ढिंग टांग : साहेब!

ब्रिटिश नंदी
सोमवार, 29 जुलै 2019

उंच पाठीच्या खुर्चीत
आरामात रेलून बसलेल्या
आदरणीय साहेबांनी सहजच 
टाकली एक डोळस नजर...

उंच पाठीच्या खुर्चीत
आरामात रेलून बसलेल्या
आदरणीय साहेबांनी सहजच 
टाकली एक डोळस नजर...

प्रशस्त दिवाणखान्यात सभोवार
साचलेल्या गर्दीकडे 
साभिमान कटाक्ष टाकत
त्यांनी घेतली अचूक नोंद
नेणतेपणाने मनातल्या मनात,
हाजिर आणि नाजिरांची.
प्यादी आणि वजिरांची.
सरदार आणि सोजिरांची.
पुढे पुढे सरकणारी
पुष्पगुच्छांची रांग टिपत
आदरणीय साहेबांची 
वर्धिष्णू लोकप्रियता
थेट प्रक्षेपित करणाऱ्या
पाच-पन्नास टीव्ही कॅमेऱ्यांच्या
तिकांड्या झुंडीकडे बघूनही
आदरणीय साहेबांनी केले 
एक ठेवणीतले स्मित.

आदरणीय साहेबांच्या चुंबकीय क्षेत्रात
अचानक झालेल्या वृद्धीमुळे
राजकारणाच्या भौतिकीत
उडाली प्रचंड खळबळ, 
गडबडून गेले क्रिया-प्रतिक्रियांचे
न्यूटनीय सिद्धांत वगैरे.

निर्मम चेहऱ्याने आणखी एक
भलामोठा पुष्पगुच्छ स्वीकारत
सुप्रसिद्ध लकबीने डोक्‍याच्या मागे
हलका हात फिरवत
वाढीव चुंबकत्त्वानिशी 
आदरणीय साहेब अखेर म्हणाले : 
-मी रयतेचा...माझी रयत.
- इथली रयत सुखी व्हावी.
-इथल्या कामकऱ्याला दाम मिळावे.
-इथला शेतकरी कर्जमुक्‍त व्हावा.
-दुष्काळाची इडापिडा टळावी.
-चाकरमान्यांची कॉलर ताठ व्हावी.
-नळाचे पाणी पुन्हा वाहावे.
-पुराचे पाणी वाहून जावे.
-गटारांची झाकणे बंद व्हावीत.
-रस्त्यांचे खड्‌डे बुजून जावेत.
-दुसरे पक्ष फोडणार नाही,
- आलेल्याला दूर लोटणार नाही.
...महान लोकशाहीची चाड राहो,
अर्थव्यवस्था लठ्‌ठ आणि जाड होवो.
लोकहो, सारे काही चालले आहे,
ते तुमच्यासाठीच...तुमच्यासाठीच!
सारे राजकीय डावपेच, आडाखे,
मतांची गणिते, फोडाफोडीच्या उठाठेवी,
गुप्त बैठका, प्रच्छन्न तडजोडी
ह्या साऱ्याचा अर्थ एकच-
सारे काही रयतेसाठी...
सारे काही रयतेसाठी...

...असेच काहीसे बरेचसे बोलून
आदरणीय साहेबांनी जोडले
दोन्हीही कर, मिटले डोळे.
कपाळावरले गंधाचे बोट
लखलखून उठले...
थेट प्रक्षेपित झालेल्या 
साहेबांच्या अभीष्टचिंतनाला
लागले चार चांद, 
उजळून गेल्या चाऱ्ही दिशा...
सर्वमुखातून गजर झाला :
आदरणीय साहेब, तुमचा विजय असो!
साहेब चिरायु होवोत...
पूजनीय साहेबांचे राज्य आचंद्रसूर्य नांदो!!

...पुन्हा एकदा स्मित करत
साहेबांनी मिटल्या डोळ्यांतील 
एक डोळा उघडून 
शेजारी उभ्या असलेल्या
(कोवळ्या) युवराजांच्या कानात म्हटले :
‘‘खरं सांगायचं तर...
सारं काही तुझ्यासाठीच बरं,
सारं काही तुझ्यासाठीच!!’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article on politics