esakal | ढिंग टांग : गुरु, महागुरु आणि…महाशिष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : गुरु, महागुरु आणि…महाशिष्य!

ढिंग टांग : गुरु, महागुरु आणि…महाशिष्य!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘‘गु रौरंघ्रीपद्मे मनश्चैन लग्नं तत किम तत किम तत किम तत किम?’’ गुर्वाष्टकातील या संस्कृत शिळोकाचा अर्थ ‘पद्मा नावाच्या मनाजोगत्या कन्येशी लग्न न जमल्यास किम नावाचा तरुण कुठे जाईल?’ असा आमच्या बालमनाने लावला होता, परंतु, तो तितकासा योग्य नाही, हे पुढे वेदनादायी अनुभवाने कळाले. अनुभवासारखा गुरु नाही, आणि गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती शक्य असते. ‘गुरुबिन ग्यान कहां से पाऊं?’ असे मा. मो. रफीसाहेबांनी म्हटलेच आहे. गुरु सतो, म्हणून शिष्य असतो. जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या तमाम गुरुजनांना वंदन करितो.

रविवारच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही अनेक ज्येष्ठ व नामवंत व गुरुसमान नेत्यांची मने टटोलली. कित्येकांचे मन गुरुंच्या स्मरणाने हेलावले. काहींनी तर चक्क डोळ्यास रुमाल वला. काहीजणांनी कानाच्या पाळीस हात लावला, तर काहींनी आमच्या कानाच्या पाळीस धरुन बाहेर काढले! इतकेच नव्हे तर, काहीजणांनी ‘गुरु’ म्हणताच चक्क डोळा मिचकावला! तथापि, या नामचीन नेतेमंडळींपैकी कोणीही आपल्या खऱ्याखुऱ्या गुरुचे नाव घेतले नाही, हे विशेष!

आयुष्यात प्रत्येकाला एक ना एक गुरु असतोच, व प्रत्येक गुरु हा कधी ना कधी शिष्य असतोच, असे आम्हाला पूर्वी वाटत असे. पण तो गैरसमज निघाला!! भारतातील बऱ्याच नेत्यांना कधीही शिष्य होताच आले नाही, येथील बहुतेक नेते हे थेट गुरुपदी पोचले, हे सत्य आहे. अनेकांनी आपल्याला गुरुच लाभला नसल्याचे साश्रू नयनांनी सांगितले. स्वयंभू व्यक्तिमत्त्वांचे हे दु:ख सामान्यांना कधीही कळणार नाही. तथापि, काही नेते आयुष्यभर विद्यार्थीदशेतच राहिल्याचे दिसून येते.

सतत शिष्यावस्थेत राहाणे, हीदेखील एक उपासनाच आहे. कितीही आग्रह करा, त्यांच्यातील विद्यार्थीभावना नष्ट होत नाही. एका खासदारास आम्ही ‘तुमचे गुरु कोण?’ असा थेट प्रश्न विचारला असता, त्यांनी कानाची पाळी पकडून माननीय पिंट्याभाई यांचे नाव घेतले, तर दुसऱ्या एका आमदाराने ‘येडा बाबू’ या गुरुश्रेष्ठांचे गुणगान केले. असे काही थोडे वगळता बाकी नामवंत नेत्यांचा कल गुरुनाम उच्चारण्याचे टाळण्याकडेच होता. उदाहरणार्थ- ‘‘गुरुला काहीही कळत नाही, त्यापेक्षा शाळेची घंटा बडवणाऱ्या शिपायाकडे जास्त शिकायला मिळते,’’ अशी प्रतिक्रिया एका मोठ्या नेत्याने ठामपणे दिली. सदरील नेता स्वयंभू असून बीमार झाल्यास कधीही डॉक्टरकडे न जाता कंपौंडरकडून औषध घेऊन येत असे, असा त्याचा लौकिक आहे. आणखी एका महानेत्याने ‘ग्रंथ हेच गुरु’ असे उत्तर दिले.

सदरील नेता इतिहासाची बुके वांचून महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी झटत आहे, असे कळले. दुसऱ्या एका महान नेत्याने माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा हाच माझा गुरु आहे, असे मुजरा करत सांगितले. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष हेच आपले परात्पर गुरु असल्याचे मोठ्या भक्तिभावाने सांगितले.

बहुतेक शिष्योत्तमांनी आपले वंदनीय गुरु हे सध्या दिल्लीत राहात असून ते सर्व जगताचे विश्ववंदनीय गुरु असल्याचे डोळे मिटून सांगितले. ज्याप्रमाणे, आकाशातून पडणारे पाणी सागरास मिळते, तद्वत जगतातील सर्व नमस्कार अखेर या विश्वगुरुंच्या चरणीच पोचतात, अशी श्रध्दायुक्त मते या शिष्योत्तमांनी व्यक्त केली. तेव्हा साहजिकच मग विश्वगुरुंचे गुरु कोण? असा प्रश्न उपस्थित जाहला. विश्वगुरु हे महाशिष्य असून त्यांचे गुरु ‘सिल्वर ओक’ आश्रमात स्थित आहेत, असे कळले. ‘गुरुदेवो भव’ हेच खरे!

loading image
go to top