ढिंग टांग : पोळा!

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सर्व जय्यत तयारीनिशी बसलो आहो! मोबाइल फोनची ग्यालरी साफसूफ करुन ठेविली असून मेमरी कार्डदेखील काढून सदऱ्यावर घासून पुन्हा लावून ठेविले आहे. राहत्या निवासस्थानातील बरीचशी अडगळ कमी करून येणाऱ्या पुष्पगुच्छांसाठी नव्याने जागा करून ठेविली आहे.

सर्व जय्यत तयारीनिशी बसलो आहो! मोबाइल फोनची ग्यालरी साफसूफ करुन ठेविली असून मेमरी कार्डदेखील काढून सदऱ्यावर घासून पुन्हा लावून ठेविले आहे. राहत्या निवासस्थानातील बरीचशी अडगळ कमी करून येणाऱ्या पुष्पगुच्छांसाठी नव्याने जागा करून ठेविली आहे. मिठाईची बॉक्‍से कुठे ठेवावीत, त्याचीही योजना झाली असून श्रीफल व शालींसाठी वेगळा कोपरा मुक्रर करण्यात आला आहे. खुद्द आम्ही पलंगावर लोडास टेकून दिवसभरातील शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आतुरतेने प्रतिष्ठापित आहो. सबकुछ ठीक रहा, तो इन्शाल्लाह आज खाना भी यहीं बैठकर खा लेंगे...

...आज आमचा वाढदिवस!
वास्तविक, आम्ही सालगिराह यानेकी वाढदिवस याने की जयंती साजरी करीत आही. ज्या दिवशी पृथ्वीतलावर आपले आगमन झाले, त्याचा उत्सव आपण काय म्हणून साजरा करावा? तो जनलोकांनी करावा. आप्तेष्टांनी करावा. हितचिंतकांनी करावा. खुदा ना खास्ता, आम्हाला चाहते आणि आप्तेष्टांचा तुटवडा नाही. त्यामुळे आमचा वाढदिवस हा थेट क्‍यालिंडरातच एक मराठमोळा सण म्हणून समाविष्ट आहे.

...आज आमचा वाढदिवस!
वास्तविक, आम्ही नेमके केव्हा निपजलो याचे रेकार्ड उपलब्ध नसल्याने आमच्या शरीरयष्टीकडे बघून आमचा जन्म शंभर हिश्‍शांनी बैलपोळ्याचा असावा, असा कयास बांधण्यात आला. त्यानुसारच आमची कुंडली मांडण्यात आली. विशेष म्हणजे आमची रासदेखील वृषभ निघाली!! ‘जातक चंद्रप्रधान वृत्तीचा असून त्याची जाति शुक्रयुक्‍त असल्याचे आमच्या टिपणात नमूद करण्यात आले आहे. परंतु, ‘लेकाचा खोंडाप्रमाणे वाढेल व जगेल’ अशी भविष्यवाणी उघडपणे करण्याचे कुंडलीकर्त्याला काही कारण नव्हते. ( तो गुदस्ता चचला! दुसऱ्याला बैल म्हणणाऱ्याला डेंगू व्हईल, हा आमचा शाप भोवला. असो!) कावळ्याच्या शापाने बैल मरत नसला, तरी बैलाच्या शापाने कावळा खपतो, हे सत्य आहे. पुन्हा असो.

...आज आमचा वाढदिवस!
प्रारंभीच्या काळात कुणी बैल म्हटले, तर आम्ही रागारागाने शिंगे राखून अंगावर धावत असू. परंतु, बैल हा अत्यंत उपयुक्‍त असा प्राणी असून तो बुद्धिमानदेखील आहे, याचे प्रत्यंतर येत गेल्याने आमचा राग निवळत गेला. हल्ली तर कुणी बेंदराच्या बैलाची उपमा दिली, तर आम्ही मान लवून ‘थॅंक्‍यू’सुद्धा म्हणतो. बैल आणि आमच्यातील एक विलक्षण साम्य म्हंजे आम्ही बसल्याजागी डुलक्‍या घेण्यात माहीर आहो. दुसरे म्हणजे वशिंडाचे जागी कुणी खाजवले की आम्हाला भारी बरे वाटते! बर्फाची लादी वाहून नेणाऱ्या तगड्या बैलाप्रमाणे आमची तब्बेत नसली तरी बऱ्यापैकी चरबी राखून आहो! एरवी कुठलाही कडबा चालत असला तरी अधूनमधून गोग्रासाची भूक लागते, हेही एक साम्य. आज तर आम्हास पुरणपोळी आदीचा नैवेद्य दाखविला जाणार! गोडाधोडाचे खावयास मिळणार!! तेवढे शेंदूर फासण्याचे प्रकरण थोडे अवघड वाटते आहे...

आला आला शेतकऱ्या
पोयाचा रे सन मोठा
हाती घेईसन वाटी
आता शेंदुराले घोटा..
...असे बहिणाबाई चौधरींनी म्हणूनच ठेविले आहे. 

परिस्थिती कशीही असली तरी आम्ही सदैव चित्ती समाधान धरोनी असतो. भवताल कितीही विपरीत असला, खिश्‍यात फद्यादेखील नसला, तरी आपण स्थितप्रज्ञासारखे जगावे, हा संस्कार आम्ही वर्षानुवर्षे अंगी बाणविला आहे. त्यामुळेच काही जनलोक आम्हांस बैल म्हणतात. आमचा तर तो बहुमानच, पण त्याचे कृपया बैलसमुदायाने वाईट वाटून घेऊ नये. अहो, वर्षातून एकदा एकच अच्छा दिन आला तर कोणाला नको आहे? त्यासाठीच आम्ही जय्यत तयार बसलो आहो! येऊद्यात शुभेच्छा! कारण...बरोब्बर ओळखलेत! कारण...
...आज आमचा वाढदिवस!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang article pola