esakal | ढिंग टांग :  वन वे तिकीट!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  वन वे तिकीट!

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत मुजरा. गणपती बाप्पा मोरया! आमचे (मुंबईतील) घरी श्रींचे आगमन झाले असून मन कसे प्रसन्न झाले आहे.

ढिंग टांग :  वन वे तिकीट!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत मुजरा. गणपती बाप्पा मोरया! आमचे (मुंबईतील) घरी श्रींचे आगमन झाले असून मन कसे प्रसन्न झाले आहे. या पत्रासोबत तीन पेढे (खुलासा : साइज मोठा आहे. काळजी नसावी.) पाठवत असून कृपया स्वीकार व्हावा. आमच्या यात्रेच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतच असतील. परवा सोलापुरात धमाल आली, ती बघितलीत का? साक्षात मा. मोटाभाई आले होते. मोटाभाईंनी तुमची आत्मीयतेने चौकशी केली. तुमचे उत्तम चालले आहे, असे मी परस्पर सांगून टाकले. सध्या आपल्या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. तुम्ही रोज कुणा ना कुणाला शिवबंधन बांधता आहात आणि आम्ही कुणा ना कुणाला हातात कमळाचा झेंडा घेऊन फोटोसाठी उभे करीत आहो! गेल्या सभेपर्यंत मी माझ्या हातांनी किमान दीड डझन विरोधी नेत्यांना सामील करून घेतले आहे. तुमचा आजवरचा स्कोर किती? कृपया कळवावे. आपल्यामध्ये निरोगी स्पर्धा असेल तर मला आवडेल! त्यामुळे आपल्या दोघांचाही विकास होईल, अशी भावना आहे.

आमच्या यात्रेच्या सांगतेला (शब्द दिल्याप्रमाणे) साक्षात मा. मोटाभाई उपस्थित राहिले. ‘‘आम्ही आमच्या पक्षाची दारे किलकिली केली तर ही अवस्था आहे. सताड उघडली तर विरोधी पक्ष नावालादेखील उरणार नाही’ असे ते म्हणाले. किती खरे आहे ना? ‘ही आमच्या पक्षातली मेगाभरती नसून ‘त्यांच्या’कडली मेगागळती आहे!’ अशी शाब्दिक कोटी मी केली. (तुमच्या सान्निध्यात हळूहळू मलाही जमेल असे वाटते!!) असो. 

हे विकासाचे वनवे तिकिट आहे, असे मी साऱ्यांना सांगतो आहे. तुम्हीही सांगत रहा! जागावाटपाच्या घोळात यांचे काय करायचे ते ठरवू. सध्या एकंदर लोंढा एवढा जबरदस्त आहे की किलकिली केलेली दारे आता सांदीफटी बुजवून कडेकोट बंद ठेवावीत, असे वाटू लागले आहे. कितीही दार दडपले तरी माणसे धक्‍काबुक्‍की करून आत येतातच. मला तर डोअरकीपर झाल्यासारखे वाटू लागले आहे. किंवा आपण दोघे गावातल्या मध्यवर्ती चौकात उभे आहोत, आणि गावातले सगळे रस्ते याच चौकात येऊन मिळतात, असे फीलिंग मला येते.

आपल्या युतीची औपचारिक बोलणी लौकरच होतील. युती करायची हे आपलं ठरलंय! बाकी सगळे फिजूल आहे. भेटीअंती बोलूच. कळावे. गणपतीबाप्पा मोरया! 

आपला सचोटीचा मित्र. नानासाहेब फ.
* * *
नाना-
गणपतीबाप्पा मोरया! तुम्ही पाठवलेले तिन्ही पेढे मिळाले. साइज तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मोठा नव्हता. तुम्ही पाठवलेले बारके बारके पेढे (तेही तीनच!) चिमट चिमट खाऊन आम्ही तोंड गोड केले इतकेच. तुमचे हेच तर आम्हाला आवडत नाही. स्वत: उकडीच्या मोदकांवर ताव मारायचा आणि मित्रांना वाटायला बारके बारके पेढे!! हॅत!! बाकी आमच्याकडे इनकमिंग जोरात चालू आहे. रोज सकाळी उठून मी ‘मातोश्री’च्या दिवाणखान्यात येतो. तिथे डझनभर लोकांना शिवबंधन बांधतो. मी हल्ली गंडेदोरेवाला बंगाली बाबासारखा तर दिसत नाही ना? अशी भीती मला वाटू लागली आहे. ‘ईडी, सीबीआई आदी की समस्याओं के लिए तुरंत मिलें...बाबा उध्दो बंगाली, एमआईजी के पास, कलानगर’ अशा टाइपची पाटी बनवून घ्यावी का? कळावे.

तुम्हाला हे विकासाचे वनवे तिकीट वाटते, आम्हाला वाघाच्या गुहेत जाणारी पायवाट वाटते. इथे येणारे ठसे दिसतात, जाणारे नाहीत!! काहीही झाले तरी ‘आपलं ठरलंय’ हे मात्र लक्षात ठेवा. त्यात काही दगाफटका झाला तर माझ्याशी गाठ आहे.
 उधोजीसाहेब.

loading image
go to top