
दोन पायावर उभे राहणे जिथे जिकिरीचे होते, तेथे डोकीवर उभे राहून गप्पा मारणे तर अलौकिकच मानावे लागेल. श्रेष्ठ योगगुरु व ख्यातनाम हठयोगी परमपूज्य बाबाजी बामदेव मात्र पायाऐवजी चक्क डोक्याने चालतात! त्यांना आमचे वंदन असो! किंबहुना, आम्ही असे म्हणू की, ‘डोके चालणे’, या वाक्प्रचाराचा अर्थ समजावून घ्यायचा तर, प. पू. बाबाजींकडे अंगुली दाखवावी! सध्या देशातील जनतेचे डोळे पांढरे करणाऱ्या ‘म्युकोरमायकोसिस’ या विकारावर आयुर्वेदात नेमके कोठले औषध आहे? हे विचारण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो...(Dhing Tang head down and legs up)
तेवढ्यात...
‘‘आलोपाथी यह एक ऐसी स्टुपिड और दिवालिया साइन्स है की पूछो मत,’’ भूकंप होण्याआधी जमिनीतून जशी गुरगुर ऐकू येते, तसा आवाज आला. आम्ही खाली पाहिले.
प्रश्नच नव्हता! प.पू. बाबाजी (जमिनीलगत) बोलत होते. आता तुम्ही विचाराल की आवाज जमिनीतून कां आला? तर त्याचे कारण प.पू. बाबाजी शीर्षासनावस्थेत होते. माणूस शीर्षासनात बोलते, तेव्हा अस्सेच होते. आम्ही एकदा बसून आणि एकदा उभे राहून असे दोनदा आपादमस्तक नमस्कार मारले!! (माणसाने नमस्कारात हयगय करु नये!) असो.
आमचा आयुर्वेद आणि योग यावर प्रगाढ विश्वास आहे. प. पू. बाबाजींनी आमची ग्यासची व्याधी संपुष्टात आणली, तेव्हापासून आम्ही त्यांचे भक्त झालो आहो. दुर्धर अशा ग्यासच्या व्याधीतून आम्हांस मुक्त केल्यामुळे इतरेजनांनीही त्यांच्याप्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त केली आहे. वायूविकाराचे इतरही अनेक सामाजिक त्रास आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी तपशीलात सांगू! विषय आलोपाथी विरुद्ध आयुर्वेद असा सनातन आणि गंभीर आहे!
प. पू. बाबाजी यांनी आधी योग आणि नंतर आयुर्वेदाचा प्रसार असा काही केला की नव्या सहस्त्रकाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णभस्मानेच लिहिले गेले पाहिजे! केसाच्या कलपापासून तळपायाच्या मलमापर्यंत यच्चयावत सारे आयुर्वेदीय उपाय त्यांनी जनसामान्यांसाठी उपलब्ध करुन दिले. याबद्दल आम्ही त्यांचे सदैव कृतज्ञ राहू. आता आयुर्वेदाचा प्रचार करताना काही प्रमाणात आलोपाथीचा अपप्रचादेखील करावा लागतो, हे ओघाने आलेच. उच्छ्वास घेतला नाही, तर श्वास कसा घेणार? इतके ते समजण्यास सोपे आहे. त्या तत्त्वानुसारच प. पू. बाबाजींनी आलोपाथीस ‘स्टुपिड और दिवालिया साइन्स’ असे म्हटले असावे.
‘‘स्टुपिड सायन्स?’’ आम्ही च्याट पडून म्हणालो. आमचा काही आलोपाथीवर रागबिग नाही. ते एक भयंकर महागडे प्रकरण आहे, एवढेच आम्हाला कळते. परंतु, ज्या आलोपाथीच्या जोरावर विश्वात सारे काही चालू आहे, त्याला स्टुपिड असे म्हटल्याने आम्हाला अगदीच स्टुपिड असल्यासारखे वाटू लागले. ‘‘हाइड्राक्सिक्लोरोक्विन फेल हुई, प्लाझमा थेरपी फेल हुई, रेमडेसिविर फेल हुई, फेबिफ्लू फेल हुई... आलोपाथी की हर दवा फेल हुई है...’’ पुन्हा जमिनीलगत आवाज आला.
आमच्या डोक्यात नुसते ‘हुई, हुई, हुई’ एवढेच शिरले, हा भाग वेगळा! ‘‘आलोपाथीला आपण स्टुपिड म्हटल्याबद्दल वकिलाची नोटिस आली आहे, बाबाजी!’’ आम्ही मयुरासन घालत त्यांना नोटिशीचा कागद दाखवला. त्यासरशी ते एकदम सरळ होऊन पायावर उभे राहिले आणि म्हणाले : ‘‘अरे स्टुपिड बालक, मैं तो सिर्फ व्हाट्सप का संदेस पढ रहा था!’’
...मग मात्र आम्हीच शीर्षासनात उभे राहिलो. कशात काय नि कशात काय, खाली डोके, वर पाय!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.