esakal | ढिंग टांग : थोबाडीत : एक देणे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : थोबाडीत : एक देणे!

ढिंग टांग : थोबाडीत : एक देणे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

एखाद्याने समजा भर चौकात तुमच्या थोबाडीत दिली तर तुम्ही काय कराल? अहिंसेचे तत्त्व अवलंबावे तर अशा परिस्थितीत (नियमानुसार) दुसरा गाल पुढे करणे अनिवार्य आहे. परंतु, नेहमीच हे शक्य होत नाही. कानपटात खाल्ल्यानंतर सर्वसाधारणपणे दोन अथवा तीन प्रतिक्रिया उमटू शकतात, असा प्रस्तुत लेखकाचा अनुभव आहे.

पहिली प्रतिक्रिया : गालावर हात ठेवून निमूटपणे ‘दात्या’समोर मान खाली घालून निघून जाणे. यात मानभंगाची भावना प्रबळ असते. थोबाडीत खाल्लेला इसम विषादयोगाने प्रभावित होतो. त्याला अन्न गोड लागत नाही. असा इसम अचानक अबोल झाल्याचीही उदाहरणे आहेत.

दुसरी प्रतिक्रिया : ही प्राय: संभ्रमाची असते. या स्थितीत कानसुलीत खाणाऱ्यास भवतालाचे भान राहात नाही. कानात ‘किण्ण्ण…’असा सततध्वनी गुंजत राहातो. कानाच्या पाळीच्या आसपासचा गालप्रदेश हुनहनतो. डोळ्यात टचकन पाणी येते, त्याचवेळी ओठांवर खुळ्यासारखे बारकेसे हसू येते! भवतालातील कोलाहल अर्धाएक मिनिट एकदम शांत होतो. विश्वाच्या पोकळीत जी नि:शब्द पोकळी असल्याचे उपनिषदांमध्ये वर्णिले आहे, ती पोकळी प्रत्यक्ष जाणवते. ॐ शांति: शांति: शांति: असे शब्द अबोध मनात उमटतात. ही एक प्रकारची आध्यात्मिक अनुभूती असते. उचंबळलेले हृदय अचानक जाग्यावर येते. डोळ्यांसमोर थोडेसे पांढुरके धुके येऊन अदृश्य झाल्याचा भास होतो. क्षणात नाहीसे होणारे हे दिव्य भास फक्त कविता करतानाच होतात, असे नव्हे, तर कवितेऐवजी कानफडात खाल्ल्यानेही होतात, हे प्रस्तुत लेखक ठामपणाने सांगू शकतो.

तिसरी प्रतिक्रिया : ही मात्र काहीशी हिंसक म्हणावी लागेल. कानसुलीत खाणारा इथे वडवानलासारखा पेटून उठतो. कानफटात मारणाऱ्याची गचांडी धरोन, त्यास खालते पाडुनु बुकलोन काढुनु, घोळसुनु लंबे करण्याची प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे उमटते. थोबाडीत मारणाऱ्यास नंतर कितीही लाथाबुक्क्यांनी तुडविले, तरीही एका कानफटीने जे साधते, ती गंमत त्यात उरत नाही. यामध्ये चौकातील प्रेक्षकांना मात्र अद्भुत मारामारीचे विनाशुल्क अवलोकन करण्याची संधी प्राप्त होते. अर्थात या प्रतिक्रियेसाठी माणूस खमक्या असणे आवश्यक आहे. मुळात अशा खमक्या मनुष्याच्या गालापर्यंत हात नेणेच धाडसाचे आणि आत्मघातकी पाऊल ठरु शकते.असो.

मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहू गेल्यास कान, नाक आणि हनुवटी यांच्या त्रिभुजप्रदेशातील विस्तीर्ण असा गालप्रदेश निसर्गाने का बरे निर्माण केला असेल? गाल या अवयवाचे काही नजाकतभरे उपयोग आहेत, हे मान्य. परंतु, त्यात तोंड घालणे इथे अस्थानी ठरावे. गालाचा मुख्य उद्देश कानसुलीत खाण्याचाच असावा, असे आमचे संशोधन सांगते. बालपणीच आमच्यावर तसले संस्कार करणारे एक बडबडगीत होते.: ‘लाल लाल गाल, बाप तेरा माल, बाप गया पूना, पूनासे लाया चूना, चूना निकला कडवा और…’ पुढील ओळी लिहिणे आम्हाला शक्य नाही. (अन्यथा, आमच्या कानाखाली जाळ निघेल!) गालाचा उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शनच वरील बडबडगीतात होते, असे आम्हाला वाटते. असो.

राजकारणाच्या क्षेत्रात मात्र (कुणी कुणाच्या भर चौकात थोबाडीत मारली तर), चौथी प्रतिक्रिया उमटते. ती अशी : समजा, मुख्यमंत्र्यांनी (घराबाहेर पडून) भर चौकात जाऊन एखाद्या मंत्र्याच्या सणसणीत थोबाडीत मारली तर सदरील मंत्री सर्वप्रथम दुसरी प्रतिक्रिया देईल. -गालावर हात ठेवून खुळ्यासारखे हसत खुर्चीवर जाऊन बसेल! कारण कानसुलीत खाल्ल्याने कुणी सत्तेची खुर्ची सोडल्याचा एकही पुरावा लोकशाहीच्या इतिहासात नाही. इति.

loading image
go to top