ढिंग टांग : बौद्धिक! (एका आयात आमदाराचे...)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

नागपूर अधिवेशनाला आलो, तेव्हा आमचे नेते मा. देवेंद्रजींनी कानात सांगितले, की बुधवारी सकाळी तयार राहा हं... रेशीमबागेत जायचं आहे! 

प्रात:काळी उठून रेशीमबागेत गेलो. प्रखर राष्ट्रभक्‍तीने प्रेरित अशा वातावरणात भारल्यासारखे झाले होते. अखंड भारताचे स्वप्न बघणाऱ्या लक्षावधी भक्‍तांचे...आपलं...राष्ट्रभक्‍तांचे हे प्रेरणास्थान आहे. मीदेखील मनोभावे नमन केले. मग शिस्तीत बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिलो. मनात म्हटले, राजकारणात माणसाला काय काय करावे लागेल, हे सांगता येणे कठीण ! आयुष्यात कधी रेशीमबागेत जाऊन बौद्धिक वर्गाला उपस्थित राहीन असे वाटले नव्हते. जन्म काँग्रेसमध्ये गेला, काही महिन्यांपूर्वी कमळ पार्टीत आलो काय आणि नागपुरात बौद्धिकाला उपस्थित राहिलो काय... सारेच अतर्क्‍य आहे!

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेशीमबागेत आयोजित करण्यात आलेल्या बौद्धिकवर्गाला उपस्थित राहावे लागेल, असा निरोप मिळाल्यावर नाही म्हटले तरी थोडा खचलो होतो. म्हटले हे काय भलतेच! आमच्या काँग्रेस पार्टीत असले काही नसते... आपलं सॉरी... नव्हते! तिथे हायकमांड काय म्हणतेय, एवढे ध्यानात ठेवले तरी पुष्कळ व्हायचे. पण कमळ पार्टीत थोडे वेगळे आहे. पक्षश्रेष्ठींनासुद्धा कोणीतरी हायकमांड असते, हे इथे पहिल्यांदाच कळले!! 

नागपूर अधिवेशनाला आलो, तेव्हा आमचे नेते मा. देवेंद्रजींनी कानात सांगितले, की बुधवारी सकाळी तयार राहा हं... रेशीमबागेत जायचं आहे! 

‘‘मॉर्निंगवॉकला? जाऊ की !’’ मी म्हणालो. नागपूरच्या गुलाबी थंडीत सकाळी एखाद्या बागेत जायला आपली तशीही हरकत नव्हतीच. पण मा. देवेंद्रजींनी जीभ चावून कान पकडत मान हलवली.  ‘‘बौद्धिकवर्ग आहे तिथं ! संस्कार होतात तिथं, संस्कार ! कळलं?’’ त्यांनी बजावले. मी म्हटले, ‘‘असेल बुवा!’’ रेशीमबागेत गेलो, तर तिथे कोणीच ओळखीचे नव्हते. थोड्या वेळाने मा. गणेशजी नाईक येऊन शेजारी उभे राहिले, तेव्हा कुठे जिवात जीव आला. ‘‘आता काय करायचं असतं हिते?’’ त्यांनी मलाच विचारले.

हेही वाचा : ढिंग टांग : ‘नाट्य’मय निवड!​

‘‘काही नाही... सगळ्यांना एकत्र बसवून ते आपल्यावर संस्कार करणार आहेत म्हणे !’’ मी माहिती पुरवली. त्यावर ते काहीतरी नाराजीने पुटपुटले. तेवढ्यात कोकणचे सुपुत्र ज्युनियर राणे तिथे येऊन ठेपले. त्यांचा एकूण आविर्भाव असा होता, की जणू तेच सगळ्यांवर वेगळे संस्कार करणार आहेत ! 

जयकुमार गोरे यांनी आल्या आल्या माझा खांदा दाबून ‘सांभाळून घ्या’ असे सांगितले. मी काय बोलणार?

एकंदरित ‘बौद्धिक’ याविषयी बरेच गैरसमज आपल्या मनात होते, हे आता लक्षात आले आहे. बौद्धिक म्हंजे दुसरे तिसरे काहीही नसते, तर एकत्र बसून भाषण ऐकावयाचे असते. पूर्वीच्या काळी हेच बौद्धिक जमिनीवर बसून ऐकावे लागत असे. आता खुर्च्या असतात... वातावरण खेळीमेळीचे होते. आल्या आल्या एका बुजुर्ग व्यक्‍तीने आमचे स्वागत केले. 

‘‘कसं वाटतंय आता? बरे झालात ना?’’ त्यांनी विचारले. मी बुचकळ्यात पडलो. मी कधी आजारी होतो? बौद्धिकवर्गात उपस्थित राहिल्यावर एक लक्षात आले, की आयुष्यभरात आपले सारेच चुकत गेले आहे ! बालपणीच आपण या पक्षात आलो असतो तर बरे झाले असते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. या वयात चांगले वळण लागले तर नको का आहे? 

बौद्धिक घेणाऱ्या बुजुर्ग संघ स्वयंसेवकाने आम्हा सर्वांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. शिस्तीवर भिस्त असली की मोठमोठाली संकटे स्वस्त वाटू लागतात. शिस्तीचा फायदा सर्वांना होतो... थोड्या वेळाने कानात गुंगुं गुंगुं असा आवाज घुमू लागला. बाकी सारे राजकीय आवाज बंद झाले आणि मन एका क्षणी मस्त झाले...

...माणसाने कसे शिस्तीत राहिले पाहिजे, शिस्त असेल तर राजकीय आयुष्यात स्थैर्य येते, हे मला आता कळून चुकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang article Nagpur winter session