'तो' एक दिवस! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
Monday, 25 February 2019

"शिकारीला आलात?'' जीपमधील सहपर्यटकाने चौकशी केली. (सांगितले ना, मास्तर होते!) आम्ही त्यांना अहिंसक क्‍यामेरा दाखवला. 
"फोटो काढणार वाघाचे?,'' त्यांनी दुसरा दहा मार्कांचा प्रश्‍न विचारला. आम्ही काहीही न बोलता क्‍यामेरा डोळ्याला लावला. 
"जगात काय चालले आहे, आणि आपण इथं जंगलात काय करता आहात?,'' त्यांनी पुढला दहा मार्कांचा प्रश्‍न विचारल्यावर आम्हाला तोंड उघडणे भाग होते. 

जे श्री क्रष्ण! आजची आपली ही शेवटची "मन की बात'! पुन्हा तुम्हाला हा आवाज ऐकू येईल की नाही, हे निवडणुकीनंतरच ठरेल!! गेल्या 14 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठे होतो? उत्तराखंडातील जिम कॉर्बेट अभयारण्यात होतो, एवढे धूसर आठवते. मधल्या चार तासांत आम्ही काय करत होतो, असा राष्ट्रीय सवाल आहे. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. क्रिपा करीने सांभळ्यो... 

रामगंगा नदीच्या खोऱ्यात उतरले की कॉर्बेट अभयारण्याचा बारमाही हिरवागार पसारा दिसू लागतो. वाघाचे हमखास दर्शन देणारे हे अभयारण्य पर्यटकांचे जणू नंदनवन आहे. येथे उघड्या जीपमधून वाघ बघायला जावे, आणि शंभरेक सांबरे, हरणे बघून परत यावे, असे पर्यटकांचे वर्षानुवर्षं चाललेले असते. वाघ असा दिसत नाही, हे तेथे गेल्यावर परत येताना होणारे ज्ञान आहे. परंतु, तरीही आमचा येळकोट जात नाही. संधी मिळाली की जिम कॉर्बेटला जायला निघतोच. तशी संधी 14 फेब्रु.ला मिळाली... 

अभयारण्याच्या ढिकला झोनमध्ये वाघ ग्यारंटीने बघायला मिळतात, असे कळले. "ढिकला' हे आमच्या गुजरातीत "फलाणा ढिकला' अशा शब्दप्रयोगात म्हणतात. अशा फलाण्या ठिकाणी वाघ कुठे बघायला मिळणार? अशा विचारानेच आम्ही तेथे गेलो. आम्हा पर्यटकांना घेऊन जीप जंगलात निघाली. ढिकलाच्या घनदाट अरण्यातून सांबर रोडवर येताना उगवतीच्या दिशेला बघितले, की जंगलाचा अफाट पसारा दिसतो. तेथील कढीपत्त्याची उंच उंच हजारो झाडे पाहून एखाद्या दाक्षिणात्य पर्यटकाचे मस्तक फिरू शकते. एकढ्या कढीपत्त्यात कित्येक हजारो टन खमण ढोकळ्यावरची फोडणी होईल, असा विचार आला. तो सांबारातल्या कढीपत्त्यासारखाच काढून टाकला. एवढा कढीपत्ता? म्हणून तर ह्या मार्गाला सांबार रोड म्हणत नसावेत ना? जाऊ दे. 

ह्या परिसरात वाघांचा मुक्‍त संचार असून, त्यातील "पारो', "शर्मिली' आणि "सांबार रोड का नर' ह्या व्याघ्र प्रजातीचा एक प्रेमाचा त्रिकोणदेखील आहे, असे कळले. दूरवर काला पर्बत दिसतो. ह्यालाच एकेकाळी कालाधुंगी असे नाव होते, असे एका मराठी पर्यटकाने आत्मविश्‍वासाने सांगितले. ते शाळेत मास्तर असल्याचे बोलण्यावरून कळले. (मनात) म्हटले कालाधुंगी हे काय नाव झाले? इंग्रजांनी त्याचे स्पेलिंग आणि उच्चार दोन्ही चुकीचे लिहून ठेवल्याने फार पंचाईत होते. पण तेही जाऊ दे. 

"शिकारीला आलात?'' जीपमधील सहपर्यटकाने चौकशी केली. (सांगितले ना, मास्तर होते!) आम्ही त्यांना अहिंसक क्‍यामेरा दाखवला. 
"फोटो काढणार वाघाचे?,'' त्यांनी दुसरा दहा मार्कांचा प्रश्‍न विचारला. आम्ही काहीही न बोलता क्‍यामेरा डोळ्याला लावला. 
"जगात काय चालले आहे, आणि आपण इथं जंगलात काय करता आहात?,'' त्यांनी पुढला दहा मार्कांचा प्रश्‍न विचारल्यावर आम्हाला तोंड उघडणे भाग होते. 

"माझे विमान उशिराचे आहे. हवेत बिघाड आहे. तेवढ्या वेळात वाघ बघून होईल, असं वाटलं म्हणून-,'' आम्ही खुलासा करत होतो. तेवढ्यात मास्तरांच्या मुखातून "ऑक' असा आवाज आला. वाघाचा कडका लागल्यावर माकडे आणि हरणे असा कॉल देतात, असे आम्ही एका मराठी अरण्यकथांच्या पुस्तकात वाचले होते. (संदर्भ : नागझिरा) "ऑक'मुळे लक्ष गेले. समोर बहुधा "पारो' किंवा "सांबार रोड का नर' उभा होता. (कसे कळणार?) त्याला आम्ही युरियाचे वाटप, चार कोटी ग्यास कनेक्‍शन, शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये, आठ कोटी शौचालये, वीज कनेक्‍शन आदी ेनेहमीची यादी वाचून दाखवली. मांजरासारखा गारद झाला!! पुढचे आठवत नाही... 
आता कळले? आम्ही कुठे होतो नि काय करत होतो ते? गप्प बसा!! (मन की बात समाप्त) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing Tang on Narendra Modi in Jim Corbett shooting