बलुचिस्तानातील ‘ज्वालामुखी’चा उद्रेक

भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी बलुचिस्तानच्या सत्ताधीशांनी स्वत:ला स्वतंत्र म्हणून घोषित केले होते.
balochistan liberation army
balochistan liberation armysakal
Updated on

भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी बलुचिस्तानच्या सत्ताधीशांनी स्वत:ला स्वतंत्र म्हणून घोषित केले होते. महंमद अली जीना यांचीही त्याला मान्यता होती. या प्रांतात कलात, खारन, लासबेला आणि मकरन ही चार संस्थाने होती. कलात वगळता इतर तीन संस्थानांनी जीनांच्या दबावाखाली पाकिस्तानमध्ये स्वत:ला विलीन केले.

स्वातंत्र्याआधी कलात संस्थानचे वकील असलेल्या जीनांनीच देशाचे प्रमुखपद आल्यावर या संस्थानाच्या स्वातंत्र्यावर घाला घातला. भारत लष्करी हस्तक्षेप करण्याची भीती वाटून त्यांनी १९४८ मध्ये बलुचिस्तानमध्ये सैन्य पाठविले आणि बळजबरीने या प्रांताचा ताबा घेतला. तेव्हापासून बलुच लोकांचा सुरू असलेला संघर्ष आतापर्यंत सुरू आहे.

रेल्वेगाडीवर हल्ला करत प्रवाशांना ओलिस ठेवल्याने चर्चेत आलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा (बीएलए) संघर्षाचा इतिहास मोठा आहे. पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत असलेला आणि तरीही केवळ दीड कोटी लोकसंख्या असलेला बलुचिस्तान हा प्रांत बलुच समुदायाचे वर्चस्व असलेला भाग आहे. रखरखीत आणि डोंगरदऱ्या असलेल्या या भागात खनिजाचे भरपूर साठे आहेत.

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सर्वांनीच बलुचिस्तानला सापत्न वागणूक देत प्रचंड अत्याचार केले आहेत. सत्ताधीशांनी बलुचिस्तानला कायम मागास ठेवले. शेतीचा विकास होऊ दिला नाही, कोणताही मोठा प्रकल्प दिला नाही, त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. आरोग्याच्या बाबतीतही हा भाग कुपोषितच राहिला आहे.

येथील ८० टक्क्यांहून अधिक जनता दारिद्र्यात राहते. त्यामुळेच येथील ‘बीएलए’ आणि पाकिस्तानी सैन्यात कायम संघर्ष होत असतो. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस स्वतंत्र बाण्याच्या बलुचिस्तानला स्वायत्तता देण्याचे पाकिस्तानी नेत्यांनी दिलेले आश्‍वासन पाळले न गेल्याने बलुच नेत्यांचा पाकिस्तान सरकार आणि सैन्यावर राग आहे.

बलुच हा वांशिक समुदाय पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये पसरला आहे. अनेक वर्षांच्या दडपशाहीच्या धोरणांमुळे आता ते त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्य झाले आहेत. इराणमधील बलुच गट सिस्तान या इराण आणि अफगाणिस्तानमध्ये विस्तार असलेल्या ऐतिहासिक प्रदेशाच्या आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची अजूनही मागणी करत आहेत.

इराणने त्यांच्यावर अनेकदा कारवाई करत त्यांचा शक्तिक्षय केला आहे. पाकिस्तान सरकारने फसवणूक केल्यानंतर बलुच नवाबांनी आपला लढा चालू ठेवला. त्यातल्या काहींनी वेळोवेळी बलुचिस्तानचे स्वातंत्र्य जाहीर केले. हा प्रकार २००९-१० पर्यंत सुरू होता.

मात्र, त्यांना कधीही यश आले नाही. ‘बीएलए’चे नेतृत्व करणाऱ्या डॉ. नाझर यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताचीही मदत घेण्याची तयारी दर्शविली होती. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या मागणीला भारताकडूनच खतपाणी घातले जात असल्याचा पाकिस्तानचा प्रथमपासूनच आरोप आहे.

सैनिकांवर हल्ले

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीबरोबरच खनिज आणि नैसर्गिक वायू साठ्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बलुच लोकांना हवा आहे. पाकिस्तान सरकारला या मागण्या अजिबात मान्य नाहीत. उलट येथे त्यांनी सैन्यबळाच्या जोरावर प्रचंड हिंसाचार घडवून आणला असून अनेक बलुच नेत्यांना दहशतवादी ठरवून त्यांची हत्या केली आहे.

‘बीएलए’ने बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैनिकांना वारंवार लक्ष्य केले आहे. काही वेळा तर कराचीमध्ये जाऊनही हल्ले केले आहेत. त्यातच चीन राबवत असलेल्या आर्थिक कॉरिडॉरचाही बलुच नेत्यांना धोका वाटतो. त्यामुळे या प्रकल्पात काम करणाऱ्या चिनी कामगारांवरही हल्ले झाले आहेत.

या प्रकल्पामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून चीनच्या इशाऱ्याने पाकिस्तान सरकारने स्थानिक नागरिकांवर विविध तपासण्या, चौकशांच्या नावाखाली बरेच अत्याचार केले असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी पाकिस्तान तालिबान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तान सरकारबरोबरील शस्त्रसंधी भंग करत हल्ले सुरू केल्यानंतर ‘बीएलए’लाही जोर आला असून २०२४ या वर्षात ‘बीएलए’सह स्वातंत्र्यवादी गटांनी सरकारविरोधात मोठ्या कारवाया केल्या.

बलुच लोक प्रामुख्याने पंजाब प्रांतातील लोकांवर हल्ले करतात. पाकिस्तानच्या राजकारणात वर्चस्व राखणारे पंजाब प्रांतातील लोक बलुचिस्तानमध्येही स्थानिकांचा रोजगार हिरावून घेत असल्याचा बलुच लोकांचा आरोप आहे. त्यामुळेच मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये पंजाब प्रांतातील किमान ७० जण मारले गेले होते.

बलुच नेत्यांमध्ये एकी नसल्याचा फायदा पाकिस्तानला झाला आहे आणि त्यांनी सैन्याच्या जोरावर येथील बंडखोर संघटनांचा सामना केला आहे. सैन्याने अनेक बलुच नेत्यांची हत्याही केली आहे. बलुच लिबरेशन आर्मीसह इतर काही संघटनांनी काही दिवसांपूर्वीच एक निवेदन प्रसिद्ध करत ‘बलुच नॅशनल आर्मी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून प्रभाव वाढविण्याचा या संघटनांचा इरादा आहे. रेल्वेवरील हल्ला हा आपली ताकद दाखविण्याचाच एक प्रकार असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com