

Just Two Days! A Satirical Take on the Food Adulteration Crackdown and the ‘Gatari’ Feast.
Sakal
प्रिय मा. श्री. अन्न-औषधदाते तुकारामशेठ यांसी, साष्टांग नमस्कार. गेले काही दिवस तुम्ही जी समाजात जागृती केली आहे, त्याला तोड नाही. काही झोपी गेलेले जागे झाले. काही दचकून अंग काढून जागे झाले. काहींची झोप उडाली!! हे एकट्या माणसाचे काम नोहे, पण आपण करून दाखवले!’ सबब, आपले अभिनंदन करण्यासाठी व आभार प्रकट करण्यासाठीच हा लेखनप्रपंच.
तुम्ही अन्न (आणि पेय) पदार्थांमधली भेसळ रोखण्यासाठी जे क्रांतिकार्य करत आहात, त्याने अचंबित झालो आहे. बारवाल्या शेट्टीने तर आपल्या बदलीसाठी त्यांच्या स्वामींकडे साकडे घातले आहे. ‘‘ग्यास का प्राब्लेम कतम ऊवा, तो अब्बी ये झंझट च्यालू होगया. धंदा कईसा करनेका?’’ हा त्याचा सवाल आहे. हल्ली बिचारा कुणीही गिऱ्हाईक आले की एफडीएचा माणूस नाही ना? अशा संशयाने पाहातो. काय करील बिचारा? दिवसच असे आले!!