‘ग्रीन केमिस्ट्री’मधून रोजगारनिर्मिती

डॉ. अनिल लचके
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.

प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.

औ द्योगिक क्षेत्रात एखाद्या रसायनाची किंवा उपकरणाची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठी कच्चा माल, (रॉ-मटेरियल) महत्त्वाचे असते. कच्च्या मालाचे अनेक प्रकार आहेत. पेट्रोकेमिकल्स (नॅफ्था), कोल, अल्कोहोल, सल्फर, मीठ, वाळू, बायोमास, सोडा-लाइम अशा प्रकारचा कच्चा माल उद्योगधंद्यांमध्ये वापरतात. तो दर्जेदार तर हवाच; पण त्याचा पुरवठा सातत्याने व्हायला पाहिजे. तो कमी किमतीत, देशांतर्गत मिळाला तर चांगलेच. त्या कच्च्या किंवा पक्‍क्‍या मालामुळे परिसरात प्रदूषण होऊ नये, ही आपली अपेक्षा. या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत. सध्या अक्षय-चिरंतन विकासाचे उद्दिष्ट सांभाळावे, असा दंडक जगभर पाळला जातो. यासाठी कच्चा माल म्हणून उपद्रवी आणि प्रदूषण करणारे घटक वापरून कोणत्याही उपयुक्त मालाची निर्मिती करता यावी, असे संशोधक आणि तंत्रज्ञांना वाटते. याचा अर्थ साप मरावा आणि काठीही मोडू नये, अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. यादृष्टीने विविध प्रयोगशाळांमध्ये सतत प्रयोग चालू असतात. त्याला यशही मिळत असते. त्याकरिता पर्यावरणाचा विचार करून संशोधक तंत्रज्ञान विकसित करतात. साहजिकच याला ‘ग्रीन केमिस्ट्री’ म्हणायला हरकत नाही. या संदर्भातील काही नमुनेदार उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत.

जलपर्णी (वॉटर हायसिंथ) वनस्पती आपल्याला माहीत आहे. या हिरव्यागार तरंगणाऱ्या वनस्पतीने नदी किंवा तलाव काठोकाठ भरलेला दिसतो. जणू भरपूर मशागत करून, खते वापरून कुणीतरी पीक काढलेय, असे वाटते. जलपर्णी वनस्पती अशुद्ध पाण्यात वाढून काही दूषित द्रव्ये शोषून घेते. तेवढा फायदा होतो; पण ती वाढताना पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि पाणवनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्याचा उपद्रव जलचरांना आणि एकूणच जैवविविधतेला होतो. या वनस्पतीभोवती अनेक प्रकारच्या उपद्रवी कीटकांची आणि डासांची उत्पत्ती होते. तसेच जलप्रवाहात अडथळा निर्माण होतो. नाविकांना, मच्छीमारांना, पोहणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. यासाठी जलपर्णीचा उपयोग कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न होतात. त्यापासून बायोगॅस आणि कंपोस्टखते तयार केली गेली. जलपर्णी सच्छिद्र असते. त्याची भुकटी करून कारखान्यातील सांडपाणी साफ करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. परदेशात जलपर्णीचा वापर करून चपला, दोरखंड, कागद, टोपल्या, सॅनिटरी नॅपकिन, शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. पण या प्रयत्नांना मर्यादित यश मिळालेय. आता गुवाहाटीमधील ‘आयआयटी’च्या तरुण संशोधकांनी काही प्रयोग केले आहेत. त्यांनी जलपर्णी वाळवून त्याचा उपयोग पर्यावरण-अनुकूल व स्वस्त पडणाऱ्या विटांमध्ये केला आहे. नेहमीच्या विटांची निर्मिती करताना त्यात शेतीला उपयुक्त असणारी वरच्या थरातील सुपीक माती वापरतात. तिचा वापर कमी व्हावा म्हणून जलपर्णीच्या भुकटीचा उपयोग केला जाईल. त्या विटा जास्त सच्छिद्र आणि हलक्‍या असल्याने भट्टीचे तापमान कमी केले तरी चालेल. त्यातून उष्णतेचे वहन सावकाश होते, म्हणून वातानुकूलित जागांसाठी विटा किफायतशीर आहेत. भारताच्या ‘आयएसआय’च्या प्रमाणीकरणात त्या ‘फिट’ बसतात. हे निष्कर्ष नुकतेच ‘जर्नल ऑफ क्‍लीनर प्रॉडक्‍ट्‌स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अशा प्रकारच्या विटांची निर्मिती करताना अर्थातच रोजगारनिर्मितीही होऊ शकते.

