Indiscipline : भाष्य - बेशिस्तीची बजबजपुरी, नियमपालनाची संस्कृती रुजणं गरजेचं!

बेशिस्तीच्या, नियमभंगाच्या शेकडो बातम्या सर्व माध्यमांतून येत आहेत.
Indiscipline Traffic Rules Pune Police
Indiscipline Traffic Rules Pune Policeesakal
Summary

कोणतेच क्षेत्र असे शिल्लक राहिलेले दिसत नाही की, जेथे एक नागरिक म्हणून, एक छोटा समुदाय म्हणून किंवा  एक समाज म्हणून आपण नियमांचे व शिस्तीचे पालन करतो.

-डॉ. अजित कानिटकर

नियमाचा भंग करून त्यातून सुटका होण्यासाठी ‘सेटिंग लावणे’, ‘पटवणे’, ‘एड्जस्ट करणे’, ‘सांभाळून घेणे’ असे अनेक शब्दप्रयोग इथल्या दैनंदिन व्यवहारात सहज रुळलेले जाणवतात. असे शब्दप्रयोग जेव्हा रूढ होतात, तेव्हा त्यातून एक सामाजिक उणीव ठळकपणे दिसते. ती दूर करून नियमपालनाची संस्कृती रुजणे गरजेचे आहे. पण त्यासाठी मुळापासून काम करावे लागेल.  

सुमारे साठ वर्षांपूर्वी एका परदेशी व्यक्तीने (Foreigner) आपल्या समाजाचे वर्णन ‘कामचलाऊ अराजकता’ ( ए फंक्शनिंग अनार्की) असे केले होते. २०२१ मध्ये रामचंद्र गुहा यांनी याच नावाचे त्यांच्या लेखांचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. आजची परिस्थिती बघता ते वर्णन तसेच्या तसे लागू होते की काय असे वाटते. 

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून झालेल्या दंडाची वसुली विक्रमी होती, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्राबाहेर अनधिकृत बांधकामांवर हातोडे व बुलडोझर चालवलेल्या इमारतीची संख्या काही हजारांमध्ये आहे.  अशा या बांधकामाच्या तोडाफोडीत किती रुपयाचे सिमेंट-लोखंड-श्रम, पैसा व वेळ वाया गेला, याचे काही गणितच नाही. गेल्या आर्थिक वर्षात पुणे पोलिसांकडून (Pune Police) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून केलेली दंडवसुली. तोही उच्चांकच. 

Indiscipline Traffic Rules Pune Police
Rain in India : अग्रलेख - उद्याचा पाऊस!

कोणतेच क्षेत्र असे शिल्लक राहिलेले दिसत नाही की, जेथे एक नागरिक म्हणून, एक छोटा समुदाय म्हणून किंवा  एक समाज म्हणून आपण नियमांचे व शिस्तीचे पालन करतो. बेशिस्तीच्या, नियमभंगाच्या शेकडो बातम्या सर्व माध्यमांतून येत आहेत.  जागतिक क्रीडाक्षेत्रात उत्तेजक द्रव्यांचे सेवन करून चाचण्यात पकडले गेलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचे प्रमाण सर्वात जास्त. सध्या देशभर निवडणुका व क्रिकेटचे वारे आहे. आपल्याकडे क्रिकेट सामन्यातील सीमारेषेवर असलेले पोलीस सामना बघताना दिसतात. युरोपमधील जागतिक फुटबॉल सामन्यात सीमारेषेवरील तैनात पोलिस चुरशीच्या सामन्याकडेही शब्दशः पाठ फिरवून स्टेडियममधील प्रेक्षकांवर लक्ष ठेवून असतात. कर्तव्यापासून ते विचलीत होत नाहीत. या दोन उदाहरणांत भारत आणि प्रगत देश यातील एक फरक स्पष्ट होईल. 

