतर आम्ही ठामपणे सांगू शकतो की मुंबईत फक्‍त चारशेचौदा खड्डे आहेत. चार्शेचौदा! या संख्येत आणखी सहा खड्ड्यांची भर टाकणेदेखील आम्हाला जमले नाही. 

मुंबईतील रस्त्यांचा दर्जाच इतका आंतरराष्ट्रीय आहे, की देशोदेशीचे तज्ज्ञ मुंबई रोड टेक्‍निकचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर येथील तज्ज्ञ मंडळींना आम्ही स्वत: मुंबईच्या रस्त्यांचे दर्शन घडवले. एकही खड्डा नाही, हे बघून त्यांना धक्‍काच बसला. ‘असे रस्ते आमच्याकडे बनतील, तर आम्हीही तुमच्यासारखी प्रगती करू’ असे उद्‌गार त्यांनी काढले. तेव्हा आम्ही त्यांना ‘अशीच अमुची आई असती, सुंदर रूपवती... अम्हि सुंदर झाऽऽलो असतो...’ हे अजरामर गीत ऐकवले. त्यांना गीत आवडले; परंतु ‘अम्हि सुंदर झालो असतो’ या ओळीला त्यांचा आक्षेप होता. 

‘तुम्ही सुंदर नाही, असे कोण म्हणेल? किंबहुना तुमच्याइतके सुंदर कोणीही नाही...’ असे हाँगकाँगचे रस्तेतज्ज्ञ म्हणाले. पण ते असो. 

मुद्दा एवढाच, की मुंबईतील रस्त्यांवर फक्‍त चार्शेचौदा खड्डे दिसून आले. ही पाहणी आम्ही भिंगातून केली. अंधेरीबिंधेरी भागात आम्ही सूक्ष्मदर्शकाचाही वापर केला. सर्वात मोठा खड्डा साधारणत: ७ एमेम बाय ५ एमेम इतक्‍या आकाराचा होता. भरपूर पाणी प्याल्यास खड्डा पडून जाईल, असा सल्ला वैद्यकीय मंडळाने दिल्यानंतर काम फत्ते झाले. ह्या उपचारास हायड्रोथेरपी अथवा जलोपचार असे म्हंटात. पावसाळ्यात भरपूर पाणी तुंबल्यामुळे आपापत: मुंबईवर हायड्रोथेरपी झाली. त्या थेरपीमुळे होते नव्हते तेही खड्डे वाहून गेले!! सारांश इतकाच की मुंबईत आता खड्डे नाहीत.

एकेकाळी मुंबईत चिक्‍कार खड्डे होते. माणसांची हाडे खिळखिळी होत. आता होत नाहीत. कारण 

मुंबईत तर खड्डेच नाहीत. त्यामुळे कोणालाही ठेच म्हणून लागत नाही. कुणाला ठेच लागू नये मणून मुंबईची मुन्शिपाल्टी दिवसरात्र झटत्ये आहे. हसू नका! हे सत्य आहे. कुठेही खड्डा पडणार असेल तर मुन्शिपाल्टीचे लोक आधीच येऊन त्या ठिकाणी पोचतात व पडणारा खड्डा आधीच बुजवून टाकतात. ही खबरदारी घेतल्यामुळे मुंबईत खड्डेच नाहीत. 

‘खड्ड्यात जा’ ही मराठी शापवाणी मुंबईकरांवर असर करीत नाही. कारण एखाद्यास खड्ड्यात जावयास सांगितले तर त्याला चंद्रावरच जावे लागणार! त्याची सोय करण्यासाठीच तूर्त चांद्रयान पाठवण्यात आले आहे. यथावकाश खड्डेदर्शनसाठी मुंबईकरांच्या चांद्रसहली काढण्याचा आमच्या मुन्शिपाल्टीचा इरादा आहे. 

...हे सगळे आम्हाला मुंबईच्या महापौरांनी सांगितले. ‘कुठायत खड्डे?’ असे आम्ही त्यांस विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली. एवढेच. बाकी सारे गेले खड्ड्यात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article mumbai potholes