esakal | ढिंग टांग : युद्ध आमुचे सुरू!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : युद्ध आमुचे सुरू!

दबकत दबकतच आम्ही खोलीत शिरलो. खोलीत कोणीही नव्हते. डोळ्यांत बोट जाईल, असा काळामिट्ट अंधार मात्र होता. आम्ही अंगी सावधपण आणून मनाचा हिय्या करुन खोलीत पाऊल टाकले.

ढिंग टांग : युद्ध आमुचे सुरू!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दबकत दबकतच आम्ही खोलीत शिरलो. खोलीत कोणीही नव्हते. डोळ्यांत बोट जाईल, असा काळामिट्ट अंधार मात्र होता. आम्ही अंगी सावधपण आणून मनाचा हिय्या करुन खोलीत पाऊल टाकले. सर्वत्र सामसूम होती. तेवढ्यात-

‘‘खबर्दार जर टांच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राईराईएवढ्या...,’’ ऐसी गर्जना कानावर पडून आम्ही प्राणांतिक दचकलो. 

‘‘क...क...कोण?’’ आम्ही. उत्तर आले नाही. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) पावलांची नजीक हालचाल झाली. मानेवर थंडगार टोकदार स्पर्श झाला. कुणीतरी सदऱ्याच्या कालरीत (मागल्या बाजूने) बर्फाचा खडा सोडत आहे, असे वाटले. अंगावर शहारा आला.

‘‘बर्फ कोण लावतंय?’’ आम्ही.

‘‘खामोश...बर्फ नाही, तलवार आहे तलवार!’’ अंधारातून उत्तर आले.

‘‘त..त...तलवार? अरे बाप रे!’’ आम्ही ततपप केले. अंधारातून विकट हास्य उमटले. 

‘‘बोला, शत्रू की मित्र?,’’ अंधारातून सवाल आला.

‘‘अर्थात म...म...मित्र...,’’ आम्ही तत्काळ शरणागती पत्करली. न पत्करून सांगतो कोणाला? तलवारीचे पाते गळ्याला (मागल्या बाजूने) लागले होते. ‘अस्सं होय’ असे कुणीतरी पुटपुटले आणि अचानक खोलीतील दिवे लागले. चकचकाट झाला. आमचे डोळे दिपले. किलकिल्या डोळ्यांनी समोर पाहातो तो काय...साक्षात आमचे साहेब उभे होते. हातात महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे तेज एकवटलेल्या दोन-दोन तलवारी होत्या. रूप मोठे राजबिंडे होते. याच व्यक्‍तिमत्त्वाच्या आम्ही गेले कित्येक वर्षे प्रेमाऽऽत आहोत.

‘मुजरा, साहेब!’ आम्ही लागलीच मुजरा घालून विनम्र भावाने उभे राहिलो. आंगोपांगी फुटलेला घाम पुसण्याचा इरादा होता; परंतु तशी अद्याप आज्ञा झाली नव्हती. तस्सेच निथळत आम्ही उभेच्या उभे!!

‘‘मित्र असाल तर हर्कत नाही. पण शत्रू असाल तर तुमची खैर नाही..,’’ साहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात नवनिर्माणाचा निर्धार होता.

‘‘बरेच दिवस ख्यालीखुशाली कळली नाही, म्हणून दर्शनासाठी आलो होतो, साहेब!’’ आम्ही भक्‍तिभावाने म्हणालो. आमच्या आवाजात पोलिस ठाण्यात निष्कारण खेटे मारणाऱ्या निरलस कार्यकर्त्याची भावना होती.

‘‘सध्या आम्ही शत्रू शोधतो आहोत! आहे कुणी नजरेच्या पट्ट्यात?’’ अचानक साहेबांनी विचारले. आम्ही च्याटंच्याट! माणसे मित्रांच्या शोधात असतात, आमचे साहेब सदैव शत्रूच्या शोधात!! असो.

‘‘आपण अजातशत्रू आहा, साहेब! सर्व पक्षांचे नेते आपल्याला आदराने संबोधतात! आपल्या अमोघ वक्‍तृत्व आणि लढाऊ बाण्याचे पवाडे गातात! आपणांस शत्रूचे काय भय होय?,’’ एकदा स्तुतिपाठासाठी उभे राहिलो की आम्ही कुण्णा कुण्णाचे ऐकत नाही!!

‘‘ते सर्व ठीक आहे, पण लढवय्याला मित्र नसला तरी चालेल, पण शत्रू हवा! शत्रू सलामत तो राजकारण पचास!!’’ साहेब म्हणाले. ‘शत्रू सलामत तो राजकारण पचास’ हा सुविचार काही आम्हाला नीटसा कळला नाही. पण आम्ही तो विषय सोडला. आपले साहेब म्हणतात, म्हंजे तसेच असणार!!

‘‘महाराष्ट्राचा शत्रू तो आपला शत्रू!’’ आम्ही.

‘‘हॅ:, तो शत्रू जुना झाला! किंबहुना महाराष्ट्राचे सगळे जुने शत्रू आता आमचे मित्र झाले आहेत! दुसरं काहीतरी काढा!!’’ साहेब म्हणाले.

‘‘परकी हात नावाचा एक शत्रू एकेकाळी होता! तो सर्वांचा शत्रू असे...तसे काही तरी शोधा बुवा!!’’ हनुवटीवरील खुंट खाजवीत आम्ही म्हणालो. साहेब विचारात पडले. मग अचानक चुटकी वाजवून म्हणाले. ‘‘शाब्बास! ईव्हीएम हा आमचा आजपासून शत्रू! लोकशाहीची फसवणूक करणाऱ्या ह्या ईव्हीएमला लोळवू तेव्हाच स्वस्थ बसू! हर हर हर हर महादेव!!’’

‘फसणुकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा हरू’ हे वीरश्रीयुक्‍त गीत म्हणत आम्ही तेथून निघालो. इति. 

loading image