esakal | ढिंग टांग : ठिपक्यांची रांगोळी!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : ब्रिटिश नंदी

ढिंग टांग : ठिपक्यांची रांगोळी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

माझ्या तमाऽऽम बंधून्नो, भगिनीन्नो, बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण काय बोलू? (आँ?) कुठून सुरवात करु? कोरोनापासूनच सुरवात करावी. खरंतर कोरोनाचा शेवट जवळ आला आहे. (आँ? आँ?) होय, आलाच आहे. किंबहुना आपण तो आणलाय! माझ्या महाराष्ट्रानं एकजुटीनं विषाणूचा पाडाव केला आहे. तरी बेसावध राहून चालणार नाही. हात धुतलेच पाहिजेत. मास्क लावलाच पाहिजे. दोन हातांचं अंतर ठेवलंच पाहिजे. (इथं काही विद्यार्थी एकेक खुर्ची सोडून बसतात. खिशातून सॅनिटायझरचे दोन थेंब हातावर घेऊन चोळतात. हात नकळत भक्तिभावाने स्वत:च्या डोईवरुन फिरवतात!) आज आपण इथं जमलो आहोत कार्यशाळेसाठी. हो, ही शाळाच आहे. कालपरवाच शाळांची घंटा वाजली, आणि इथं आपला वर्ग भरला. अध्यक्षमहोदय आपले मुख्याध्यापक आहेत, आणि मी इतिहास, नागरिकशास्त्र आणि शरीरविज्ञान हे तीन विषय शिकवणार आहे.

मुलांनो, लहानपणी तुम्ही रांगोळी काढली आहे का? (विद्यार्थी चपापून एकमेकांकडे पाहून भिवया उडवतात.) ठिपक्यांची रांगोळी? सोपं आहे तसं : तर्जनी आणि आंगठ्याच्या चिमटीत रांगोळी घ्यायची आणि उकिडवं बसायचं. (इथे काही जणांच्या कमरेत उसण भरल्यागत होते. काहीजण ढेकरही देतात, तर काहीजण…जाऊ दे.) उकिडवं बसल्याशिवाय रांगोळी होत नाही. होत नाही म्हंजे पूर्ण होत नाही!! मग जीभ किंचित बाहेर काढून एकेक ठिपका टाकत जायचे. ठिपका रांगेत हवा! हो, रांगेत हवा म्हंजे हवाच! नाहीतर मग उपयोग नाही.

वाट्टेल तिथे ठिपके टाकायला आपण काय कबुतरं आहोत? सरळ रेषेत ठिपके टाकायचे. मग एकाखाली एक ठिपक्यांच्या रांगा काढायच्या. ठिपक्यांच्या रांगोळ्यांची अनेक पुस्तकं असतात. त्यात छिद्रं पाडलेले कागदही असतात. त्या कागदांवर रांगोळी पसरली तरी, छान ठिपके पडतात. करुन बघा!

शाळेत असताना काही जण वहीच्या मागल्या पानावर ठिपक्यांच्या रांगोळ्या पेनाने काढत असतील. काही जण गणिताच्या पेपरात ठिपक्यांच्या रांगोळ्या काढून पुढे मंत्री झाले! लहानपणी मी ठिपके घालून मोर काढत असे. जरा जरी ठिपका चुकला तर मोराचा कावळा होणार हे ठरलेलं!! कावळा झाला तरी हरकत नाही; पण महाराष्ट्राच्या विकासासाठी ठिपके हे घातलेच पाहिजेत. नुसता भाषणांचा भपका असून उपयोग नाही आणि सत्तेच्या लोण्याचा लपकाही उडवणं चांगलं नाही. माझं नवं घोषवाक्य आहे.- ठिपका साथ, ठिपका विश्वास…ठिपका विकास!

ठिपक्यावर ठिपके, ठिपक्याखाली ठिपके, ठिपकेच ठिपके! ठिपके के दोन आगे ठिपके, ठिपके के दो पीछे ठिपके,आगे ठिपके, पीछे ठिपके…बोलो कितने ठिपके?

…मुलांनो, माझ्या महाराष्ट्रात सध्या दोनच पक्ष आहेत. एक, ठिपकेवाल्यांचा, आणि दुसरा ठपकेवाल्यांचा. ठिपकेवाले ठिपके काढत जातात. ठिपके जोडले की माझ्या महाराष्ट्राचं सुंदर चित्र तयार होतं. हे विकासाचं चित्र आहे. दुसरा पक्ष आहे ठपकेवाल्यांचा. यांचं काम एवढंच की ठिपकेवाल्यांवर ठपके ठेवायचे!! ईडी काय, सीबीआय काय, एनआयए काय, एनसीबी काय…एबीसीडीची बाराखडी चालू आहे सध्या नुसती! ठपका ठेवायची धावपळ सुरु आहे. पण माझा महाराष्ट्र असल्या ठपक्यांना भीक घालणार नाही.

ठिपका म्हंजे मतदारसंघ. सगळे ठिपके जोडले की माझ्या महाराष्ट्राचं चित्र आपोआप तयार होतं. काढून बघणार ना मुलांनो? माझी नवी योजना जाहीर करतोय.-‘माझा ठिपका, माझी जबाबदारी!’ प्रत्येकानं आपापला ठिपका सांभाळा.

जय ठिपका. जय महाराष्ट्र.

loading image
go to top