शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा व्हावा | Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा व्हावा
शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा व्हावा

शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा व्हावा

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन १८, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी होत आहे. यानिमित्ताने शैक्षणिक सुधारणांची दिशा सुचविणारे विचार.

शिक्षणाचे प्रमुख आठ स्तंभ दिलेले आहेत - १) स्वविकास, २) वैचारिक प्रगल्भता, ३) काळानुरूप बदल, ४) कृतिशीलता, ५) जाणून घेणे, ६) सहजीवन व सहकार्य, ७) भावनांचे उदात्तीकरण, ८) राष्ट्रीयत्त्व. ज्ञान हे क्रियाशीलता, सहकार्य, भावना, विचारप्रक्रिया व शोधकार्य यामधून होत असते. हे होण्यासाठी अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, वर्गाध्यापन आणि अध्ययन अशी शिकण्याच्या प्रक्रियेची चतुःसूत्री कार्यरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नोकरीसाठी शिक्षण या एकमेव उद्देशाने आपण शैक्षणिक प्रक्रिया आजपर्यंत कार्यरत ठेवली आहे. ज्यामधून साचेबद्धता, पारंपरिकता, तेच ते आणि तेच ते अशा स्वरूपाची शिक्षणाची स्थिती झालेली आहे. प्रत्यक्षात इतर सर्व क्षेत्रांत म्हणजेच औद्योगिक, शेती, संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक जगत, खगोलशास्र, व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत क्रांतिकारी बदल झालेले आपण पहातो. पण हेच शिक्षणाच्या बाबतीत पाहिल्यास आजचे चित्र नेमके याच्याविरुद्ध आहे.

शिक्षणक्षेत्रामध्ये क्रांती व्हावी, असा एकही बदल झालेला नाही. मुलांच्या कल्पना, कृती, नावीन्यता, वैचारिक प्रगल्भता, संशोधन याबाबतीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणामधून काही प्राप्त होते की नाही, यावर संशोधन करण्याची वेळ आज आलेली आहे. शिक्षणामधून भावनांचे उदात्तीकरण व्हावे हा एक विचार आहे आणि आजचे सर्व स्तरावरचे स्वरुप पाहता भावनांचे विद्रोहीकरण झाल्याचे दिसून येते. शिक्षणामधील ही उणीव आहे की काय असा प्रश्न पडतो. सद्य शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा अत्यंत निष्क्रिय म्हणून बाहेर पडतोय की काय अशी स्थिती आलेली आहे. हे चित्र आपल्याला बदलले पाहिजे. कुणी बदलायचे हे चित्र? तर मुख्याध्यापक महामंडळाचे हे काम आहे. शासनावर अवलंबबून राहणे आता कमी केले पाहिजे. मुख्याध्यापक महामंडळाने याबाबतीत पुढाकार घ्यावा.

बदलाचे खरे प्रवर्तक, शिल्पकार, जाणकार हे मुख्याध्यापकच आहेत. मुख्याध्यापक या शब्दामध्ये प्रशासक व अध्यापक हे दोन्हीही समाविष्ट आहेत. मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घ्यावे व ते शासनाने कार्यवाहीत आणावेत, अशी प्रक्रिया प्रत्यक्षात हवी; पण दिसताना ती नेमकी उलट घडताना दिसते.

महामंडळाची भूमिका

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ५+३+४+४ हा आकृतिबंध मांडण्यात आला आहे. शासनाने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो आपल्याला पाळावाच लागेल. परंतु या धोरणाच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यासक्रम कसा असावा हे मात्र मुख्याध्यापक महामंडळाने ठरवावे. संप, मोर्चे, रजा, पगारवाढ, डीए डिफरन्स, संचमान्यता ही नेहमीची कामे तर आहेत. पण या सर्व कामांपेक्षा मंडळाकडून शैक्षणिक योगदान (अ‍ॅकॅडमिक इनपुटस्) महत्त्वाचे आहे. कारण मुलांना नेमके काय हवे आहे? समाजाची गरज काय आहे? देशाला काय हवंय? शिक्षणातून परिवर्तन, प्रगती करुन त्यातून राष्ट्राचा विकास करायचा म्हणजे नेमके काय करायचे? याची खरी माहिती मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना आहे का? शाळेशी काहीही संबंध नसलेल्या तज्ज्ञांच्या किंवा महाविद्यालयीन किंवा विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी हे काम करू नये. मुख्याध्यापक महामंडळ यात लक्ष घालत नाही. हिरिरीने पुढे येत नाही. चांगल्या शैक्षणिक कामासाठी, प्रगतीसाठी शासनावर दबाव आणत नाही. म्हणून हे असे चुकीचे घडते आहे. पण त्यामुळे विद्यार्थी मात्र नवनवीन आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरत आहेत, त्याचे काय? देशाला हे परवडणारे नाही.

बदलांची दिशा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या प्रत्येक टप्प्यापासून आपल्याला बदलाचा विचार करावा लागेल. सध्या अस्तित्त्वात असलेले भारंभार विषय कमी करून त्यामध्ये नेमकेपणा आणावा लागेल. सद्य सामाजिक स्थिती, संकटे, तंत्रज्ञानातील प्रगती, आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करणारे विद्यार्थी हवे असतील तर आपल्याला शिक्षणामध्ये मूलभूत बदल करावे लागतील.

खरे म्हणजे शिक्षणाचा गाभा, आत्मा, कणा मानसशास्त्र आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक (बालवाडी) शिक्षणापासून ते महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय शिक्षणापर्यंत प्रत्येक वर्गामध्ये मानसशास्राचा समावेश प्रभावीपणे असावा, हा विचार आपल्याला करावा लागेल. कोविड-१९ च्या काळामध्ये शिक्षणामधल्या उणिवा प्रकर्षाने जाणवल्या. त्यावर विचार करून जर काही नव्याने निर्णय घ्यायचे असतील तर शिक्षणाची पुनर्रचना ही पुढील मुद्द्यांवर अपेक्षित आहे.

१) मानसशास्त्र, २) मातृभाषा, ३) व्यावहारिक गणित, ४) संगणक, ५) जीवनकौशल्ये, ६) सेवा, सहयोग विचार, ७) वैचारिक प्रगल्भता, ८) व्यवसाय सुरू करण्यासंबंधी पूर्वतयारी किंवा मार्गदर्शन, ९) योग-प्राणायाम आणि ध्यान. (सोबतचा तक्ता पहावा.)

शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची वेळ आपल्याला कोविडने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राचे शैक्षणिक नेतृत्त्व करणार्‍या मुख्याध्यापकांनी याबाबतीत विचार करुन संपूर्ण समाजाला न्याय द्यायचा असेल, विकासाची प्रक्रिया कार्यरत ठेवायची असेल, आपले योगदान सिद्ध करायचे असेल तर याबाबतीत सर्व भूमिका स्वतःच्या हाती घेतल्या पाहिजेत. क्रांती, क्रांती म्हणजे नेमके हेच! अर्थात या गोष्टी नकारात्मक किंवा विध्वसंक प्रवृत्तीने करायच्या नाहीत. तर त्या शांततेच्या, सलोख्याच्या, बुद्धीमत्तेच्या, गुणवत्तेच्या, मानसशास्राच्या आधारावर करायच्या आहेत व करण्याची गरज आहे. मुख्याध्यापक महामंडळाच्या जुन्नरमधील अधिवेशनापासून शैक्षणिकक्रांतीला प्रारंभ करण्यात यावा.

(लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

loading image
go to top