नवतंत्रज्ञानाचे पाईक आम्ही!

दिनेश द. कुडचे
Saturday, 28 September 2019

औद्योगिक क्रांतीनंतर जगभर आमूलाग्र बदल झाले. शोधाची प्रक्रिया अखंड चालू राहिली. त्यात तंत्रज्ञानाचा वाटा मोठा आहे. त्यातूनच संगणक निर्मिती झाली. संगणकामुळे जगण्याची व्याख्या बदलली. या क्रांतीने मानवी जीवनात मोठी उलथापालथ झाली. जग त्याचे बरे-वाईट परिणाम भोगत आहे; मात्र तरीही पाऊल पुढेच पडते आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवं जग विस्तारू पाहत आहे. आजची तरुणाई या नवतंत्रज्ञानाची पाईक आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर जगभर आमूलाग्र बदल झाले. शोधाची प्रक्रिया अखंड चालू राहिली. त्यात तंत्रज्ञानाचा वाटा मोठा आहे. त्यातूनच संगणक निर्मिती झाली. संगणकामुळे जगण्याची व्याख्या बदलली. या क्रांतीने मानवी जीवनात मोठी उलथापालथ झाली. जग त्याचे बरे-वाईट परिणाम भोगत आहे; मात्र तरीही पाऊल पुढेच पडते आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवं जग विस्तारू पाहत आहे. आजची तरुणाई या नवतंत्रज्ञानाची पाईक आहे.

तंत्रज्ञान निर्मितीसाठी कस लागतो विचारशक्तीचा. त्याचा उपयोग करून ऑनलाइनचं जाळं विस्तारत आहे. सेवा, सुविधा, मनोरंजन सगळं घरबसल्या अनुभवता येत आहे. त्याचा आवाकाही वाढतो आहे. मोबाईलचं जग अवतरल्यानंतर कोठूनही आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी बोलणं ही अशक्‍यप्राय वाटणारी गोष्ट साध्य झाली आणि संवादाचं सर्वांत मोठं साधन हातात आलं. त्याचं बोट धरून आंतरजाल विस्तारू लागलं. सोशल मीडिया विस्तारला,‘व्हॉट्‌सॲप’ आलं, ‘ट्विटर’ आलं. जग अगदी जवळ आलं. अवघ्या काही क्षणांत एकमेकांशी संवाद, दृश्‍य संवाद साधणं शक्‍य झालं. आता याहीपुढे जाऊन माणसाच्या विचारांचा अभ्यास करून त्याला काय हवं हे समजून घेण्याचं तंत्र विकसित करण्यास सुरवात झाली आहे. त्यासाठी त्याची त्याची भाषा वापरली जाते आहे. उदा. ‘फेसबुक’वर तुम्हाला रंगीबेरंगी चित्रं आवडतात, तुमचा आवडीचा रंग तुमची ‘वॉल’ बहारदार बनवतो, तुमच्या प्रत्येक हालचालींवर ‘फेसबुक’ बारीक लक्ष ठेवून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तिथं खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ‘फेसबुक’चे अल्गेरिदम्स आपली भूमिका पार पाडतात. मानवी मनातील विचारांवर आधारित संगणक तंत्रज्ञानाला मागणी 

वाढू लागली आहे. मानवाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटकावर, अनुभवावर संगणकाच्या माध्यमातून अभ्यास केला जात आहे. त्यानुसार भविष्यातील भाकितं करणं शक्‍य होत आहे. त्यासाठी ॲनालिटीक्‍स, डेटा मायनिंगसारख्या तंत्राचा वापर वाढतो आहे.

भारतानं ‘चांद्रयान २’च्या माध्यमातून तांत्रिक ताकद दाखवून दिली. ‘सॉफ्ट लॅंडिंग’सारखी क्‍लिष्ट प्रणाली पृथ्वीवर बसून हाताळणं, संगणकाच्या माध्यमातून संदेश पाठविणं, संपर्कासाठी तितक्‍या ताकदीचं ‘डीप स्पेस नेटवर्क’ उभारणं, कमी इंधनात चंद्रावर पोचणं, ऑर्बिटरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेणं हे नव्या तंत्रज्ञानामुळेच शक्‍य झालं आहे. अमर्यादित अशा खगोल जगावरही आरूढ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते त्या बळावरच. 

यापुढे जाऊनही तंत्रज्ञानाचं स्वरूप बदलत आहे. संपर्क आणि दळणवळण, वित्त, वाहननिर्मिती, सूक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्‍नॉलॉजी), आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. माणसाच्या विचारांवर संगणकाचं राज्य असेल. त्याची व्याप्ती मोठी असेल आणि ते आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. अनुभव घेत बदलत्या तंत्रज्ञानाला आपलंसं करणं गरजेचं आहे. एलन मस्कसारखा तंत्रज्ञ ‘टाइम ट्रॅव्हल’ संकल्पनेवर काम करत आहे. त्याच्या विचारांना मर्यादा नाहीत. हे सगळं अद्‌भुत, अचंबित करणारं आहे. कित्येक वेळा अपयशी ठरलेला हा तंत्रज्ञ जिद्दीनं पेटून काम करतो आहे. 

आपल्या देशाकडे तरुणाईची मोठी ऊर्जा आहे. या तरुणाईमध्ये तंत्रज्ञानाची जिज्ञासा रुजणं, वाढणं आवश्‍यक आहे. त्यांच्या विचारशक्तीला सतत चालना मिळणं गरजेचं आहे. त्यातूनच कृत्रिम बुद्धिमत्ता वापराला व्यापक स्वरूप येईल. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवी विकासासाठीच कसा होईल हे पाहणं आवश्‍यक आहे. ड्रोन तयार होऊ लागले, तेव्हा त्याच्या वापराच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. सद्यःस्थितीत ड्रोन तयार झाले तेव्हा त्यातून वापराच्या वेगवेगळ्या कल्पना विकसित होऊ लागल्या आहेत. सीमा सुरक्षित करणं, दुर्गम भागात औषधे पुरवणं, छायाचित्रं घेऊन त्या माध्यमातून शेतीचा अभ्यास करणं आदींसाठी त्याचा उपयोग होऊ लागला आहे. आता स्फोटकं वाहून नेण्यासाठीही त्याचा वापर होऊ लागल्यानं त्याची भयावहता वाढली आहे. म्हणजे हल्ले करण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज नाहीच. रिमोटच्या साह्यानं कोठेही घातपात घडविता येतो. अशा प्रकारचा वापर नेहमीच घातक ठरतो. ‘सोफिया’च्या येण्यानं अनेक बाबी सुखकर झालेल्या असल्या आणि ती मानवासारखा विचार करत असली, तरी मानवी भावभावनांचा मेळ कसा घालणार? शिक्षणासाठी तिचा उपयोग होणार हे नक्कीच, पण भावनांचं काय? हा प्रश्‍न अनुत्तरितच. एक मात्र खरे या नवतंत्रज्ञानाचा उपयोग करताना आपण त्याच्या आहारी जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपलं जगणंही कृत्रिम बनण्याचा धोका आहे. बाकी त्याच्या वापरानं मानवी जीवन आणखी सुखकर होईल हे नक्की. त्यामुळेच त्यावर विश्‍वास ठेवून तरुणाई या तंत्रज्ञानाची पाईक होऊ पाहत आहे.

(लेखक सांगलीस्थित संगणक अभियंता आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dinesh kudche article New technology