ढिंग टांग! : "कडकी'चा कायदा! 

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

आर्थिक मागास ऊर्फ कडका विधेयक पार्लमेंटात पास झाल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अश्रूनीर डोळां वाहू लागले, अक्षरश: भरून पावलें...एरव्ही आम्हा कडका कंपनीला कोण विचारतो? परंतु आपल्या "घर्कानघाटका' अवस्थेचा सहानुभूतीने विचार करणारा कुणीएक देवदूत दिल्लीत (जाऊन) बसला आहे, ह्या कल्पनेने आधार वाटला. अच्छे दिनांचा प्रारंभबिंदू हाच नव्हे काय? असेही मनात येऊन पुढील खेपेस "होय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा'च्या जाहिरातीत विनामूल्य भूमिका करण्याचेही आम्ही मनोमन ठरवून टाकले.
 

आर्थिक मागास ऊर्फ कडका विधेयक पार्लमेंटात पास झाल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अश्रूनीर डोळां वाहू लागले, अक्षरश: भरून पावलें...एरव्ही आम्हा कडका कंपनीला कोण विचारतो? परंतु आपल्या "घर्कानघाटका' अवस्थेचा सहानुभूतीने विचार करणारा कुणीएक देवदूत दिल्लीत (जाऊन) बसला आहे, ह्या कल्पनेने आधार वाटला. अच्छे दिनांचा प्रारंभबिंदू हाच नव्हे काय? असेही मनात येऊन पुढील खेपेस "होय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा'च्या जाहिरातीत विनामूल्य भूमिका करण्याचेही आम्ही मनोमन ठरवून टाकले.

सांगावयास अभिमान वाटतो, की आम्ही बालपणापासून नव्हे, तर पिढ्यान्‌पिढ्या आर्थिकदृष्ट्या तद्दन मागास आहो! टमाट्यांच्या राशी फेकून देणारे शेतकरी बघितले, की आमच्या हृदयाचा ठोका चुकत असे. चरव्याच्या चरव्या दूध ओतून देणाऱ्या कास्तकारांकडे पाहून आमचे तोंड कडू पडत असे. पण आम्हाला कधी कोथिंबिरीची एवढीशी जुडी दहा रुपयांच्या खाली मिळाली नाही, हे आम्ही शपथेवर सांगू! गेल्या तीन पिढ्यांत आमच्या घराण्यातील कोठल्याही कर्त्या पुर्षाचे पगारात भागले नाही. दर महिनाअखेरीस होणारी ओढघस्त कधीही चुकली नाही. इमानेइतबारे चाकरी करूनही आम्हाला कधी ना घर बांधता आले, ना वडलार्जित जमिनीच्या जोरावर मोर्चेबांधणी करता आली. आता आम्हाला किमान दहा टक्‍के तरी आधार आहे!!

सकाळी उठून आम्ही श्रीमान आदरणीय नमोजी ह्यांच्या स्नेहाळ, मायाळू अशा तसबिरीला शतप्रतिशत वंदन करून बाहेर पडलो. पाहतो तो काय! सर्वत्र आनंदीआनंदाचे वातावरण होते. आम्ही तडक आमच्या लाडक्‍या कमळ पार्टीच्या हपिसात गेलो. तिथे निवडणूक जिंकल्यात जमा असल्याप्रमाणे माहौल होता. सज्जातच आम्हाला वंदनीय अडवानीजी भेटले. त्यांना वांकून नमस्कार केला. त्यांनी कोपरापासून नमस्कार केला! आम्ही पुढे निघालो.

"ये कोई चुनावी जुमला नहीं. स्लॉग ओव्हर में लगाया हुआ पेहला छक्‍का है...,'' असे एक उत्साही सद्‌गृहस्थ विजयी मुद्रेने सांगत होते. एकंदरित त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ एवढाच की "सर्वेपि सुखिन: संतु, सर्वे संतु निरामया' ह्या उक्‍तीनुसार सर्वांची काळजी करणारा एक नमोजीनामक परममायाळू देवदूत लोककल्याणाखातरच इहलोकी उतरला असून, सदरील विधेयक हे एक ऐतिहासिक स्वर्णिम असे पर्व आहे. इतिहासाचे आम्हाला विशेष कौतुक नाही. ऐतिहासिक काय, काहीही असू शकते, पण तरीही उगीच अनमान नको म्हणून आम्ही पुन्हा एकवार मनोमन नमोजींना वंदन केले, आणि तेथूनही सटकलो.

...मजल दरमजल करीत आम्ही कांग्रेस पार्टीच्या गोटात डोकावलो. अपेक्षेप्रमाणे तेथे निवडणूक हरल्यासारखे वातावरण होते. कांग्रेसचे वकील आणि सुप्रीम कोर्टाचे खासदार कप्पिलजी सिब्बल (डबल "प' की डबल "ब'? ह्यात आमचा घोळ होतो. तूर्त दोन्ही डब्बलच वापरू!) तिथे जिन्यात बसून (दातकोरण्याने) दाढेत अडकलेले काही खोदून खोदून काढण्यात निमग्न होते.

"नमस्तेजी, वकीलसाहब! कडका बिल बिलकुल कडऽऽक है...'' आम्ही विनम्रतेने म्हणालो. "क्‍या खाक कडऽऽक बिल है? बिलकुल धोखाधडीका मामला है!!... ह्या आरक्षणात आख्खा देश मावतो! कोणाकोणाला देणार नोकऱ्या आणि ऍडमिशन? सांगा, सांगा ना! काहीही लेकाचे बिलं आणतात!! निवडणूक जुमला आहे निव्वळ! भंपकपणाचा कळस!! तुम्हाला केव्हापासून सांगतो आहे, की भयंकर फेकूगिरी आहे ही सगळी! मरेना का आपल्याला काय?...'' असा थोर युक्‍तिवाद करत त्यांनी आम्हाला गारद केले. त्यांचे शेवटचे वाक्‍य मात्र आम्हाला अंतर्मुख करणारे वाटले.

"विधेयक भंपक आणि फ्रॉड असले तरी आमचा पाठिंबा आहे... बरं का!'' ते म्हणाले. 
...आम्ही कृतज्ञतेने त्यांना थॅंक्‍यू म्हणालो. इतकेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang Article Published In Sakal