इंग्लंडमध्ये अंड्यांचे ‘प्रोसेसिंग’ करणारे पंकज पांचोली हे एक उद्योजक आहेत. त्यांच्या कारखान्याच्या परिसरात आठवड्याला १५ लाख अंड्यांच्या टरफलांचा ढिगारा साचत असे. एवढ्या दहा टन कवचाचे काय करावे ही त्यांच्यापुढे समस्याच होती. त्याची रीतसर विल्हेवाट लावण्याचा खर्च प्रतिवर्षी ६४ हजार डॉलर होता. त्यांनी लिसेस्टर युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्र विभागातील प्रो. अँड्य्रू एबॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही समस्या सांगितली. मग एक प्रोसेस तयार झाली. अंड्याच्या कवचात ९५ टक्के कॅल्शियम कार्बोनेट असते. त्याचा वापर करता येतो. त्यासाठी अंड्याची टरफले प्रथम एका कन्व्हेअर बेल्टवरून एका टाकीत आणतात. . टाकीमधील पाण्याने आणि एका विद्रावकाच्या साह्याने टरफले स्वच्छ धुतली जातात. येथे कमी-अधिक जाडीचा भुगा तयार होतो. कोरडा केलेला भुगा विशिष्ट प्लॅस्टिक किंवा पॉलिमरमध्ये ‘फिलर’ म्हणून वापरला जातो. परिणामी ते प्लॅस्टिक जैवविघटनशील होते. असे प्लॅस्टिक उपयोग करून झाल्यावर मातीत लवकर विलीन होते. ते सामान्य पॅकिंगपासून बांधकाम मटेरियल पॅक करण्यापर्यंत वापरता येते.   

 कवचाच्या आतील भागात जंतूंना अभेद्य असे प्रथिनांचे दोन पडदे (मेम्ब्रेन) असतात. प्रथिनांचे प्रमाण एकूण कवचाच्या ४.५ टक्के, तर मेदाम्लांचे प्रमाण ०.३५ टक्के असते. याचा उपयोग उच्च दर्जाच्या बॅंडेजची निर्मिती करण्यासाठी करता येतो. या प्रथिनांमध्ये मानवी त्वचेचा घटक असलेले केरॅटिनवर्गीय प्रथिन असते. विशिष्ट प्रकारच्या जखमा लवकर भरून निघण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अमेरिकेतील अलाबामा राज्यातील टस्केगी विद्यापीठात विजया रंगारी यांनी अल्ट्रा-साउंड तंत्राचा वापर करून अंड्यांच्या कवचाचा अत्यंत मुलायम (नॅनो) भुगा करून दाखवलाय. त्याचा खाद्यान्नाचे पॅकिंग करायला किंवा पुन:श्‍च अंड्यांच्या पॅकिंगचे ‘कार्टोन’ करायला उपयोग होईल. अंड्यांच्या टरफलाची मुलायम भुकटी मक्‍याच्या पिठात मिसळून जैवविघटनशील प्लॅस्टिक तयार करता येते. अंड्यांच्या टरफलांची विल्हेवाट लावताना पंकज पांचोलींचे बरेच पैसे वाया जायचे. आता विनामूल्य मिळणारा कच्चा माल वापरून ते आर्थिक फायदा मिळवतात. शिवाय संभाव्य प्रदूषण टाळतात. त्यांच्या पर्यावरण-अनुकूल तंत्रज्ञानाला ‘फूड अँड ड्रिंक आय-नेट इनोव्हेशन अवॉर्ड’ मिळालेय.

आपल्या तरुण संशोधकांनी असे काही तरी करून दाखवले पाहिजे. देशात विनामूल्य मिळणारा कच्चा माल समोर दिसत असताना ‘योजक: तत्र दुर्लभ:’ असे होऊ नये! केस कापण्याच्या सलूनमध्ये भरपूर केस खाली पडत असतात. त्यापासून नत्रयुक्त खते तयार करण्यासाठी अमोनिया आणि सिस्टाइनसारखी अमिनो आम्ले तयार करता येतील. त्याचप्रमाणे विग (टोप) तयार करता येतात. आंब्याच्या हंगामात सर्वत्र कोयी पडलेल्या असतात. कोयींपासून पेक्‍टिन, संपृक्त मेदाम्ले (पाल्मिटिक आणि स्टिरिक आम्ले) तयार होतात. जगात सर्वांत जास्त चिंचेची झाडे भारतात आहेत. त्यामुळे चिंचोक्‍यांपासून गुरांचे खाद्य, चर्मोद्योगात लागणारे टॅनिन, वस्त्रोद्योगात लागणारे डिंक तयार करता येते. यातून कुटिरोद्योग निघू शकतात. चक्का आणि चीज तयार करताना ‘व्हे’ म्हणून ओळखला जाणारा घटकदेखील एक आकर्षक कच्चा माल आहे. भारतात शोधले तर विनामूल्य मिळणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर प्रदूषण टाळून करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr anil lachke writes article in editorial page