ढिंग टांग! : भेट! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

स्थळ : 10, जनपथ, देल्ही. 
वेळ : दुपार्ची. 
काळ : भोजनोत्तर...समोशाचा. 
प्रसंग : अभूतपूर्व. 
पात्रे : तितकीच अभूतपूर्व. 

साहेब : (खास ठेवणीतल्या आवाजात) अ...जय महाराष्ट्र! बरं का... 
महामॅडम : (डोळे बारीक करुन पाहत) आपण आधी भेटलोय का? 
साहेब : (विचार करत) तुम्ही कधी शिवाजी पार्कात आला होता का? 
महामॅडम : (गोंधळून) हे कुठेशी आलं? 
साहेब : (संयमानं) ...मग आपण पहिल्यांदाच भेटतोय! 
महामॅडम : (निरखून बघत) तुमचा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो! तुम्ही सिनेमात तर नाही? 
साहेब : (कळवळून) अजून तितकी वेळ नाही आलेली हो!! 
महामॅडम : (शिष्टाचार आठवून) बसा, बसा ना आपण! 
साहेब : (बसत) धन्यवाद! तुम्ही बसायला सांगितलंत म्हणून! हल्ली कोण कोणाला असं सांगतं? 
महामॅडम : (सद्‌गदित होऊन) हल्ली कोण कोणाला असं भेटायला येतं? ते जाऊ दे! कसं काय येणं केलं? 
साहेब : (गोंधळून) कसं काय म्हंजे? दारातूनच आलो!! 
महामॅडम : (शिताफीने विषय बदलत) तुम्ही शिवाजी पार्कचे नाही का!! शिवाजी पार्क म्हंजे मुंबईचंच नं हो? आणि तुम्ही शिवाजी पार्क सोडून कुठं जात नाही का? 
साहेब : (आणखी संयमानं) जातो अधूनमधून! मध्यंतरी "सिल्वर ओक'पर्यंत पेडर रोडला जायचो!! 
महामॅडम : (ओशाळून) ओह, त्या रस्त्यावरून जाणं मी शक्‍यतो टाळते! 
साहेब : (विषयाला हात घालत) गेल्या निवडणुकीत मी तुमच्या पार्टीसाठी खूप प्रचार केला होता! 
महामॅडम : (हताशेनं) ह्या गोष्टीवर माझा विश्‍वास नाही! 
साहेब : (पुराव्यादाखल) व्हिडिओ लावू का? 
महामॅडम : (आणखी हताशेनं) आमचा प्रचार आम्हीच केला नाही, इतरांनी का करावा? जाऊ दे, झालं!! 
साहेब : (इकडे तिकडे पाहात) छान आहे तुमचं घर! इतकी पुस्तकं बघून बरं वाटलं!! 
महामॅडम : (किंचित हसून) थॅंक्‍यू! ह्यातली निम्मी मनमोहनसिंहजींनी भेट म्हणून वेळोवेळी पाठवली होती! 
साहेब : (खुलासा करत) मीसुद्धा एखादं बुक आणणार होतो! पण तूर्त हा बुकेच स्वीकारा! 
महामॅडम : (गुच्छ स्वीकारत) धानियावाद! 
साहेब : (दचकून) आँ? 
महामॅडम : (गुच्छ फुलदाणीत ठेवत) आय मीन थॅंक यू! माझ्याकडे काय काम काढलंत? 
साहेब : (गालावर तर्जनीची पोझ) काम ऍक्‍चुअली तुमचंच आहे! 
महामॅडम : (चक्रावून) माझं? माझं कुठलं आलंय काम? मी आता रिटायर झालेय! 
साहेब : (राग गिळत) मी विमा एजंट वाटलो का? 
महामॅडम : (चमकून) तुम्ही चुनाव आयोगाच्या दफ्तरात आला होता ना? 
साहेब : (शांतपणे) ते तुमचंच काम आहे! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, असा त्यांना आदेश देऊन आलोय! 
महामॅडम : (भिवया उंचावत) ऐकतील का ते? 
साहेब : (नाकाला रुमाल लावत) मला तसं वाटत नाही! आपण ऑर्डर द्यायची, एवढंच! 
महामॅडम : (हात झटकत) माझा आता कशावरच भरवसा राहिलेला नाही! आपली थोडीशी सारखीच केस आहे! एकाकडे पक्ष आहे तर अध्यक्ष नाही आणि दुसऱ्याकडे अध्यक्ष आहे, पण... 
साहेब : (आयडिया सुचवत) तेच सांगायला आलो होतो! तुमच्याकडे अध्यक्षपदाची व्हेकन्सी आहे ना? काय येतंय का लक्षात? 

-ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang Article in sakal on Sonia Gandhi and Raj Thackreay Metting