उच्चविद्याविभूषित व मार्गदर्शनाच्या भूमिकेत असणाऱ्या व्यक्ती पीएचडीच्या कामासाठी विद्यार्थ्यांकडून उघडपणे लाच मागतात. दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरणे, मीटरच्या नोंदीत फेरफार करणे, आकडा टाकून अनधिकृत वीज फुकट वापरणे,  पाण्याचे आवर्तन नसताना शेताला पाणी वळवून घेणे,  धरणातील पाणी उचलण्याची परवानगी नसताना बिनदिक्कत पंप लावणे,  नदीपात्रामध्ये कोणतीही शासकीय अनुमती नसताना वाळूचे ट्रकच्या ट्रक उपसणे, बी-बियाणावर खोटी लेबल लावून दुय्यम दर्जाची बियाणे व खते विकणे,  परवानगी नसताना ‘सीबीएसई’ व राज्य सरकारची मान्यताप्राप्त शाळा आहे, असे दाखवून अनेक वर्षे विद्यार्थ्यांची- पालकांची फसवणूक करत शिक्षणसंस्था चालवणे,  जमिनीवर रुग्णालय अथवा अन्य आरक्षणे आहेत, हे माहिती असूनही टोलेजंग इमारती उभ्या करणे, ओला व कोरडा कचरा वेगळा न करताच घराबाहेर जाऊ देणे, गडकिल्ल्यावर प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचे ढीग दिसणे.. ही यादी फार मोठी आहे.

Indiscipline Traffic Rules Pune Police
दक्षिण महाराष्ट्रातून 'घड्याळ' गायब! बालेकिल्ल्यातच नाही चिन्ह; राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हापूर, सांगली, साताराचे चित्र

शहर पाणीटंचाईने होरपळत असताना बंगळूरसारख्या शहरात गाड्या धुण्यासाठी पाण्याचा बेमुर्वतपणे वापर होतो. दंड भरूनही सुधारणा होत नाही. आपले सर्व उत्सव हे विद्रूप आणि कर्कश्य आवाजाचे व बेगडी भक्ती दाखवण्याचे प्रसंग झाले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाचे नियम बऱ्याच अंशी धुडकावून लावून ध्वनिवर्धक किंचाळत असतात. कुठकुठे आवाजाची पातळी व वेळ अगदी कशीबशी सांभाळली जाते. श्रीमंत, गरीब,  शहरी ग्रामीण,  शिक्षित, अशिक्षित, स्त्री पुरुष असा कोणताच भेद सार्वजनिक बेशिस्तीत राहिलेला दिसत नाही.  दहा वर्षांपूर्वी जेव्हा सेलफोन भारतात प्रथम आले तेव्हा काही महाभाग दुचाकी चालवत एका कानाला सेलफोन लावून रस्त्यावर दिसत होते.  त्यावेळेस फक्त पुरुषमंडळीच हा उद्योग करत होती. आता सरसकट महिलाही अशी कसरत करताना दिसतात.  नको ते शिक्षण पुरुषांकडून स्त्रियांपर्यंत पोहोचले. 

पुण्यासारख्या शहरांमध्ये दहा वर्षांपूर्वी दुचाकी याचा अर्थ दोन जणांचे वाहन असे होते. आता सरसकट दुचाकीची प्रत्यक्षात तीन माणसांची चाकी झाली. अतिशय शिक्षित अशा उच्चभ्रूंच्या कुंपणबंद संकुलामध्ये हजारो रुपयांची महाग खरेदी केलेली कुत्रा-कुत्री डौलात फिरवणारे सदस्य दोनपाचशेचे प्लास्टिकचे स्वच्छतेचे सामान मात्र बाळगत नाहीत. त्यांची महागडी श्वान अपत्ये निर्धोकपणे व नियमितपणे भर रस्त्याच्या मध्यभागी सार्वजनिक पद्धतीने विष्ठाविसर्जन करताना दिसतात. ‘गाडीला काळ्या काचा लावू नका, दादा आप्पा मामा आबा’ असे नंबरप्लेटवर लिहू नका’, हे नियम वाहतूक पोलीस (Traffic Police) घसा कोरडा करून सांगत असतानाही दररोज अनेक गाड्या हा नियमभंग करताना दिसतात. त्यांना कोण बोलणार आणि सांगणार? दंड भरून हे सर्व महाभाग मोकळे होणार. नियमाचा भंग करून त्यातून सुटका होण्यासाठी ‘सेटिंग लावणे’, ‘पटवणे’, ‘एड्जस्ट करणे’, ‘सांभाळून घेणे’ असेही अनेक शब्दप्रयोग आमच्या दैनंदिन व्यवहारात सहज रूढ झाले आहेत. 

