
श्याम जाजू
भारताच्या सर्व आयातीवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा अमेरिकेच्या अध्यक्षांनी केली. या करांमध्ये भारतातील सर्वात महत्त्वाच्या निर्यातवस्तू जसे की औषधे (विशेषतः जेनेरिक औषधे), कापड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहनांचे सुटे भाग, औषधे, आणि औद्योगिक यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प प्रशासनाने असेही सूचित केले आहे की जर भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी करणे सुरू ठेवले तर त्याला अधिकचा म्हणजे अतिरिक्त दंडात्मक कर लादला जाईल. हे धोरण केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही तर भू-राजकीय, राजनैतिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. ट्रम्प संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत की, जर एखादा देश अमेरिकेच्या धोरणात्मक प्राधान्यांविरुद्ध गेला, तर त्याला आर्थिकदृष्ट्या शिक्षा होऊ शकते. हे धोरण अमेरिकाप्रणित पारंपारिक उदारमतवादी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेविरुद्ध आहे.