esakal | ढिंग टांग  : निम्मेनिम!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग  : निम्मेनिम!

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी मानाचा शतप्रतिशत मुजरा. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमुळे थांबलेली आमची जनादेशयात्रा पुन्हा सुरू झाली असून, लोक आपली प्रचंड आठवण काढताना दिसतात. जातो तेथे ‘तुमचे मित्र कुठे आहेत?’अशी विचारणा होत आहे.

ढिंग टांग  : निम्मेनिम!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी मानाचा शतप्रतिशत मुजरा. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमुळे थांबलेली आमची जनादेशयात्रा पुन्हा सुरू झाली असून, लोक आपली प्रचंड आठवण काढताना दिसतात. जातो तेथे ‘तुमचे मित्र कुठे आहेत?’अशी विचारणा होत आहे. आमची यात्रा जोरात सुरू आहे. या ना त्या कारणाने खंड पडत असला तरी लोकांचे मिळणारे प्रेम मात्र अखंड आहे. 

कृपया सवड काढून आमच्यासोबत यात्रेत सामील झालात तर आम्हांस चारधाम यात्रेचे पुण्य मिळेल. असो. (आपली युती अबाधित आहे, हे सांगण्यासाठी वरील वाक्‍य लिहिले आहे. कृपया नोंद घ्यावी.) खरे तर मुंबईत प्रत्यक्ष भेटूनच बोलायचे ठरवत होतो. पण ‘सुरक्षिततेच्या मुद्द्याशी तडजोड नको’ असे सर्वांचे मत पडले. अखेर दूर अंतरावर जाऊन मगच पत्र लिहून तुम्हाला कळवावे, असे ठरवले. 

साहेब, तुम्ही आमचे जीवश्‍च कंठश्‍च मित्र आहात ! झाले गेले विसरून आपण एकत्र राहायचे ठरवले आहे. परंतु...परंतु...कसे सांगू...जीभ रेटत नाही !

तांतडीने तुम्हांस पत्र लिहिण्याचे कारण म्हंजे आमचे ज्येष्ठ मित्र मा. चंदूदादा कोल्हापूरकर यांनी काल आमची गाठ घेऊन ‘साहेब, पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका!’ अशी गळ घातली. मी त्यांना विचारले की ‘‘आता काय झाले?’’ 

‘‘तुमच्या मित्रपक्षाला १४४ जागा देता येणं शक्‍य नाही. तसं त्यांना ताबडतोब कळवा ! तसं केलं तर आपल्याला काहीच उरणार नाही...’’ असे त्यांनी पडेल आवाजात सांगितले. मी म्हटले, ‘‘असं कसं चालेल? आमचा शब्द गेलाय!’’ त्यावर त्यांनी डोळ्यांतून पाणी काढले. माझे मन द्रवले.

मुंबईत बसून निवडणुकीची रणनीती ठरवणाऱ्या मा. चंदूदादांच्या एकसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार महायुतीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला कामी येणार नाही, असा निष्कर्ष निघाला आहे !! पक्षाचा आदेश असा आहे की २८८ पैकी शंभरेक जागा मित्रपक्षाला सोडून उर्वरित जागा लढवाव्यात. तोच यशाचा मार्ग आहे...अशा परिस्थितीत काय करायचे? सारे काही निम्मेनिम वाटून घेऊ, असे मी सुरवातीला (उत्साहाच्या भरात) बोलून गेलो होतो, हे खरे आहे. पण आता शब्द पाळणे कठीण होऊन बसले. आपण समजून घ्याल, अशी अपेक्षा आहे. मित्राला मित्रानेच सांभाळून घ्यायचे नाही तर मग कोणी? तेव्हा १४४चा हट्ट सोडलात, तर बरे होईल, ही विनंती. बाकी भेटी अंती बोलूच. सदैव आपलाच. नानासाहेब फ.

***
नाना-
तुमचे पत्र वाचून अंगाची लाही लाही होत आहे. पावसाचे दिवस आहेत, म्हणून आम्ही उघडपणे भडकलेलो नाही, इतकेच !! ‘कमळाबाईवर विश्‍वास ठेवलात, तर कारभार बुडालाच म्हणून समजा,’ असा इशारा आम्हाला अनेकांनी हजार वेळा तरी दिला. तरीही आम्ही तुमच्यावर भरवसा ठेवला. का? तर पंचवीस-तीस वर्षांचे मैत्र असे वाया कसे जाईल, या भाबड्या विचाराने आमचा अखेरीस घात केला. शेवटी तेच खरे ठरले! वळणाचे पाणी वळणावरच गेले!! जसजशी निवडणूक जवळ येत चालली, तसतशी तुमची भाषा बदलू लागली. याला काय म्हणावे? सारे काही निम्मेनिम वाटून घ्यायचे, हे आपले ठरले होते. तुमचे अध्यक्ष मोटाभाई यांच्यासमोर बोलणे झाले होते. मला तो प्रसंग लख्ख आठवतो. बटाटेवड्यांचे वाटप समसमान करण्यासाठी तुम्ही ‘निम्मेनिम’चा मुद्दा लावून धरला असावात!! पण तेव्हाही तुम्ही दोन बटाटेवडे जास्तीचे उडवलेले आम्ही पाहिले होते. पण बोललो नाही !! ‘निम्मेनिम’च्या तत्त्वावरच आपली युती टिकून राहील, हे बरे जाणून असा. बाकी आम्ही कोणा कोल्हापूरकरांना ओळखत नाही !! त्यांचे त्यांच्यापास, आमचे आमच्यापास !! यात्रा आटोपून एकदा मुंबईत या, मग बघतो! कळावे. उधोजी.

loading image
go to top