

Political Satire
Sakal
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान बुद्रुक. वेळ : अंतिम लढाईची.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थपणे अंतःपुरात येरझारा घालत आहेत. मधूनच मोबाईल फोन उचलून मेसेज तपासत आहेत. वाट पाहून पाहून जीव थकला आहे. अब आयेगा ऊंट पहाड के नीचे, बघून घेईन! वगैरे उद्गार स्वतःशीच काढून हवेत तलवारीचे हात करत आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (गर्रकन मान वळवून) कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : (लगबगीने आत येऊन मुजरा करत) मुजरा महाराज! आपण याद केलीत? बंदा हाजीर है..!
उधोजीराजे : (मिशीवर ताव मारत) राज्याचा काय हालहवाल आहे?
संजयाजी फर्जंद : (कडवट चेहरा करत) अतिशय वाईट आहे महाराज! चोर चोऱ्या करत आहेत, दरोडेखोर दरोडे टाकत आहेत! गद्दार राजरोज उजळमाथ्याने हिंडत आहेत! महागाईनं शीग गाठली असून बेरोजगारीनं कळस गाठला आहे! सामान्य माणसाला कुणीही वाली उरला नाही! एकंदरीत भयंकर परिस्थिती आहे, महाराज!!