ढिंग टांग : दिवाळी फटाके! (राजकीय आणि पर्यावरणपूरक) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Nandi writes Diwali firecrackers political and environmental

आपले सर्व आदरणीय नेते पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची विनंती करत आहेत, त्यांचे ऐकावे!

ढिंग टांग : दिवाळी फटाके! (राजकीय आणि पर्यावरणपूरक)

सर्वप्रथम आमच्या कोट्यवधी वाचकांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा! पर्यावरणाचे भान ठेवूनच यंदाची दिवाळी सर्वांनी साजरी करायची आहे, असे आम्ही याठिकाणी आवाहन करु. आपले सर्व आदरणीय नेते पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची विनंती करत आहेत, त्यांचे ऐकावे! पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नेमके काय करावे? असे आम्ही काही सुजाण व्यक्तींना विचारले. कुणी सांगितले : फटाके उडवू नयेत. कुणी सांगितले : आवाज करणारे फटाके उडवू नयेत. कुणी म्हणाले : दिवे कमी लावा. कुणी म्हणाले : आतिषबाजी आणि रोषणाई कमी करा, आणि त्यातून वांचलेला पैसा विकासकामांसाठी वापरा. एका सुजाण गृहस्थाने ‘चकल्या कमी खा’ असे उत्तर दिल्यानंतर आम्ही विचारणे बंद केले. असो.

पर्यावरणपूरक दिवाळीसाठी आम्ही काही फटाक्यांचे प्रकार येथे देत आहो. त्यातले काही फटाके फुसके निघण्याची शक्यता आहे. काही जोरात आवाज करतील. पण ते सारे निवडणुकीच्या काळातच कळेल.

कमळ ब्रँड सुतळी बाँम्ब : गेली आठ वर्षे मार्केटमध्ये तेजीत असलेला आयटम आहे. काही लोक तो चाळीच्या जिन्यात मडक्यात लावून मोठा आवाज करतात. कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली पेटवण्यासाठी उपयुक्त.

बा. शि. फिफ्टी शॉट्स बॉम्ब : हा नवा आयटम यंदाच बाजारात आला! अत्यंत डेंजरस!! एकाच वातीवर पन्नास फटाके फुटतात. हा खोक्यात मिळतो! (किंवा खोक्यावरही मिळतो.) वात नीट पेटवता आली पाहिजे. अनेकदा असे होते की नीट पेटला नाही, असे वाटून फटाकेवादक (खुलासा : पेटी वाजवणारा पेटीवादक, तर फटाके वाजवणारा फटाकेवादक कां नसावां? असो.) जवळ जातो, आणि त्याची दाढी (नसली तरी) जळते.

शिउबाठा आगीनबाण : नाव जपानी असले तरी अस्सल मऱ्हाटी फटाका आहे. पूर्वी चांगला चालत असे. हल्लीच जरा प्रॉब्लेम झाला आहे. बा. शि. फिफ्टी शॉट्सने मार्केट खाल्ले. शिवाय गेल्या पावसाळ्यात कंप्लीट माल सर्द झाल्याची तक्रार होलसेल विक्रेते करत आहेत. तेव्हा खरेदी करताना नीट बघून घ्यावा. घरी आणल्यावर थोडे ऊन दाखवावे! पण एकदा पेटला की कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. काहीही भरोसा नाही. हा बाण पेटवण्यासाठी ‘घड्याळ’छाप फुलबाजीच लागते.

‘घड्याळ’छाप फुलबाजी : अतिशय उपयुक्त फटाका आहे. किंबहुना धड ना फटाका, धड ना अगरबत्ती असा हा मधला प्रकार आहे. परंतु, कुठल्याही प्रकारचा फटाका नीट शिलगावण्यासाठी ही फुलबाजी उपयुक्त आहे. हमखास पेटवणार! तसा धोकादायक नाही. विशेषत: ‘हात’ भाजण्याची भीती नाही.

‘हात’छाप भुईचक्कर : हे स्वत:भोवतीच गोलगोल फिरते. जळून गेल्यानंतरही बराच वेळ गरगरत राहाते. अतिशय स्वयंकेंद्रित फटाका! सुतळी बॉम्बचा धमाका झाला की हे फिरायचेच थांबते. पेटायला बराच वेळही लागतो. गुळगुळीत पृष्ठभागावर चांगला पेटतो. ‘घड्याळ’छाप फुलबाजीची आग नसेल तर हे भुईचक्कर काहीही कामाचे राहात नाही.

नवनिर्माण हापटबार : धर की हापट, धर की हापट! डझनाच्या हिशेबात मिळतात. फुटल्यावर खळ्ळ किंवा खट्याक असे ध्वनि निर्माण होतात. हाताळायला सोपा! पण डिमांड कमी!! कारण शिवाय फुटेलच याची काहीही ग्यारंटी नाही.

याखेरीज लवंगी, डांबरी माळ, पोपटबार, टेलिफोन, प्यारेशूट, चम्मनचिडी, सापगोळ्या, टिकल्या असेही अनेक फटाक्यांचे प्रकार आहेत. त्यांची ओळख यथावकाश करुन दिली जाईल. दिवाळीच्या पुन्हा शुभेच्छा.