ढिंग टांग :  आमचा शिक्षक दिन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग :  आमचा शिक्षक दिन!

शालेय जीवनात अनेक अडथळे येऊनही आमची गुरूवरील श्रद्धा कधी तसूभरदेखील ढळली नाही. दर गुरुपौर्णिमेस व शिक्षकदिनांस आम्ही आमच्या गुरूचे चरण धरून आशीर्वाद घेतोच घेतो.

ढिंग टांग :  आमचा शिक्षक दिन!

शालेय जीवनात अनेक अडथळे येऊनही आमची गुरूवरील श्रद्धा कधी तसूभरदेखील ढळली नाही. दर गुरुपौर्णिमेस व शिक्षकदिनांस आम्ही आमच्या गुरूचे चरण धरून आशीर्वाद घेतोच घेतो. आशीर्वाद घेतल्याशिवाय (चरणकमळ) सोडतच नाही मुळी. अखेर नाइलाज होऊन गुरुजन आम्हाला आशीर्वाद देतात. त्याच आशीर्वादाच्या पुंजीवर आमचा गुजारा होतो. वास्तविक आमचे शालेय जीवन अतिशय खडतर होते. गणितनामक विषयाने सारे बालजीवन नासविले. 

तरीही आमचे गणितगुरू सापळेगुरुजी यांना आमचे वंदन असो. सापळेगुर्जींनी आमच्यावर विशेष मेहनत घेतल्याने आमची गणितीबुद्धी काहीच्या काहीच कुशाग्र एवं तल्लख झाली. आम्ही भराभरा गणिते सोडवू लागलो. इतकी की पुढे पुढे कुणी गणित घालायच्या आधीच आमचे उत्तर तयार असे. आमच्या या गुणवत्तेमुळेच आम्हाला पुढे राजकारणात प्रवेश मिळाला. किंबहुना सापळेगुर्जींनीच ‘तू राजकारणात जाण्याच्या तेवढा लायकीचा आहेस’ असे प्रमाणपत्र दिले. सर्व विषयात नापास होऊनही आम्ही हसतमुखाने गावात हिंडत असल्याचे पाहून त्यांनी वरील गौरवोद्‌गार काढले होते. 

परीक्षेत पास होणे का आपल्या हातात असते? मागल्या खेपेला आम्ही मारुतीस दर शनिवारी तेल वाहण्याचे आश्‍वासन देऊन परीक्षेत सहजी यश प्राप्त केले होते. तेव्हा हुशार विद्यार्थ्याच्या मागील बाकावर बसण्याची संधी मिळाली. त्याचे आम्ही सोने केले. प्रयत्न करणाऱ्याला दैवाची साथ लाभते ती ही अशी. तथापि, मारुतरायाला दिलेले तेलाचे वचन आम्ही पाळू शकलो नाही. परिणामी पुढील वर्षी आमच्या नशिबी अपयश आले. 

राजकारणात समीकरणांची गणिते फार असतात. अनेकांना ती सोडवता येणे जिकिरीचे जाते. पण आम्ही त्यात निष्णात आहो. दोन अधिक दोन बरोबर चार असे शाळेत सापळेगुर्जींनी शिकविले होते; परंतु प्रत्यक्षात हा हिशेब चूक आहे, हे आमच्या वेळीच लक्षात आले. दोन अधिक दोन बरोबर चार कधीच होत नाहीत. राजकारणात तर हा हिशेब कंप्लीट फसतो. पू. सापळेगुर्जींच्या लक्षात आम्ही हे आणून दिले. त्यांनाही ते मनोमन पटले. त्यांनी आमच्या तळहातावर पट्टीने अनेक टाळ्या दिल्या आणि म्हणाले, ‘‘लेका, नाव काढचील घराण्याचं...बलव बापाला शाळंत!’’

आम्ही तीर्थरूपांस शाळेत बलवले. पू. सापळेगुर्जींनी त्यांस विद्यार्थ्यास पटावरून कमी करण्यात येत असल्याची सूचना देऊन दोन्ही कर जोडोन वाटेला लावले. पू. सापळेगुर्जींना भेटून आल्यानंतर तीर्थरूपांनी अनेक हिंसक मार्ग अवलंबून आमच्या गणिताच्या वेडाचे खच्चीकरण केले. अशी हिंसा योग्य नाही, हे आम्ही त्यांना वारंवार पटवून देत होतो. परंतु, काही उपयोग झाला नाही.  

अखेर आम्ही राजकारणात शिरलो. तेथे आमची गणितीबुद्धी भयंकर कामी आली. राजकीय समीकरणांमधले बदल आम्ही यथायोग्य पद्धतीने टिपले व वेळप्रसंगी समीकरणेही बदलून टाकली. उदाहरणार्थ, ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ किंवा ‘मित्राचा शत्रू हा आपलाही शत्रू’ किंवा शत्रूचा मित्र हा आपलाही मित्रच’ अशी काही जुनाट समीकरणे होती. ती आम्ही बदलून टाकली. हल्ली आम्ही ‘मित्र इज इक्‍वल टु शत्रू’ किंवा ‘शत्रू इज इक्‍वल टु मित्रच’ या दोन समीकरणांच्या जोरावर राजकारणाचा तोंडावळा बदलून टाकला आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाकडे पाहिलेत, तर आपणांसही त्याचे प्रत्यंतर येईल. हे सारे घडले पू. सापळेगुर्जीं आणि अन्य आदरणीय गुरुजनांमुळे. त्यांस आमचे या शिक्षकदिनी त्रिवार वंदन होय!