Indiscipline Traffic Rules Pune Police
Satara Lok Sabha : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत; पवारनिष्ठा पणाला!

नागरिकशास्त्राचे महत्त्व

नागरिकशास्त्राचे धडे व सामाजिक वर्तणुकीचे शिक्षण  या सर्व सामाजिक वर्तणुकीतील घसरण आपल्या समाजाला कुठे घेऊन जाणार आहे? एकीकडे आपले पंतप्रधान ‘अमृतकाळ’, ‘विश्वगुरू’ असे शब्द वापरतात; पण जमिनीवरील वास्तव त्याच्या जवळपास जाणे इतके तरी आहे का? उद्योग-व्यवसाय वेगाने वाढतात; पण त्या उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडणे बंद होते का? देश आत्मनिर्भर होत असताना या उद्योग- व्यवसायांमध्ये जे कर्मचारी काम करतात, त्यांची आर्थिक, शारीरिक व मानसिक सुरक्षा व त्यासाठीचे आवश्यक नियम हे उद्योगव्यवसाय पाळतात का, असे अनेक प्रश्न आहेत.

आपल्या सामाजिक जीवनात नियमपालनाबद्दलची ही बेजबाबदारीची भावना व अनास्था कशी काय निर्माण झाली, याच्या मुळाशी गेले पाहिजे. सगळ्यांच्याच शालेय पातळीवरील जडणघडणीत काही उणीव राहिली आहे का, हे पाहायला हवे . आपली मुले- मुली जेव्हा लहानाची मोठी होत असतात, तेव्हा अशाप्रकारे नियमांचे शंभर टक्के सचोटीने पालन करायचे असते, हे तत्त्व रुजवले जात नाही. अशा खऱ्याखुऱ्या नागरिकशास्त्राची शिकवणी दिली जात नाही. `भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...’ ही प्रतिज्ञा म्हणत असतानाच या देशातील सर्व छोटे-मोठे नियम मी पाळीन आणि इतरांना पाळायला प्रवृत्त करीन, अशीही प्रतिज्ञा आपण आपल्या मुला-मुलींना शाळेत शिकवतो का? त्याचे उत्तर नाही, असेच आहे.

Indiscipline Traffic Rules Pune Police
UPSC Exam Result : नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील जमादार, पाटील, कांबळे चमकले; 'यूपीएससी'त राज्यातून मोटवानी प्रथम

लहानपणापासूनच नागरिकशास्त्राचे हे सोपे सोपे नियम, वर्तणुकीतील बंधने व त्याचे आदर्श आपल्याला नव्या पिढीला, नव्या उत्साहाने सांगायला लागतील. खरे तर लोकांत किमान स्वयंशिस्त आवश्‍यक असते. लाल दिवा लागला असताना मी थांबणार म्हणजे थांबणार ही स्वयंशिस्त. दुसरे म्हणजे धोरणकर्ते, समाजधुरिण यांच्या वागणुकीतून मिळणारे आदर्शही चांगला परिणाम घडवतात. प्रश्न आहे तो तसे आदर्श समाजापुढे ठेवण्याचा. हे बदल घडवले नाहीत आणि त्यासाठी व्यापक प्रयत्न केले नाहीत तर अमृतकाळाकडे वाटचाल करणारा आपला देश नियमपालन आणि शिस्त याबाबतीत चार-पाचशे वर्षे भूतकाळातच राहील. ते टाळण्यासाठी पुन्हा कोऱ्या पाटीवर मुळातून सामाजिक वर्तनाचे नवे आदर्श घालून द्यावे लागतील. त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com