भाष्य : आत्मसन्मानाचे देणेघेणे

धनाढ्य उद्योगपतीने आपण कमावलेल्या संपत्तीचा काही भागच नव्हे, तर आपल्या कंपनीची संपूर्ण संपत्तीच एका महत्त्वाच्या कार्यासाठी दान केली.
भाष्य : आत्मसन्मानाचे देणेघेणे
Updated on
Summary

धनाढ्य उद्योगपतीने आपण कमावलेल्या संपत्तीचा काही भागच नव्हे, तर आपल्या कंपनीची संपूर्ण संपत्तीच एका महत्त्वाच्या कार्यासाठी दान केली.

- डॉ. अजित कानिटकर

धनाढ्य उद्योगपतीने आपण कमावलेल्या संपत्तीचा काही भागच नव्हे, तर आपल्या कंपनीची संपूर्ण संपत्तीच एका महत्त्वाच्या कार्यासाठी दान केली. हवामान बदल या समस्येवरील उपाययोजनांसाठी ती खर्च होणार आहे. पैशापेक्षा त्यातील ‘उद्दिष्ट’ महत्त्वाचे मानले आहे. त्यातून त्यांनी दिलेला संदेश विचारात घेण्याची गरज आहे.

‘एक तीळ सात जणांमध्ये वाटून घेणे’ ही म्हण ऐकत ऐकत अनेक जण मोठे झाले. १९६० ते १९८० च्या दशकामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो, असे संस्कार डाव्या, मधल्या व उजव्या विचारसरणीतून अनेक घरांपर्यंत पोहोचले. १९९०च्या दशकानंतर मात्र जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये बरेच बदल घडले. ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’, इथपासून ‘समाजाचे मला काही देणेघेणे नाही’, यापर्यंतचा काही व्यक्ती नि गटांचा टोकाचा प्रवास झाला. तर दुसरीकडे ‘अंथरूण पाहून पाय पसरणे’ या मानसिकतेतून बाहेर पडून सहा-सात आकड्यांचे पॅकेज, मोठे नफ्याचे आकडे आणि कोट्यवधी अब्जावधी रुपयाची संपत्ती मिळवणे, हेच काहींच्या आयुष्याचे ध्येय बनले. पण या प्रवासात जगभरात अनेक नवे प्रश्न निर्माण झाले. काही आधीचेच आणखी अक्राळविक्राळ बनून समोर आले.

या पार्श्वभूमीवर भांडवलदारांच्या पंढरीत म्हणजे अमेरिकेत conscious capitalism, ‘सामाजिक उद्योजकता’ असेही नवीन परवलीचे शब्द तयार झाले आहेत. या सगळ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील एका धनाढ्य उद्योगपतीने सर्व कमावलेली ‘खासगी’ संपत्ती अचानक ‘सार्वजनिक’ केली. Patagonia आणि तिचे मालक यिव्हॉन शुईना यांनी सुमारे चाळीस वर्षे आपल्या व्यवसायात बख्खळ पैसा कमावल्यानंतर अचानक हा निर्णय घेतला. हा सर्व पैसा त्यांनी सार्वजनिक कामासाठी म्हणजेच वातावरणातील बदलांच्या धोक्यांवरील (क्लायमेट चेंज) उपाययोजनांसाठी वापरला जावा, असे सांगून एका संस्थेकडे स्वतःचे सर्व भागभांडवल देऊन टाकले. खरे तर आपल्या मालकीचे त्या कंपनीतील सर्व शेअर चढ्या किंमतीने दुसऱ्या कोणाला तरी विकणे आणि मिळालेली संपत्ती व त्याचे उपयोजन कसे करायचे हे ठरवणे, असा पर्याय त्यांच्यापुढे होता. तसाच आपल्या संपत्तीचा भाग आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवणे, हाही मार्ग होता. यापैकी दोन्ही त्यांनी टाळले. एक नवीन सार्वजनिक संस्था स्थापन करून त्या संस्थेकडे ही रक्कम सुपूर्द केली. नवीन संस्थेचे नावही लक्षात घेण्यासारखे आहे. Patagonia Purpose Trust. याचे कारण त्या नावांमध्ये ‘उद्देश’ हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजेच पैशापेक्षा उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. हा एक संदेशच त्यांनी या त्यांच्या कृतीतून दिला.

सत्पात्री दानासाठी आपल्याकडेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक व्यक्ती व संस्था मूलभूत उद्दिष्टांसाठी काम करीत आहेत.अशांना पाठबळ द्यायला हवे आहे. हजारो मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वतःलाच नव्हे तर भवतालच्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे.हजारो विणकर-कारागीर- कुशल तंत्रज्ञांना आपली उत्पादने देशाच्या व जगाच्या बाजारपेठेसमोर सादर करायची आहेत.त्यांना प्रसिद्धी, भांडवल व मार्गदर्शनाची गरज आहे. हजारो शेतकऱ्यांना त्यांनी जिवाचे रान करून जपलेले-फुलवलेले सकस भरड धान्य (जे विषरहित आहे.)शहरांमध्ये पोचवायचे आहे.या सेतूबंधनात मदत केली जावी, अशी अपेक्षा आहे. श्रीमंतीला अशा उच्चतम उद्दिष्टांची जोड मिळाली, तर किती बहार येईल!

