अंडे का फंडा!  (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुर्गी क्‍या जाने अंडे का क्‍या होगा?
लाइफ मिलेगी, या तवे पे फ्राइ होगा?
होठ घुमा, सिटी बजा
सिटी बजाके बोल के भय्या
आल इज वेल...

- सुप्रसिद्ध कवि फुंगसुक वांगडू

मुर्गी क्‍या जाने अंडे का क्‍या होगा?
लाइफ मिलेगी, या तवे पे फ्राइ होगा?
होठ घुमा, सिटी बजा
सिटी बजाके बोल के भय्या
आल इज वेल...

- सुप्रसिद्ध कवि फुंगसुक वांगडू

वाचकहो, उपरोक्‍त प्रार्थनागीताचे नम्रभावाने उच्चारण करून आम्ही पुढील निरुपणास हात घालतो आहो. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असे एक प्राचीन संस्कृत सुभाषित असून उपनिषदांमध्ये अंड्याचा उल्लेख सापडतो, हे आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांना वेगळे सांगावयाची गरज नाही. बालपणापासूनच आम्हाला अंड्याचे फार वेड!! पिंडी ते ब्रह्मांडी ह्या न्यायाने समोर येणाऱ्या हरेक अंड्यात आम्ही ब्रह्मांडाचा अंश शोधत आलो. कधी आम्ही भुर्जीत पंचमहाभूतांचा (कांदा, ढोबळी मिर्ची, टमाटे, अंडी, कोथिंबीर) मेळ जमविला. कधी आमलेटात कांदा-बैद्याचे अद्वैत साधले. कधी ‘नैनं दहति शस्त्राणि, नैनं दहति पावका:’ ह्या चिंतनपर सुभाषिताचे सार तपासण्यासाठी उकळत्या पाण्यात अंडे फेकले. कधी ‘जीवनाचे ओझे आपण वाहण्याऐवजी आपणच जीवनाचे ओझे व्हावे,’ ह्या उक्‍तीनुसार वागून वर्षानुवर्षे नुसतीच अंडी उबवली. (अंडी उबवण्याच्या कामी आम्ही वाकबगार आहोत, हे आमच्या वरिष्ठांचे मत चिंत्य आहे. असो.) कोंबडीचे अंडे उबवता येण्याची सोय मानवी देहात नाही, हे प्राकृत सत्यदेखील आम्हाला ह्याच कार्यात निमग्न असताना उमगले. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर’ ही म्हण आम्हाला ठाऊक होण्याच्या आधीच आम्ही फकिरीवृत्ती स्वीकारली होती, त्यामुळे मुर्ग्याची मेहनत सत्कारणी लावणे, हा आम्ही आमचा धर्म मानला.

‘मेक इन इंडिया’च्या आजच्या जमान्यात आपलेही एक ‘अंडी उबवणी केंद्र’ असावे, असे कुठल्या उद्यमशील तरुणाला वाटणार नाही? ह्या स्वप्नापोटी आम्हीही काही काळ घरी अंडी आणून प्रॅक्‍टिसदेखील केली. पण अहह! ज्या नजाकतीने खुराड्यातील कोंबडी अंड्यावर बसते, त्या नजाकतीने आम्हाला नीट बसता न आल्याने अनर्थ झाला व आधी अंडी आणि नंतर आमचे डोके फुटले!! पण ते एक असो. अंडे कोंबडी देते अशी सर्वसाधारण गैरसमजूत आहे. पण नाही, तसे नाही. खाण्याचे अंडे हे गाडीवाला किंवा ठेलेवाला किंवा दुकानदार देत असतो. गेल्याच हप्त्यात आम्ही आमच्या पानवाल्याच्या टपरीत हारीने मांडलेली पांढरीशुभ्र अंडी पाहून पानवाला बदलला!! 

तथापि, गेले काही दिवस आमचे मनरुपी अंडे, हाफ फ्रायसारखे परिस्थितीरुपी तव्यावर तडफडते आहे. कां की, अंड्याचा रेट मजबूत वाढला आहे. पाच-सात रुपयाला एक अंडे!! ह्या भाववाढीच्या विरोधात आम्ही आमच्या आळीत भाषण ठोकले : ‘‘ही बसून राहण्याची वेळ नाही, कोंबडीच्यांनो! उठा, अंड करा... आपलं बंड करा!! आज अंड्यांना ब्रह्मांडाचे मोल आले आहे. अशीच स्थिती राहिली, तर एक दिवस-’’

आमचे भाषण पूर्ण होण्याआधी आमच्या अंगावर काही अंडी आली!! ती सर्वच्या सर्व पलाष्टिकची होती!! ‘से नो टु पलाष्टिक’ ही चळवळ सुरू असल्याने आम्ही साधी अंडीदेखील दुकानातून पलाष्टिकच्या (काळ्या) पिशवीतून आणणे सोडून दिले आहे. असे असताना डायरेक्‍ट अंडीच पलाष्टिक नावाच्या घातक पदार्थाची आणणे (किंवा मारणे) कितपत योग्य आहे? लाहौल बिलाकुवत!! एकवेळ आम्ही भेसळीचा खवा, मिठाई, तूप, तेल अथवा दूध आदी चालवून घेऊ. अगदी नकली नोटादेखील सहज चालवून घेऊ, (खरे तर चालवूच!) पण पलाष्टिकचे अंडे त्रिवार नाही! नाही!! नाही!!

Web Title: Dhing tang make in india