‘दाना’चा उत्सव

भारतातही गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये उद्योगपती आणि नवउद्योजकही दानशूरपणामुळे प्रसिद्ध झाले आहेत. टाटा उद्योग समुहाचे देदीप्यमान उदाहरण आहेच. टाटा सन्स व सर्व टाटा कंपन्यांची दोन तृतीयांश मालकी एका सार्वजनिक कामांमध्ये गुंतलेल्या धर्मादाय संस्थेकडे म्हणजे ‘टाटा ट्रस्ट’कडे आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर जर सर्व टाटा उद्योगांना एका वर्षात शंभर रुपये नफा झाला, तर त्यातील ६६ रुपये टाटा ट्रस्ट म्हणजे धर्मादाय व सामाजिक काम करणाऱ्या संस्थेकडे परत जातात व या ६६ रुपयांची परतफेड समाजामध्ये देशभर चाललेल्या अनेक संस्थांना देणगीरूपाने होते.

अलीकडच्या काळात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या कायद्याद्वारे उत्पन्नाच्या दोन टक्के हे पैसे सार्वजनिक उपक्रमांसाठी खर्च करावे लागतात. पितृपक्षानंतर घटस्थापनेमध्ये नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये ‘दान’ उत्सव साजरा करण्याची एक चांगली प्रथा आपल्या समाजात गेल्या पाच- दहा वर्षांत रूढ होऊ पाहात आहे. ती रुजली पाहिजे. कोणतेही दान हे श्रेष्ठच. मग ते अवयदान असो, रक्तदान असो अथवा ‘पाणी फाउंडेशन’सारख्या महाराष्ट्रभर केलेल्या प्रकल्पामधील श्रमदान असो. तन, मन आणि धन या तिन्हीचे योगदान हे सर्वच सामाजिक कार्यामध्ये महत्त्वाचे आहे. किंबहुना अशा हजारो-लाखो योगदानांमुळेच अनेक महत्त्वाची कामे महाराष्ट्रात व देशभर उभी राहिली आहेत. सर्व धर्मविचारांमध्ये या दानाचे महत्त्व आहे.

आत्मभानाचा अंकुर

पण एका विशिष्ट संदर्भात ‘दान माणसाला नादान बनवते’, या बाबा आमटे यांनी एकदा केलेल्या विधानाचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. समाजात आजूबाजूस आत्मभान, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास हरवलेली हजारो अभावग्रस्त नागरिक व कुटुंबे आहेत. एकीकडे अशांची संख्या कोट्यवधी असताना दुसरीकडे फोर्ब्सच्या यादीत दरवर्षी अब्जाधीशांची संख्याही वाढती आहे. पण ती संख्या दोन आकड्यांच्या पुढे गेलेली नाही. दान करण्यामध्ये जे पुढाकार घेतात त्यांनी संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजामध्ये परत करत असताना या संपत्तीमुळे हजारो जणांचा आत्मसन्मान वाढतोय किंवा नाही, याचाही विचार करायला हवा.

माझ्या दानामुळे अशा पिचलेल्या मनगटांमध्ये, खचलेल्या मनामध्ये आणि भविष्यामध्ये विश्वास नसलेल्या हृदयांमध्ये जर आत्मभानाचा व आत्मसन्मानाचा अंकुर फुलून येत असेल तर माझे हे दान सत्पात्री आहे. ते दान मी जणू काही बीजरूपाने समाजामध्ये पेरतो आहे आणि त्या बीजामधून अनेक तरारणारे वृक्ष निर्माण होणार आहेत, ही भावना बाळगायला हवी. इंग्रजीमध्ये याच अर्थाचे एक सुवचन आहे. ‘त्याला मासे देऊ नका, ते त्याला एक दिवस पुरतील’, ‘त्याऐवजी त्याला मासे पकडण्याचे शिक्षण द्या, त्यामुळे ते शिक्षण त्याला आयुष्यभर पुरेल.’ या दोन ओळींमध्ये आणखी एक ओळीची भर आवश्यक आहे. केवळ मासे पकडण्याचे शिक्षण देऊन उपयोग नाही, याचे कारण समाजामध्ये; या ‘तलावामध्ये, नद्यांमध्ये व समुद्रामध्ये’ अपार मासे आहेत; पण त्यांचा कब्जा काही मर्यादित लोकांकडे जणू काही वारसा पद्धतीने चालत आलेला आहे. त्यामुळे अशा अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध दाद मागण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी, संघटित होण्यासाठीचेही शिक्षण मासे पकडण्याच्या बरोबरीने समाजाला देण्याची गरज आहे.

देणाऱ्या व्यक्तीला खूप काही लाभ होत असतो. त्या निमित्ताने अपार कृतज्ञताभाव व्यक्त करता येतो. ‘बरीच अनुकूल परिस्थिती, माझे काही श्रम आणि नशीबाचा भाग यामुळे माझी परिस्थिती इतरांपेक्षा जास्त चांगली आहे’ असा भाव ठेवून समाजाला संपत्तीचा भाग परत देण्याची कृती इतरांनाही प्रेरणादायक वाटेल. आपल्याला लाभलेल्या या ‘अनुकूल परिस्थिती’ च्या घटकात समाजाचा वाटा मोठा असतो. तो समाजालाच परत देणे, ही भावना अत्यंत महत्त्वाची. सध्याच्या योजक, प्रायोजक व चमकोगिरीच्या, कोपऱ्या कोपऱ्यावर झळकणाऱ्या फलकबाजीपेक्षा आत्मभान जागवणारी ही भावना वाढायला हवी. तसे झाले तर आत्मसन्मान आणि आत्मभान वाढवणारे हे दुहेरी माप देणाऱ्याच्या व घेणाऱ्याच्या पदरात एकदमच पडेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com